सुट्टीतला गारवा… पेप्सीकोला !

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> रश्मी वारंग

बालपणीचा काळ सुखाचा करणाऱ्या विविध गोष्टींपैकी एका पिढीचं बालपण ज्या पदार्थाने रंगीबेरंगी, गार करून सोडलं होतं तो पदार्थ म्हणजे पेप्सीकोला. प्लॅस्टिकच्या उभट पाऊचमधून चाराणे-आठाणे ते एक रुपयात मिळणारे हे पेप्सीकोला म्हणजे भन्नाट गोष्ट होती. त्याच पेप्सीकोलाची ही गारेगार कहाणी.

वेगवेगळी केमिकलवाली सरबतं गोठवून प्लॅस्टिक बॅगेतून विकणं हा काही मोठा शोध नाही. या शोधाचं जनकत्व कुणा एकाला देता येत नाही, पण उच्च प्रुक्टोज कॉर्न सिरप, कॉन्सन्ट्रेट, सायट्रिक ऑसिड, सोडियम बेंझोएट आणि पोटॅशियम सॉर्बेट यापासून बनवलेल्या कृत्रिम गोड, रंगीत पेयाला गोठवून ते व्यावसायिकरीत्या विकण्याचं श्रेय जेल सर्टला जातं. या अमेरिकन व्यावसायिकाच्या खाद्यपदार्थांशी निगडित अनेक उद्योगांपैकी हा एक उद्योग होता. पेप्सीकोलाला विविध ब्रँड नावाने विकले गेले. पॉप आइस, ऑटर पॉप्स, फ्ला-वोर-आइस असे हे ब्रँड.

आपल्याकडे मात्र या पॉप आइसचं नाव पेप्सीकोला होण्यामागे दोन कारणं असावीत. त्या काळात पेप्सी आणि कोकाकोला हे ब्रँड सुपरिचित होते. ती लोकप्रियता या पेप्सीकोलाच्या संगमातून वापरण्यात आली असावी. दुसरी एक शक्यता म्हणजे गोठवलेल्या आइस्क्रीमसदृश मिश्रणाला काठीवर अडकवून खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे पॉप्सिकल. पॉप्सिकल म्हणजे आइसपँडी. त्या पॉप्सिकलचा अपभ्रंश होऊन पेप्सीकोला झालं असावं.

इतिहास काही असू दे, अनेकांचा शाळेचा पंटाळवाणा रस्ता या पेप्सीकोलाने सुसह्य केला. एकतर शाळेतल्या पाकिटाला परवडणारी ती एकच गोष्ट होती. ऑरेंज, कालाखट्टा, लेमन अशा टिपिकल स्वादात हे पेप्सीकोला मिळायचे. रोजच्या दिवशी चाराणे-आठाण्यात काम भागायचे. परीक्षेचा निकाल किंवा एखादा प्रसंग साजरा करायचा असेल, तर अख्खा एक रुपया देऊन दूध कोल्ड्रिंकवाली पेप्सी घ्यायची. इतरांच्या चाराण्या-आठाण्याच्या पेप्सीकोलासमोर आपला दूध कोल्ड्रिंकवाली पेप्सी चघळत जाणं म्हणजे त्या वयातली अपार श्रीमंती. अनेक चढउतार या पेप्सीकोलाच्या साथीने साजरे झाले असतील.

उन्हाळी सुट्टीत एक-दोन नाही, तर घरातल्या सगळय़ांच्या हिशोबाने चांगले 25-30 पेप्सी घरात यायचे आणि घरातलेसुद्धा ‘खा लेको किती खाता तितके खा’ म्हणून उदार व्हायचे.

उदारीकरणाच्या काळात वेगवेगळे नवनवे ब्रँड मार्पेटमध्ये आले. 5 रुपयांचं आईस्क्रीम परवडू लागलेल्या पिढीला या पेप्सीकोलाचं महत्त्व जाणवेनासं झालं आणि हळूहळू ती व्रेझ कमी झाली. आजही पेप्सीकोला मिळतो, पण पूर्वीसारखा तो ‘परंतु या सम हा’ उरलेला नाही.

फूड अॅपवर स्टायलिश रूपात हा पेप्सी पुन्हा भेटायला येऊ लागलाय, पण चाराण्या-आठाण्याची सर त्याला नाही. जेव्हा कधी पेप्सीकोला समोर येतो, तेव्हा चित्रपटात दाखवतात तसा फ्लॅशबॅक सुरू होतो.

हातातले चाराणे चाचपडत दुकानदाराकडून ऑरेंज नाहीतर कालाखट्टा पेप्सी मित्र-मैत्रिणींच्या सोबतीने घेतला जाई. आपल्या हातात ऑरेंज पेप्सी आली तरी दुसऱयाचा कालाखट्टा हक्काने चाखणं कम्पल्सरी होतं. पाणथळलेला पेप्सी असेल तर सुरकन प्यायचा आणि बर्फाळ घट्ट पेप्सी असेल तर आधी त्यातला ऑरेंजी नाहीतर कालाखट्टा स्वाद शोषून शोषून आतला पांढरा बर्फ उघडा पाडायचा हे एक जबरदस्त काwशल्य होतं. या पेप्सीकोलाने कितीतरी मैत्री घट्ट केल्या, जिंकलेल्या
मॅचेसचा आनंद द्विगुणित केला आणि फ्रिज वगैरे अप्रूप असण्याच्या काळात आपलं बालपण रंगीबेरंगी गारेगार केलं. रंगलेल्या काळय़ा, केशरी जिभा एकमेकांना दाखवण्यातला तो आनंद काही औरच!