सोशल मीडियाचं गारूड

53

>> प्रसाद शिरगावकर

बस, लोकल, रेल्वे स्टेशन, विमानतळापासून अगदी बागा-उद्यानांपर्यंत कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी (स्वतःच्या मोबाईलमधून लक्ष काढून!) आजूबाजूला पाहिलं तर आजूबाजूचे बहुसंख्य लोक आपापल्या मोबाईलमध्ये गर्क असलेले दिसतात. यातले बहुसंख्य लोक फेसबुक-व्हॉट्सऍप-इन्स्टाग्राम या ‘सोशल मीडिया’वर पडीक असलेले दिसतात. खऱया जगात, खऱया समाजात वावरत असताना त्याकडे दुर्लक्ष करून सोशल मीडियावरच्या व्हर्चुअल समाजात वावरत राहण्याचं एक अनाकलनीय व्यसन आपल्याला लागत आहे.

नुकतीच व्हॉट्सऍपवर एक विनोदी व्हिडीओ क्लिप आली होती. एक मध्यमवयीन पुरुष ऑफिसहून दमून भागून घरी येत असतो. घराच्या लिफ्टमध्ये तो पूर्णवेळ आपल्या मोबाईलमध्ये बघत असतो. लिफ्ट थांबते. तो तसाच मोबाईलमध्ये बघत बघत घरापाशी जाऊन दाराची बेल वाजवतो. एक मध्यमवयीन महिला दार उघडते. तिचंही सर्व लक्ष स्वतःच्या हातातल्या मोबाईलमध्येच असतं. पुरुष सोफ्यावर बसतो, लक्ष मोबाईलमध्ये. महिला त्याला पाणी आणून देते. लक्ष मोबाईलमध्येच. किल्लीने दरवाजा उघडून अजून एक पुरुष घरात येतो. स्वतःच्या मोबाईलमधून मान वर करून बघतो तर घरात दुसराच कोणी पुरुष बसला आहे हे लक्षात येतं. आपलं घर चुकलं का काय असं वाटून ‘सॉरी’ म्हणत निघून जायला लागतो. त्याचं सॉरी ऐकून तिघं मोबाईलमधून माना वर करून एकमेकांकडे बघतात आणि काय गोंधळ झालाय तो त्यांच्या लक्षात येतो!!

या विनोदात थोडी अतिशयोक्ती असली तरी, आपण मोबाईल-डिजिटल-सोशलच्या आभासी जगात आकंठ बुडून जात आहोत आणि आपलं प्रत्यक्ष जगाचं भान सुटत चाललं आहे यावरचं हे भाष्य आहे. आणि हा विनोद गांभीर्यानं घ्यावा अशी परिस्थिती आपल्या आजूबाजूला निर्माण होताना दिसत आहे.

बस, लोकल, रेल्वे स्टेशन, विमानतळापासून अगदी बागा-उद्यानांपर्यंत कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी (स्वतःच्या मोबाईलमधून लक्ष काढून!) आजूबाजूला पाहिलं तर आजूबाजूचे बहुसंख्य लोक आपापल्या मोबाईलमध्ये गर्क असलेले दिसतात. यातले बहुसंख्य लोक फेसबुक-व्हॉट्सऍप-इन्स्टाग्राम या ‘सोशल मीडिया’वर पडीक असलेले दिसतात. खऱया जगात, खऱया समाजात वावरत असताना त्याकडे दुर्लक्ष करून सोशल मीडियावरच्या व्हर्चुअल समाजात वावरत राहण्याचं एक अनाकलनीय व्यसन आपल्याला लागत आहे.

जी गोष्ट सार्वजनिक जागांची तीच कौटुंबिक किंवा सामाजिक सण-सोहळ्यांची. कोणत्याही सण समारंभासाठी एखाद्या कार्यालय-सभागृहात जमलेल्या लोकांपैकी अनेक लोक आपापल्या मोबाईलमध्ये गर्क असलेले दिसतात. अगदी पूर्णवेळ गर्क रहात नाहीत, पण इतरांशी बोलता बोलता दर काही मिनिटांनी आपला मोबाईल उघडून ‘व्हॉट्सऍपवर काय नवं आलंय’ हे बघण्याचा चाळा अनेकांना लागलेला दिसतो आहे. शिवाय कोणतीही चार माणसं कुठेही एकत्र भेटली की एकमेकांसोबतचे ‘सेल्फी’ काढून ते लगेच सोशल मीडियावर पोस्ट करणं हा नवा सामाजिक संकेत बनत चालला आहे. सण-समारंभांमध्ये भेटणाऱया मित्र-नातेवाईक अशा सगळ्यांचे खरंतर व्हॉट्सऍप ग्रुप असतातच हल्ली. व्हर्चुअली ही मंडळी रोज भेटत असतातच. अन् गंमत म्हणजे, सण-समारंभात प्रत्यक्ष भेटल्यानंतरही, ‘ते अमुक तमुक पाठवलेलं वाचलं का?’ किंवा ते ‘तमुक तमुक खूप भारी होतं’ असे विषय असायला लागले आहेत.

