‘अहं’करे सो कायदा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिव्या नेरुरकर-सौदागर

नात्यामधील एखादी व्यक्ती हेकेखोर असेल तर त्या नात्यामध्ये कधीही मोकळेपणा राहत नाही. ‘अहंकार’ आणि ‘अहं’पणा हा कुठल्याही नात्याला संपवून टाकतो. अहंकार ही अशी गोष्ट आहे, जी व्यक्तीला ‘आपणच श्रेष्ठ आणि बाकी सगळेच कनिष्ठ’ या अतार्किक विचारांत इतकी गुंतवून ठेवते की, शेवटी ती व्यक्ती त्याच एका भ्रमात जगायला सुरुवात करते, हळूहळू इतरांवर अविश्वास ठेवायला सुरुवात करते आणि इथेच कुठेतरी तिच्यामध्ये समज – गैरसमजाची पाळेमुळे खणली जातात आणि सुरुवात होते ती वादविवाद, भांडणांची. नातं मानसिक पातळीवर संपल्याची ही खूण समजायला हरकत नाही.

नाती आणि अहंकार (Ego) यांचा संबंध तसा विरोधीच असायला हवा, पण बऱ्याच वेळेस हाच संबंध हा पूरक बघायला मिळतो. म्हणूनच आपल्याला नात्यांमध्ये तणाव निर्माण झालेले बघायला मिळतात. अहंकार ही अशी गोष्ट आहे, जी व्यक्तीला ‘आपणच श्रेष्ठ आणि बाकी सगळेच कनिष्ठ’ या अतार्किक विचारांत इतकी गुंतवून ठेवते की, शेवटी ती व्यक्ती त्याच एका भ्रमात जगायला सुरुवात करते, हळूहळू इतरांवर अविश्वास ठेवायला सुरुवात करते आणि इथेच कुठेतरी तिच्यामध्ये समज – गैरसमजाची पाळेमुळे खणली जातात आणि सुरुवात होते ती वादविवाद, भांडणांची. नातं मानसिक पातळीवर संपल्याची ही खूण समजायला हरकत नाही.

निशांत आणि नमिताचं (दोन्ही व्यक्तींची नावे बदलली आहेत.) असंच काहीसं बिनसत चाललं होतं. त्यांच्या लग्नाला आता फक्त वर्षच झालं होतं, पण त्यांच्या नात्यात कुठेही आलबेल नव्हतं. दोघेही उच्चशिक्षित होते. नमिता एका चांगल्या कंपनीत वरच्या हुद्द्यावर नोकरी करत होती. निशांतला नोकरी होती, पण नमितासारखी चांगल्या पगाराची आणि हुद्द्याची नव्हती. हे झालं एक कारण.

दुसरं कारण म्हणजे दोघांचंही असलेलं कौटुंबिक वातावरण हे परस्परविरोधी होतं. निशांत हा अतिशय साध्या आणि किंचित कर्मठ अशा वातावरणात वाढलेला असल्याने त्याच्या वागण्यात गोंधळलेपण होतं. याउलट नमिता ही मोकळ्या विचारांच्या कुटुंबातील असल्याने ती स्वतंत्र आणि स्वावलंबी अशी मुलगी होती.

‘‘तुमच्या दोघांमध्ये एवढी दरी असताना तू लग्न का केलंस?’’ समुपदेशनासाठी आलेल्या नमिताला असं विचारल्यावर तिला भावनावेग अनावर झाला. ‘‘मॅडम, मी निशांतच्या बोलण्यामुळे त्याच्यावर प्रभावित झाले होते, पण लग्नानंतर त्याचं खरं रूप दिसलं जे माझ्यासाठी शॉकिंग होतं.’’
नमिताने निशांतशी घटस्फोटाचा निर्णय घेतला होता. ती निशांतच्या स्वभावाला आता कंटाळून गेली होती. लग्नानंतर पहिला महिना सुरळीत गेल्यानंतर त्याचा मूळ अहंकारी स्वभाव जागा झाला होता. त्याला तिने केलेली घरातील कामाची वाटणी पटत नव्हती. घरातील कामं करणं हे त्याला कमीपणाचं वाटायचं. ती कामं टाळण्यासाठी ऑफिसमधून घरी आल्यावर तो पूर्णपणे मोबाईलमध्ये असायचा. मग सगळी कामं ही नमिताच ऑफिसमधून आल्यावर करायची.

निशांत खाण्याच्या बाबतीत अतिशय चोखंदळ होता. त्याला काही पदार्थच जेवताना आवडायचे. नमिता मात्र सरसकट सगळं खायची. जर त्याच्या आवडीचं जेवण नसेल तर तो तिच्यावर चिडायचा. मग रात्रीचं जेवणसुद्धा एकतर मुक्याने तरी व्हायचं किंवा मग भांडणांनी. ‘‘याचे हजार खाण्याचे नखरे. त्याच्या आवडीची भाजी नसेल तर कटकट करतो. माझी मग जेवणाची इच्छाच उडून जाते. घरातील इकडची काडी तिकडे करत नाही. मला आता तो माझ्या नोकरीवरूनसुद्धा टोमणे मारायला लागलाय. त्याचं कायम म्हणणं असतं की, ही नोकरी मला नशिबाने मिळालीय.’’

