गौरीची गोष्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>दिव्या नेरूरकर सौदागर

मुलं, मग ती कोणत्याही वयाची असोत, मरण्याच्या गोष्टी जेव्हा बोलायला लागतात तेव्हा त्या खचितच दुर्लक्ष करून चालत नाहीत. ‘आत्महत्येचा विचार’ हा कधीही एका क्षणात होत नसतो. जेव्हा मुलांना गुंता सुटण्याचे कुठलेही मार्ग दिसत नाहीत, तेव्हा मग त्यांचे मनोधैर्य खचत जाते. म्हणूनच मुलांसमोर घरातल्या मोठय़ांची भांडणं किंवा मारामाऱ्या जर का वारंवार होत असतील आणि त्यांना कारण नसताना दोषी धरलं जात असेल तर मुलं गौरीसारखा विचार करू शकतात.

ही गोष्ट आहे एका दहावीतल्या मुलीची…. गौरीची (नाव बदलले आहे). मी तेव्हा एका शाळेमध्ये समुपदेशन करत होते. शाळा तशी नावाजलेली आणि त्यातील शिक्षकही तसे त्यांच्या विद्यार्थ्यांवर पूर्णपणे लक्ष ठेवून असणारे असे होते. आपला विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी शाळेत असताना आणि शाळेच्या बाहेर, घरी कसे वागत आहेत, त्यांचे अभ्यासात व्यवस्थित लक्ष आहे ना आणि नसेल तर त्याचे कारण काय हे सगळं काही अगदी बारकाईने पाहणारे असे होते. नियमितपणे प्रत्येक पालकाच्या संपर्कातही होते. त्यातल्या त्यात दहावीच्या विद्यार्थ्यांवर तर जास्तच त्यांचं लक्ष होतं.

प्रत्येक महिन्यात दहावीची पालक सभा ही असायचीच, पण यात कुठेही गौरीचे पालक नसायचे. त्यांना शाळेने बऱ्याच वेळा नोटीसही पाठवली होती, पण ते एकदाही शाळेकडे फिरकले नाहीत. गौरीही शिक्षकांना सांगायची की, तिचे पालक नाही येणार. कारण तिच्या बाबांना कधीच वेळ नसतो आणि तिची आई कायम आजारी असते. त्यामुळे शाळेने हळूहळू तिच्या पालकांबद्दल अपेक्षा सोडून दिली होती.

गौरी ही तशी हुशार मुलगी होती, पण हल्ली तिचे अभ्यासात दुर्लक्ष खूप होत होते. मार्प कमी कमी व्हायला लागले होते. अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी की, गौरी शाळेत असताना दोन-तीन वेळा चक्कर येऊन पडली होती. तिच्या वर्गशिक्षकांच्या असेही लक्षात आले होते की, गौरी जरा शिक्षक कोणाला ओरडले किंवा विद्यार्थ्यांचे एकमेकांशी भांडण झाले तर घाबरून जायची, तिची दातखीळही बसायची. दहावीची सहामाही परीक्षा संपून मुलांचे रिझल्ट्स लागले होते. गौरी सगळ्याच विषयांत नापास झाली होती. तशीच ती प्रगतिपुस्तक हातात घेऊन माझ्या केबिनकडे धावत आली होती.
‘‘मॅडम, मी घरी जाणार नाही. घरी गेले तर आई-बाबा मला जेवण पण देणार नाहीत. मला खोलीत काsंडून ठेवतील. माझं लग्न लावून देतील.’’

तिचं हे वागणं आणि बोलणं हे थोडं धक्कादायक होतं. ती माझ्यासमोर बसली आणि लगेच तिच्याबद्दल आणि तिच्या एपूण परिस्थितीबद्दल बोलायला लागली. गौरीचा तिचे वडील हा एक अत्यंत हळवा कोपरा होता. कारण तिचे तिच्या वडिलांवर प्रचंड प्रेम होते. ती त्यांचा लहानपणापासून खूप आदर करायची. तिच्या मते तिचे वडील आधी खूप वेगळे होते, पण जसा त्यांना त्यांच्या दुकानाच्या धंद्यात (तिच्या वडिलांचे छोटे घाऊक सामानाचे दुकानात होते) त्यांच्या मित्राने फसवलं तेव्हापासून त्यांच्यामध्ये फरक पडला होता. त्यांना आर्थिक नुकसान झालं. या सगळ्याचा परिणाम म्हणजे गौरीच्या बाबांवर जास्तच झाला होता. ते आता चिडचिडे आणि संशयी झाले होते. त्यातच अंधश्रद्धेचा मार्ग त्यांनी अवलंबला.

