माध्यम – चित्रपट नवनिर्मितीची आव्हाने

>> गणेश मतकरी

सध्या मराठी चित्रपट व्यवसाय आणि गुणवत्ता या दोन्ही ठिकाणी पाय रोवून उभी आहे. पुढच्या वाटचालीचं हे सकारात्मक चित्र बदलाची चाहूल देणारं आहे. जुन्या ठोकताळय़ांना धरून न राहता आपण सर्वांनीच या गोष्टीचा विचार करणं आता गरजेचं झाले आहे. चित्रपट बनवणाऱ्यांनी तसंच प्रेक्षकांनीही.

2023 ची सुरुवात चित्रपटसृष्टीसाठी एक वेगळे चित्र घेऊन आली आहे. गेल्या सहा-सात वर्षांचा काळ आपण पाहिला तर आपलं राज्य मराठी असूनही मराठी सिनेमांची परिस्थिती काळजी वाटण्यासारखी होती. राज्यात निर्मिती भरपूर होत होती. साधारण शंभर ते सव्वाशे चित्रपट दरवर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येत होते, पण त्यांचा दर्जा आणि त्यांची आर्थिक गणितं फारशी समाधानकारक नव्हती. दर्जेदार म्हणण्यासारख्या चित्रपटांची संख्या वर्षाला दहा टक्क्यांच्या वर जात नव्हती आणि योग्य ती प्रसिद्धी करून प्रेक्षकाला चित्रपटगृहापर्यंत आणणाऱया काही मातब्बर निर्मितीसंस्था वगळल्या तर प्रेक्षकसंख्याही समाधानकारक नव्हती. चांगले विषय, अभिनय, याबाबत मराठी चित्रपट तसा नावाजला गेला आहे, पण करमणुकीच्या पारंपरिक कल्पनाच डोक्यात ठेवणारा, नाववाले नट आणि भव्यता यांचीच अपेक्षा अधिक ठेवणारा प्रेक्षक हिंदी चित्रपटांना गर्दी करत होता. इंग्रजी आणि इतर प्रादेशिक चित्रपट होते, पण तिथेही मोठी बजेट आणि मोठे स्टार्स यांनाच अधिक मागणी होती, पण मधल्या दोन वर्षांत इतर व्यवसायांबरोबर चित्रपटांमध्येही निर्मिती, वितरण व्यवस्था यात खंड पडला आणि त्यानंतर उभं राहत असलेलं चित्र काहीसं बदललेलं आहे. आज जर आपण चित्रपटगृहांमध्ये पाहिलं तर आतापर्यंत हुकमी प्रतिसाद मिळवणाऱया बॉलीवूडलाच मोठा धक्का बसलेला दिसतोय. भरवशाचे नट, दिग्दर्शक, निर्मितीसंस्था यांनाही अपेक्षित प्रेक्षक येईनासा झालाय आणि दाक्षिणात्य चित्रपटांनी बाक्स ऑफिसवर कब्जा मिळवलाय. दक्षिणेतून येणाऱया रिमेक्सचं प्रमाण वाढतंय, तर दाक्षिणात्य उद्योगाला थेट हॉलीवूडपर्यंत नेऊन पोचवलंय. गमतीची गोष्ट म्हणजे, या नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच एक सोडून तीन मराठी चित्रपट व्यवसाय आणि गुणवत्ता या दोन्ही ठिकाणी चांगले पाय रोऊन दाखवतील अशी शक्यता दिसत आहे. रितेश देशमुख दिग्दर्शित ‘वेड,’ परेश मोकाशी दिग्दर्शित ‘वाळवी’ आणि मार्चमध्ये अपेक्षित असलेला हेमंत अवताडे दिग्दर्शित ‘घर, बंदूक, बिर्याणी’ या तीन चित्रपटांनी मराठी चित्रपटाच्या पुढच्या वाटचालीचं सकारात्मक चित्र उभं करून दाखवलय. यावरून काही निष्कर्ष काढण्याची घाई करण्याची गरज नाही, पण एक गोष्ट मात्र लक्षात घेता येईल, ती म्हणजे ही नव्याची चाहूल आहे. जुन्याच ठोकताळय़ांना न धरून राहता चित्रपट बनवणाऱयांनी तसंच प्रेक्षकांनीही या गोष्टीचा विचार करणं आता गरजेचं झाले आहे.

