आभाळमाया – पायातील सावलीचे ‘गणित’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> वैश्विक, [email protected]

आपण जे हिंदुस्थानी पंचांग (कॅलेंडर) वापरतो ते चांद्रमासावर आधारित असतं. त्यामुळे आपले सर्व सण चांद्र महिन्यांप्रमाणे येतात. याला एकच अपवाद म्हणजे सूर्याच्या मकर संक्रमणाचा. त्या दिवशी आपण मकर संक्रांतीचा सण साजरा करतो. एरवीही खगोलीय अभ्यास रात्रीच्या अवकाशाचा, तारांगणाचा होत असल्याने सूर्याविषयीचे वैज्ञानिक ‘सण’ही अभावानेच येतात. सूर्यग्रहणं पिंवा सौर डागांचं (सन स्पॉट्स) निरीक्षण अशा काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, पण त्या मोजक्याच.

मात्र दरवर्षी विशिष्ट दिवशी आकाश ढगाळलेलं नसेल तर आपल्याला आपली सावली भर मध्यान्ही म्हणजे दुपारी बारा-साडेबाराच्या सुमारास अगदी पायात पडलेली दिसते. कारण त्या वेळी सूर्य अगदी बरोबर आपल्या डोक्यावर असतो. असे क्षण हिंदुस्थानात कन्याकुमारी ते उज्जैनपर्यंत राहणाऱया लोकांना वर्षातून दोनदा अनुभवता येतात. आता ते दिवस जवळ येतायत. त्याचं कोष्टक शेवटी देऊन महत्त्वाच्या शहरातील ‘झीरो शॅडो डे’ किंवा ‘शून्य सावली’चा दिवस कोणता ते जाणून घेऊ. असं केवळ उज्जैनपर्यंतच का घडतं? कारण आपण पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात राहतो. त्यामध्ये उज्जैन हे या गोलार्धातील साडेतेवीस अक्षांशावर येते. दक्षिण गोलार्धातही मकर वृत्तावरच्या साओ पावलो वगैरे शहरांना साडेतेवीस दक्षिण अक्षांशापर्यंत असाच ‘शून्य सावली’चा आनंद घेता येतो.

आता पृथ्वीच्या दोन्ही गोलार्धांत साडेतेवीस अक्षांशापर्यंत का? दिल्ली किंवा ऑस्ट्रेलियातील येथे का नाही? तर याचं उत्तर पृथ्वी स्वतःच्या अक्षाशी फक्त साडेतेवीस अंशाचा कोन करून कललेली असण्यात आहे. सूर्य आपल्याला रोज उगवलेला आणि मावळलेला दिसतो तो पृथ्वीच्या स्वतःभोवती 24 तास फिरण्यामुळे. वास्तविक सूर्य त्याच्या जागीच स्थिर आहे. पृथ्वी स्वतःभोवती फिरत असल्याने त्याचे ‘न चालताही चालणे’ आपल्याला दिसते ते धावत्या ट्रेनबाहेर ‘पळणाऱ्या’ झाडांसारखे असते एवढं आपण शालेय भूगोल आणि विज्ञानात शिकलेलो असतो. आता सूर्याचं अगदी माथ्यावर येणं हे पृथ्वीच्या दोन्ही गोलार्धांत त्याचं जे भासमान ‘फिरणं’ दिसतं त्याच्याशी निगडित आहे. 22 डिसेंबरला सूर्य दक्षिण गोलार्धातील मकर वृत्तावर असतो. तो उत्तरेकडे ‘जायला’ सुरुवात होते हे सूर्याचं उत्तरायण. मग 23 मार्चला तो विषुववृत्तावर येतो. त्यानंतर सहा महिन्यांत 22 जूनपर्यंत तो उत्तरेला साडेतेवीस अंशावर पोहोचतो आणि लगेच त्याचं दक्षिणायन सुरू होतं. सहा महिन्यांनी 22 सप्टेंबरला तो विषुववृत्त ओलांडून पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धावर तळपतो तो डिसेंबरपर्यंत. हे चक्र अव्याहत सुरू राहतं.