गौरी हे सगळं सांगताना भरपूर भावुक झाली होती. अंधश्रद्धा आणि संशयामुळे ते घरच्यांना कायम अपमानास्पद वागणूक देत होते. तिच्यासारख्या लहान जीवाला हे सगळं आकलनापलीकडचं होतं. बाबांच्या मायेच्या शब्दाखातर ती आसुसली होती. घरच्या बिघडलेल्या वातावरणाचा तिच्यावर इतका परिणाम झाला होता की, तिची अन्नावरची वासनाच उडाली होती. अभ्यासातलं लक्षही लागत नव्हतं आणि गंभीर बाब म्हणजे ‘‘मॅडम, मला रेल्वेखाली येऊन मरावंसं वाटतंय. रेल्वेमार्ग माझ्या घराजवळच आहे’’ असं जेव्हा ती उद्विग्नपणे म्हणाली तेव्हा ती मनाने किती एकाकी झालेली होती हे लक्षात आलं.

मुलं, मग ती कोणत्याही वयाची असोत, मरण्याच्या गोष्टी जेव्हा बोलायला लागतात तेव्हा त्या खचितच दुर्लक्ष करून चालत नाहीत. ‘आत्महत्येचा विचार’ हा कधीही एका क्षणात होत नसतो. जेव्हा मुलांना गुंता सुटण्याचे पुठलेही मार्ग दिसत नाहीत, तेव्हा मग त्यांचे मनोधैर्य खचत जाते. म्हणूनच मुलांसमोर घरातल्या मोठय़ांची भांडणं किंवा मारामाऱया जर का वारंवार होत असतील आणि त्यांना कारण नसताना दोषी धरलं जात असेल तर मुलं गौरीसारखा विचार करू शकतात.

गौरीलाही नापास झाल्यामुळे ‘आपले लहान वयात लग्न लावणार आणि नंतर आपण करीअर करू शकणार नाही’ ही धास्ती बसली आणि ती कमालीची हादरली. कारण तिला तिचं पुढे काय होईल हे माहीत नव्हतं. ती त्या दिवशी घरी जायला तयार नव्हती. शेवटी तिच्या आई-बाबांशी फोनद्वारे संपर्क करून त्यांना गौरीच्या मानसिक स्थितीची कल्पना देण्यात आली. तिचे वडील सुरुवातीला येण्यास तयार नव्हते. मात्र आपली मुलगी जीव देण्याचा विचार करतेय हे समजल्यावर मात्र ते लगेच शाळेत आले.

मुलांना जेव्हा आपण काही गोष्टी शिकवत असतो किंवा त्यांच्याकडून जेव्हा अपेक्षा करत असतो तेव्हा त्यांना अनाठायी भीती घातली गेली तर त्याचे मुलांवर गंभीर परिणाम होऊ शकतात. तसंच मोठय़ांचे जे काही वादविवाद किंवा तत्सम गोष्टी असतील तर त्या मुलांसमोर होऊ न देणे हे कधीही श्रेयस्कर असते ही जाणीव गौरीच्या बाबांना करून देण्यात आली. गौरीलाही आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त करण्यासाठी समुपदेशन केले गेले आणि चिंता किंवा टेन्शन असेल तर ते योग्य व्यक्तीजवळ व्यक्त करणं हा एक उपाय असल्याचे तिला ठसवले गेले.

गौरीच्या कुटुंबीयांसाठी ‘फॅमिली काऊन्सेलिंग’देखील करण्यात आले. त्यानुसार घरातल्या प्रत्येक सदस्यासाठी वैयक्तिक समुपदेशन आणि सर्वांसाठी एकत्रित काऊन्सेलिंग पण केले गेले. त्या सर्वांना त्यांच्या भावना योग्य त्या पद्धतीने व्यक्त करण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. आज आपल्यापैकी कित्येकांच्या घरात गौरीसारखी मुलं असतील, जी आपल्या पालकांकडून फक्त मायेची अपेक्षा करत आहेत. ती कदाचित बोलून दाखवणार नाहीत. मात्र सारं काही मनातल्या मनात नमूद करून ठेवत आहेत. पालकांनीही याचा शांतपणे विचार करावा आणि जबाबदारीने वागावे हीच अपेक्षा!

(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)
[email protected]