सर्व संप्रदायांची गुढी; विश्वात्मक संत साहित्य संमेलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रा. डॉ. प्रकाश खांडगे

कोल्हापूर येथे पुढील काळात विश्वात्मक संत साहित्य संमेलन आयोजित होत आहे. या संमेलनात ईश्वरनिष्ठांची मांदियाळी एकत्र येत आहे. हे संमेलन सर्वार्थाने सर्वसमावेशक होणार आहे. महाराष्ट्रातील पाच भक्तिसंप्रदाय महानुभाव संप्रदाय, नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, दत्त संप्रदाय, समर्थ संप्रदाय तसेच शैव शाक्त गाणपत्य आदि संप्रदायांचे विचार मंथन या संमेलनात होणार आहे. याशिवाय ख्रिस्तमत, बौद्धमत, सुफीमत, जैनमत आदी विविध धर्मांतील अध्यात्म विचाराचे मंथन या संमेलनात होणार आहे.

कोल्हापूर येथे नजीकच्या काळात विश्वात्मक संत साहित्य संमेलन आयोजित होत आहे. या विश्वात्मक पातळीवरचे हे पहिले संत साहित्य संमेलन आहे. त्यादृष्टीने या संमेलनाची अपूर्वाई आहेच, शिवाय या संमेलनात धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात केवळ महाराष्ट्र अथवा हिंदुस्थान नव्हे तर संपूर्ण जगातील विवक्षित धर्म आणि संप्रदायांचे विचारमंथन घडणार आहे.

हिंदुस्थानापुरता विचार केला तर महानुभाव संप्रदाय,नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, दत्त संप्रदाय, समर्थ संप्रदाय, याशिवाय शैव संप्रदाय, शाक्त संप्रदाय आणि गानपथ्य अशा विविध संप्रदायांच्या धारा शेकडो वर्षे महाराष्ट्रात संपूर्ण हिंदुस्थानात गुण्यागोविंदाने नांदत आहेत. याशिवाय ख्रिस्तमत, बौद्धमत,जैनमत, सुफी विचार यांचाही फार मोठा प्रभाव संपूर्ण जगभर आहे. द्वैतमत, अद्वैत मत, केवलाद्वैत मत, विशिष्ट द्वैतमत, एकेश्वरवाद, अनेक ईश्वरवाद अशा वेगवेगळ्या तत्त्वप्रणालीने संपूर्ण विश्वातील ईश्वर निष्ठांची संस्कृती विविधतेने समृद्ध केली आहे. कोरोनाच्या काळात आपण असुरक्षित, अस्थिर आणि अंतर्मुख झालो.

‘अल्प आयुष्य मानव देह
शत गणिले ते अर्ध रात्र खाय
मधे बालत्व पीडा रोगक्षय
काय भजनासी उरले ते काय दा’

असा विचार संतांनी वासुदेव या रुपकात मांडलेला आहे. जीवन क्षणभंगुर आहे याची पदोपदी जाणीव आपल्याला करोनाने करून दिली; पण त्याच वेळी मानवतेचे आणि सामाजिक संहारतेचे दर्शनही करोनाने घडवले. लाखो लोक बेरोजगार झाले आणि असुरक्षितता एका बाजूला वाढली. दुसऱ्या बाजूला अन्नदान, औषधदान, रक्तदान अशा मोहिमा सुरू झाल्या. या सर्व पार्श्वभूमीवर सामाजिक अस्वस्थता आणि संत विचार याचे मंथन विश्वात्मक संत साहित्य संमेलनात होणार आहे. या संमेलनात संत साहित्य आणि लोकसाहित्य अनुबंध, संत साहित्यातील पर्यावरण विचार, विविध संप्रदाय आणि त्यांचा विश्वात्मक विचार आदी विषयांवर परिसंवाद आयोजित होणार आहेत. या संमेलनाचे अध्यक्ष भारत सरकारच्या पंपनी लवादाचे सदस्य, ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. मदन महाराज गोसावी हे असून त्यांनी संमेलनाविषयी मांडलेली भूमिका अशी…

माझी जिवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी अशी वारकऱयांची भावना असते. विश्वात्मक संत साहित्य संमेलनाच्या वारकऱयांची गुढी पंढरपूरचे चैतन्य घेऊन आता कोल्हापूरला उभारली जाणार आहे. अवस्थ वर्तमानाच्या परिप्रेक्ष्यातून वावरताना आम्हाला विश्वशांतीसाठी पूर्वासुरींची शिकवण मार्गदर्शक ठरते आहे. ‘हे विश्वचि माझे घर म्हणणारे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज किंवा वसुधैव कुटुंबकम्’ची शिकवण देणारी आमची समृद्ध परंपरा हे आमचे सांस्कृतिक संचित आहे.

सर्वे भवन्तु सुखिन : सर्वे सन्तु
निरामय: सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित दुःख भाग्भवेत

ही विश्वशांती समृद्धीची प्रार्थना बृहदारण्यक उपनिषदे आहे. ही उपनिषद अनादी कालातील असून श्रुती-स्मृती या माध्यमातून निर्माण झालेली आहेत. प्रत्यक्ष अनुभवजन्य ज्ञानावर आधारित अशी आहेत. उपनिषदे ही संमत भारतीय तत्वज्ञानाचे मूलस्त्रोत आहेत. समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी ऋषींनी यांची निर्मिती केली आहे. त्यावर आधारित योगेश्वर श्रीकृष्णाने अर्जुनाला कुरुक्षेत्रावर भगवद् गीता सांगितली. वैदिक धर्माचे हे मूलगामी तत्त्वज्ञान आणि विश्वातील इतर धर्म, संप्रदाय, तत्त्वज्ञान यातील समानतेचा धागा शोधायचा. हा अभ्यास सतत चालणारा आज अतिशय मूलगामी स्वरूपाचा आहे. यासाठी एखादे व्यासपीठ असावे, ज्यावरून या तत्त्वज्ञानाची, शास्त्रविनोदाची चर्चा होईल. आपण आपली मतमतांतरे मांडू. त्यासाठी प्रसंगी भांडू. पण वितंडवाद न घालता. यापाठीमागे असणारे मानवकल्याणचे सूत्र शोधून काढू. ईश्वरीय प्रवृत्तीचा मागोवा घ्यायचा असेल तर संत साहित्याभ्यासासारखे दुसरे साधन नाही. म्हणून हा धांडोळा घेण्यासाठी विश्वात्मक संत साहित्य संमेलनाचे प्रयोजन केले असल्याचे या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. मदन महाराज गोसावी यांनी नमूद केले आहे.

(लेखक ज्येष्ठ लोककला अभ्यासक आहेत.)
[email protected]