नमिता रडत रडत सर्वकाही मोकळेपणाने सांगत होती. मेहनतीने तिने स्वतःची ओळख तिच्या आयुष्यात तयार केली होती, पण तिची मेहनत निशांत पाहत नव्हता. कारण त्याने स्वतः मेहनत अशी कधी घेतलीच नव्हती. ‘‘जे आहे त्याच्यात चालतंय ना’’ असं म्हणत तो आहे त्यात तसाच राहत होता आणि तिने जेव्हा केव्हा त्याला चार समजुतीच्या गोष्टी सांगून प्रोत्साहन दिलं होतं तेव्हा त्याला ते तिचं बोलणं कंटाळवाणं वाटू लागलं होतं. तिचा राग येऊ लागला होता. नमिता आता त्याला ‘बोअरिंग’ वाटू लागली होती. तो मग तिची इतरांसमोर खिल्ली उडवायला कमी करत नव्हता. चान्स मिळेल तसे तिचे दोष दाखवायचा.

या सगळ्याचा नमिताच्या मनावर भयंकर परिणाम झाला. तिची झोप उडाली, खाणंपिणं कमी झालं. तिला आता निशांतबरोबर राहणं नकोसं झालं होतं. रोज ऑफिसातून घरी जाणं तिला नकोसं वाटत होतं. मनमोकळी असणारी नमिता आता अबोल झाली होती. तिच्या बोलण्यात आणि वागण्यात आत्मविश्वासाची कमी ऑफिसमधल्या तिच्या कलिग्जनाही जाणवू लागली होती. तिच्या बॉसलाही हा बदल जाणवला. पूर्वी कामाचा ताण सहज सांभाळणारी नमिता आता थोड्यासुद्धा कामाने मनाने थकत होती. कोणी काही बोललं तर रडत होती. तिचा चेहरा कायम तणावग्रस्त दिसत होता. त्यामुळे बॉसच्या सल्ल्यानुसार तिने समुपदेशन घेण्याचे ठरवले.

‘मी कुठे सुधारायला हवं?’ या तिच्या प्रश्नातून समुपदेशन सुरू झालं. नंतर नंतर तिला या प्रश्नाचा फोलपणा जाणवू लागला आणि कुठेतरी ‘निशांतनेही स्वतःमध्ये बदल करायला हवा’ इथपर्यंत ती आली. तिला संसार व्यवस्थित करायचा होता, पण दुर्दैवाने म्हणा, निशांत काही समुपदेशन घ्यायला तयार नव्हता.

त्याच्या मते तो व्यवस्थितच आणि प्रॅक्टिकल होता, तर नमिता इमोशनल आणि कांगावेखोर. त्या दोघांच्याही पालकांनी तसेच नातेवाईकांनी त्या दोघांत समेट घडवून आणण्याचे प्रयत्न केले. तेही असफल ठरले. कारण निशांत शेवटपर्यंत स्वतःच्या भूमिकेवरच अडून राहिला होता. ‘‘नमिताला जर माझ्या घरात राहायचं असेल तर शेवटपर्यंत कायम ऍडजस्टच करावं लागेल. मी ठरवीन तिला केव्हा स्वीकारायचं ते. तोपर्यंत तिने मला पाहिजे तसंच वागावं. मी काही बदलणार नाही.’’ त्याच्या या टोकाच्या वाक्यांनी एक नातं बहरण्याआधीच कोमेजून गेलं.

‘अहंकार’ आणि ‘अहं’पणा हा कुठल्याही नात्याला संपवूनच टाकतो. नमिता-निशांतचं हे उदाहरण याबद्दल बरंच काही आपल्याला सांगून जातं. नात्यामधील एखादी जरी व्यक्ती ही हेकेखोर असेल तर नात्यामध्ये कधीही मोकळेपणा राहत नाही. ‘अहंकार हा नातेसंबंधांमध्ये आणायचा नसतो’ हे वाक्य जे आपण वरच्यावर ऐकतो ते शंभर टक्के खरं आहे याची वरील उदाहरणावरून खात्री पटते.
मग अशा प्रकारचा ताण जर नात्यांमध्ये येत असेल तर कुठल्या गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात?
– कुठलाही अतिविचार करणे.
– जोडीदार/ नात्यातील व्यक्तीबद्दल नकारात्मकता बाळगणे.
– जोडीदार/ नात्यातील व्यक्तीचा राग करणे.
– जोडीदार/ नात्यातील व्यक्तीस कमी लेखणे.
– जोडीदार/नात्यातील व्यक्तीची इतरांसमोर खिल्ली उडवणे.
या आणि तत्सम गोष्टी जर कुठल्याही नात्यामध्ये टाळता आल्या तर कुठल्याही नात्यामध्ये कधीच कटुता येणार नाही. कारण अहंकार हा नेहमी कुठल्या ना कुठल्या गैरसमजाला जन्म देतो आणि नातं संपवूनच शांत होतो. शेवटी उरतो तो पश्चात्ताप!
निशांतला कदाचित त्याच्या चुकीची कधी ना कधी जाणीव होईलही, पण नक्कीच त्याच्या हातातून वेळ निघून गेली आहे एवढं मात्र खरं.

(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)
[email protected]