
>> शिरीष कणेकर
आज लताचं तेरावं आहे. लिहितानाही कसंसंच होतंय. हे लिहिण्याची वेळ येईल असंही कधी वाटलं नव्हतं. चंद्र, सूर्य व लता आम्ही आहोत तोवर असणार होते, पण आम्ही आहोत आणि ती नाही. तीच ‘सिपाईया’मध्ये गायली होती- ‘ऐ आँख अब न रोना, रोना तो उम्रभर है…’
लता गेल्यावर कोणाला फोन करायचा, कोणाचं सांत्वन करायचं, कोणाशी मन मोकळं करायचं हेच मला कळत नव्हतं. कितीतरी वाचक मलाच फोन करून दुःखावेगाला वाट मोकळी करून देत होते. मी माझी भडास कुठे काढू?
तोच सकाळी मला उषाताईंचा – उषा मंगेशकरांचा फोन आला. घायल की गती घायल जाने, और न जाने कोय!
‘कशा आहात उषाताई? थोड्या सावरलात का?’
‘चॉइस काय आहे?’ उषाताई हताशपणे म्हणाल्या, ‘जगत राहणं भाग आहे. दीदीशिवाय जगायची सवय नाही हो. वयाच्या सहाव्या वर्षीपासून तिचं छत्र माझ्या डोक्यावर होतं. आता मी सर्वार्थानं पोरकी झाल्येय. एकटी पडल्येय. मला काही सुधरतच नाही.’
‘ती बरी होऊन परत येणार याबद्दल आमची खात्री होती. ‘व्हेंटिलेटर’मधून तिला बोलता यायचं नाही, पण ती खाणाखुणांनी काय काय सांगायची. हसायची. आमची दीदी लढवय्यी होती. त्या शारीरिक दुरवस्थेतही ती कधी निराश, खचलेली दिसली नाही.’
‘डॉ. समदानी व त्यांच्या टीमने अक्षरशः जीव ओतून दीदीची सेवा केली. स्वतःचा प्राण देणं तेवढं बाकी ठेवलं. आठवडाभर ते घरी गेले नाहीत की झोपले नाहीत. ते आमच्या कुटुंबाचे एक बनून आमचं दुःख, आमची काळजी वाटून घेत होते. तिचा न्यूमोनिया पूर्ण बरा झाला होता. कोविडमधूनही ती बाहेर पडली होती. तिचे सगळे ‘एक्स रे’ व ‘एम.आर.आय.’ उत्तम होते. मेंदू व्यवस्थित काम करीत होता. आम्ही तिला घरी न्यायला उत्सुक होतो. तिलाही लवकरात लवकर घरी परतायचं होतं.’
‘तिच्या स्वागताची आम्ही जय्यत तयारी केली होती. दोन स्वयंपाकी आणि दोन मोलकरणी ठेवल्या होत्या. तिच्या दारावर तिची औषधे व ती घ्यायच्या वेळा लिहून ठेवलेल्या होत्या. होमहवन व जपजाप्य तर रात्रंदिवस चालू होते. एक देवी नसेल जिला आम्ही साकडं घतलं नाही.’
‘मध्यंतरी हृदयनाथ आजारी होता. तो बारीक झाला होता. त्यामुळे आजारी दीदीचं काळीज तीळ तीळ तुटत होतं. स्वतः स्वयंपाक करून त्याला जेवायला घालत होती. त्याच्या पानात न विसरता तूप वाढायची.’
‘दीदी हॉस्पिटलातून केव्हा परत येत्येय याच्याकडे आम्ही डोळे लावून बसलो होतो.
आणि अकस्मात दीदी गेली. डॉ. समदानी लहान मुलासारखा ओक्साबोक्सी रडला.’
‘अख्खा देश रडला, उषाताई.’ मी भावना आवरत म्हणालो.
‘आता पुढे मी काय करणार आहे, कशी जगणार आहे तेच मला कळत नाही.’ उषाताई सद्गदित होत म्हणाल्या.
लता माझ्या मनात गात होती –
‘मर गये हम जीते जी मालिक तेरे संसार में…’





























