पॅन्डेमिकचा प्रभाव सुरू होण्याआधीच आपल्याकडे ओटीटी एक माध्यम म्हणून आलं आणि स्वीकारलं गेलं होतं. नेटफ्लिक्स, प्राईम आणि डिस्नी-हॉटस्टार हे प्रमुख, तर झी5, सोनी लिव असे इतर चॅनल्सशी जोडलेले ओटीटी चॅनल येऊन पोचलेलेले होते. मुळात ते आले तेव्हा त्यांचं स्वागतही झालं. जाहिरातरहीत टेलिव्हिजन, आपल्याला हवं तेव्हा हवे ते कार्यक्रम पाहण्याची सोय, बिंज वाचिंगची शक्यता, या साऱयाचं काwतुकही झालं, पण चित्रपटगृहाला पर्याय म्हणून त्यांच्याकडे पाहिलं गेलं नव्हतं. मुळात चित्रपट हे मोठय़ा पडद्यावर समूहाने पाहण्याचं माध्यम होतं. तो अनुभव, तिथे मिळणारी एकाग्रता घरच्या वातावरणात मिळणं अशक्यच होतं. टीव्हीवर चित्रपट होतेच, पण घरात ते पाहणं ही सोय होती, अपरिहार्यता नव्हती.

चित्रपटगृह उपलब्धच नसताना प्रेक्षकांना घरातच नवे चित्रपट पाहण्याची सोय झाली आणि मुळात मोठय़ा पडद्यासाठीच केलेले चित्रपटही आपल्या घरातच प्रदर्शित होऊ लागले. या दिवसांत नव्या मराठी चित्रपटांना ओटीटीवर फार मागणी नव्हती. प्राईमवर आलेल्या अभिजीत वारंग दिग्दर्शित ‘पिकासो’ सारख्या चित्रपटाचा अपवाद वगळता नवा मराठी सिनेमा प्रतीक्षेतच राहिला. पुढे प्लॅनेट मराठी हा खास मराठीलाच वाहिलेला ओटीटी सुरू होताना सुहृद गोडबोले/वैभव खिस्ती दिग्दर्शित ‘जून’ चित्रपटाने ‘पे पर ह्यू’ व्यवस्था आणली आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर हळूहळू ओटीटीचं दार मराठी चित्रपटांसाठी खुलं झालं. आता अशी परिस्थिती आहे की, ओटीटी आणि चित्रपटगृह यांच्यात स्पर्धा सुरू झालेली आहे. ओटीटी येण्याआधी जाहिराती नको वाटणारा प्रेक्षक थिएटरमध्ये हमखास जायचा. आता त्यालाही तशी गरज वाटत नाही. पुढल्या काळात ओटीटीवर काय पाहिलं जावं आणि चित्रपटगृहात काय पाहायला मिळावं याबद्दल मतं बनत जाताना दिसतील. ज्याचा थेट परिणाम नवनिर्मिती आणि प्रेक्षक प्रतिसाद या दोन्ही गोष्टींवर होण्याची शक्यता आहे.

ओटीटीने भाषिक वर्गवारी ही बऱ्याच प्रमाणात नष्ट केली आहे. सबटायटल्समुळे हिंदुस्थानी प्रादेशिकपासून ते जपानी आणि कोरिअन चित्रपटांबद्दल सारेच चित्रपट प्रेक्षक पाहायला लागला आहे. अशा अधिक अद्ययावत बनलेल्या प्रेक्षकांमुळेही हिंदीवरून प्रेक्षकांचं दुर्लक्ष झालय आणि इतर भाषांमधल्या चांगल्या चित्रपटाचा शोध त्यांनी सुरू केला आहे. हा शोध सध्याच्या काळात महत्त्वाचा ठरणार आहे.

पूर्वी असा एक समज होता की, भव्य व्हीजुअल इफेक्ट्स असलेलं, नेत्रदीपक दृश्ययोजना, नेपथ्य असणारं काही चित्रपटगृहात मोठय़ा पडद्यावर पाहावं आणि वेगळा विषय असणारे अर्थपूर्ण, परंतु साधे चित्रपट टीव्हीवर पाहायला हरकत नाही. माझ्यामते, हा समज आता मागे पडतोय. याउलट आशयघन चित्रपटांचा परिणाम हा तुम्ही तो किती लक्षपूर्वक पाहता यावर अवलंबून असतं. घरी चारचौघांत बसून गप्पा मारत, अर्ध लक्ष पह्नकडे ठेवून ते पाहता येत नाहीत किंवा आले तरी ते पुरेसा परिणाम साधू शकत नाहीत. आपली लाइफस्टाइल, तंत्रज्ञान आता बदलतेय आणि त्यामुळे माध्यमांना सामोरं जातानाही आपण पूर्वी बांधलेल्या आडाख्यांचा फेरविचार करण्याची गरजही तयार झाली आहे. जर गेल्या वर्षभरात कोणते चित्रपट चालले हे पाहिलं तर प्रेक्षकांकडून अप्रत्यक्षपणे असा विचार होत असल्याचं आपल्या लक्षात येईल. आशयालाच महत्त्व असलेल्या मराठी चित्रपटांसाठी हा बदल एक नवं आव्हान ठरू शकेल. पूर्वीच्या प्रस्थापितांना बाजूला करून व्यवसायात उतरणारी नवी पिढी आणि प्रेक्षकांची कुठे काय पाहावं याबद्दलची बदलणारी गणितं, यांमधूनच येता चित्रपट घडणार आहे.
[email protected]
(लेखक चित्रपट समीक्षक व अभ्यासक आहेत)