सार्वजनिक ठिकाणं, सामाजिक समारंभांमध्ये जसा आणि जितका आहे, तसा आणि तितकाच हा सोशल मीडिया घराघरातही घुसायला लागला आहे. कुटुंबातल्या प्रत्येकाच्या हातात स्वतःचा मोबाईल (किंवा टॅब्लेट) असणं ही हल्ली अत्यावश्यक गोष्ट बनत चालली आहे. प्रत्येकाला स्वतःचा डेटा पॅक असणं किंवा घरात वाय-फाय असणं हे सर्वसाधारण बनत चाललंय. आणि अर्थातच घरातली प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या सोशल मीडियावर असणं हे वास्तव होत चाललं आहे. डायनिंग टेबलवर जेवणासाठी एकत्र जमलेल्या कुटुंबातले सर्वजण आपापल्या मोबाईलमध्ये, आपापल्या ‘सोशल’ जगात गुंतलेले दिसणं हे फार दुर्मिळ चित्र राहिलेलं नाही.

सार्वजनिक, सामाजिक आणि कौटुंबिक आयुष्याइतकाच, किंबहुना जरा जास्तच धुमाकूळ सोशल मीडियामुळे आपल्या व्यक्तिगत आयुष्यातही होत आहे. सकाळी जाग येता क्षणी मोबाईल चालू करून सोशल मीडियावर काय सुरू आहे हे बघण्याची अनावर ओढ अनेकांना असलेली दिसते. फेसबुकवर पोस्ट, कमेंट्स, लाईक्स करणे, व्हॉट्सऍपवरचे सर्व ग्रुप्समधले आणि वन-टू-वन आलेले मेसेजेस वाचणे आणि पुढे पाठवणे ही आपल्या दिनचर्येमधली अत्यंत महत्त्वाची कामं बनत चालली आहेत. अहोरात्र सोशल मीडियावर वावर सुरू ठेवणे ही आपली नवी गरज बनत चालली आहे.

आपल्याला सोशल मीडियाची इतकी चटक (आणि कदाचित व्यसन) लागण्याची खरंतर काही सबळ कारणंही आहेत. ‘जी व्यक्त होते ती व्यक्ती’ अशी व्याख्या मान्य केली तर व्यक्त होणं अन् संवाद साधणं या आपल्या सगळ्यांच्याच मूलभूत गरजा आहेत. सोशल मीडियाने आपल्याला व्यक्त होण्यासाठी नवी व्यासपीठं आणि संवाद साधण्यासाठी नवी माध्यमं दिली आहेत. ही व्यासपीठं वापरायला अत्यंत सोपी आहेत, सहज उपलब्ध आहेत आणि सर्वांसाठी खुली आहेत. कोणालाही, कधीही हवं तसं व्यक्त होण्याची मुभा सोशल मीडियामुळे मिळाली आहे. तसंच कोणाशीही, कधीही संवाद साधण्याचीही सोय सोशल मीडियामुळे झाली आहे. शिवाय प्रत्यक्ष आयुष्यात जे घडू शकत नाही अशा अनेक गोष्टी सोशल मीडियामुळे घडायला लागल्या आहेत. उदाहरणार्थ, आपल्या ओळखीच्या वा अनोळखी अशा शेकडो जणांच्या आयुष्यात काय सुरू आहे याचे अपडेट्स काही क्षणांत मिळणे. कोणतीही घटना घडली की त्यावर तातडीने व्यक्त होऊ शकणे आणि इतर लोकांच्या अभिव्यक्ती वा मतं जाणून घेऊ शकणे. वर्षानुवर्षं न भेटलेल्या किंवा हजारो मैल दूर राहणाऱया मित्रमंडळींशी रोज व्हर्चुअली गप्पा मारू शकणे. या आणि अशा अनेक कारणांनी सोशल मीडियाने आपल्यावर गारूड घातलेलं आहे.

सोशल मीडियाचं गारुड इतकं विलक्षण ताकदवान आहे की, त्यानं आपल्या सार्वजनिक आयुष्यापासून व्यक्तिगत आयुष्यापर्यंतचे सर्व आयाम व्यापले जात आहेत, भारून जात आहेत. आपल्या आयुष्यात खऱया जगाइतकंच आभासी जगही नांदायला लागलं आहे. खऱया नात्यांइतकंच आभासी नात्यांनाही महत्त्व यायला लागलं आहे. क्वचित आभासी जगातल्या आभासी नात्यांना भुलून खऱया जगातल्या खऱया नात्यांकडे दुर्लक्षही व्हायला लागलं आहे.

सोशल मीडिया आहे, तो राहणार आहे आणि आपल्या जगण्यावरचं त्याचं गारूड वाढतच जाणार आहे हे स्पष्ट दिसत आहे. आपल्या जगण्याच्या, व्यक्त होण्याच्या, समाजाशी जोडलं जाण्याच्या, समाजातल्या वावराच्या अनेक आयामांमध्ये सोशल मीडियामुळे उलथापालथ होते आहे, होत रहाणार आहे. मात्र, हे सारं कोणत्या दिशेला जात आहे याची कल्पना नाही. अन सोशल मीडियामुळे होत असलेली अफाट उलथापालथ थांबवणं हे कोणा एकाच्या हातातही नाही. मात्र, आपल्या आयुष्यावर सोशल मीडियाचा काय परिणाम होतो आहे हे तपासत रहाणं अन् आपण सोशल मीडियासाठी नसून सोशल मीडिया आपल्यासाठी आहे याचं भान ठेवून वावरणं इतकंच आपल्या हातात आहे.

(लेखक मुक्तस्रोत तंत्रज्ञानामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणारे प्रशिक्षक आणि वक्ते आहेत)
– [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या