त्यामध्ये आपल्या देशाचा कन्याकुमारी ते उज्जैन हा भाग पृथ्वीच्या उत्तर गोलार्धावरील साडेतेवीस अक्षांशापर्यंत येत असल्याने सूर्य उत्तरेकडे आणि परत दक्षिणेकडे (भासमान) प्रवास करताना दोनवेळा आपल्या बरोबर माथ्यावर येतो. आपल्या महाराष्ट्रात ही वेळ ठिकठिकाणी मे महिनाभर वेगवेगळी असते. कारण मुंबई 19 उत्तर अक्षांशावर, तर कोल्हापूर 16 उत्तर अक्षांशावर आणि नागपूर 24 उत्तर अक्षांशावर आहे. त्यामुळे या मधल्या काळात त्या त्या भागात नेमक्या कोणत्या दिवशी सूर्य दोनदा बरोबर डोक्यावर येईल ते ठरतं. त्या क्षणी हातात एक नळी सरळ ठेवली तर सूर्यकिरणं नळीतून आरपार जाऊन केवळ नळीच्या काठाची पिंवा कडेची रिंगसारखी गोल सावली दिसते.

उन्हाच्या चटक्यांचा हा महिना तेव्हा फक्त काही क्षण उन्हात जाऊन, डोक्यावर टोपी घालूनच ‘शून्य सावली’चा अनुभव घ्यावा. अति उन्हाळा पिंवा सनट्रोक होण्यासारखं प्रखर ऊन असेल तर मात्र या क्षणांचा मोह टाळा, पण योग्य काळजी घेतल्यास तसे एकमेकांचे पह्टोही काढता येतील. उन्हाचा त्रास होणाऱया व्यक्तींनी हे करू नये एवढीच सूचना सर्वांना पुनःपुन्हा द्या. अशी सावली अनुभवण्याआधी भूगोल – विज्ञान शिक्षक पिंवा माहीतगारांकडून ‘शून्य सावली’ पिंवा ‘झीरो शॅडो डे’ का येतो त्याची माहिती घ्या. मेनंतर तशी वेळ जुलैमध्ये येते, पण त्या तारखा बहुधा मेघाच्छादित असतात. त्यामुळे ‘झीरो शॅडो’ दिसत नाही. आता कोणत्या मोठय़ा शहरांत कधी ‘झीरो शॅडो डे’ येतो ते पाहू – सावंतवाडी 3 मे-9 ऑगस्ट, सिंधुदुर्ग-मालवण 4 मे-9 ऑगस्ट, कोल्हापूर-इचलकरंजी येथे 6 मे – 6 ऑगस्ट, रत्नागिरी-सांगली 7 मे- 5 ऑगस्ट, चिपळूण 9 मे-3 ऑगस्ट, सातारा-पंढरपूर येथे 10 मे-2 ऑगस्ट, महाबळेश्वर-पैठण 11 मे-1 ऑगस्ट, माणगाव-बार्शी 12 मे -31 जुलै, मुळशी-पुणे-लातूर 13 मे-30 जुलै, अलिबाग-लोणावळा 14 मे-29 जुलै, मुंबई-कर्जत-नवी मुंबई 15 मे-28 जुलै, ठाणे- डोंबिवली-कल्याण 16 मे-27 जुलै, वाशीम-तलासरी 20 मे-23 जुलै, नागपूर 26 मे-17 जुलै, उज्जैन 11 आणि 21-22 जून. या तारखांच्या आसपासचे दोन दिवस ‘झीरो शॅडो डे’चा अनुभव घेता येतो. या लेखात जे दोन पह्टो आहेत, त्यात एका खांबाची थोडीशी सावली नंतर त्याच्या तळाशी येते आणि दिसत नाही. त्याचं प्रात्यक्षिक गतवर्षी महेश नाईक यांनी केलं आणि तसे पह्टोही घेतले.