विशेष – जपूया मराठी वसा!

>> वर्षा चोपडे

शिवरायांच्या कर्तृत्वाचा
येथे सर्वदूर आहे ठसा
पवित्र टिळा माथी
आम्ही जपतो मराठी वसा ।
अखंड लाडका महाराष्ट्र
आमची असे अस्मिता
आम्ही जपतो धर्म मर्यादा
शत्रूंना नाही येथे थारा ।

महाराष्ट्राला अनोखा सांस्कृतिक वारसा आहे. परंपरा, सण, उत्सव, लोककला हे यातील अविभाज्य घटक आहेत. विविधतेने नटलेले, प्राचीन वैभव लाभलेले महाराष्ट्र हे सुंदर राज्य आहे. अशा सुंदर राज्याचे ‘मी मराठी महाराष्ट्र माझा’ हेच ब्रीद असायला हवे.

15 ऑगस्ट 1947 रोजी हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळाल्यावर प्रांत व राज्यांची पुनर्रचना प्रािढयेत भाषावार प्रांतरचनेच्या विचाराचे वर्चस्व होते. तरीही हिंदुस्थान सरकारने मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्मितीस नकार दिला. केंद्राच्या या पवित्र्याच्या विरोधात महाराष्ट्रातील जनतेने प्रखर आंदोलन केले. यात 105 व्यक्तींनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. बुद्धिवादी, लेखक, पत्रकार आणि मराठी भाषिक एस. एम. जोशी, शाहीर साबळे, आचार्य प्र. के.अत्रे, कॉ. श्रीपाद अमृत डांगे, सेनापती बापट, प्रबोधनकार ठाकरे यांच्यासह अनेक जण नवमहाराष्ट्रासाठी एक झाले आणि संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार केले. 1 मे 1960 रोजी अनेक राज्यांच्या विभाजनापासून महाराष्ट्र राज्य स्थापन केले गेले.

1 मे हा दिवस महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी सार्वजनिक सुट्टीचा एक वेगळाच जल्लोष राज्यात बघायला मिळतो. मराठी माणसांसाठी हा अभिमानाचा दिवस आहे. शिवाय हा दिवस ‘कामगार दिवस’ म्हणूनही साजरा केला जातो. कविवर्य राजा निळकंठ बढे यांच्या “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” या गीतामधील दोन चरणांचे गीत महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला आणि 19 फेब्रुवारी 2023 ला महाराष्ट्राला स्वतचं राज्यगीत मिळालं. छत्रपती शिवाजीराजांचे राज्य अशी महाराष्ट्राची ओळख आहे. महाराष्ट्राला ऋग्वेदामध्ये ‘राष्ट्र’ या नावाने संबोधले गेले आहे. अशोकाच्या काळात ‘राष्ट्रिक’ आणि नंतर ‘महाराष्ट्र’ या नावाने ओळखले जाऊ लागले असे चिनी प्रवाशी ह्युएन-त्सांग व इतर प्रवाशांच्या नोंदींवरून दिसून येते. हे नाव प्राकृत भाषेतील ‘महाराष्ट्री’ या शब्दावरून पडले असण्याची शक्यता आहे, तर काहींच्या मते महाराष्ट्र म्हणजे महान असे राष्ट्र होय. काही जण महाराष्ट्र या शब्दाचा अर्थ मर ठ व रट्टा यांच्याशी लावतात, परंतु काहींच्या मते हे नाव महाकांतार (महान वने- दंडकारण्य) या शब्दाचा अपभ्रंश आहे.

पाधर स्वामी यांनी ‘महंत म्हणूनी महाराष्ट्र बोलिजे’ अशी व्याख्या केली आहे. महाराष्ट्राला जगद्गुरू संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत नामदेव, संत गाडगेबाबा, संत मुक्ताई यांसारख्या अनेक महान संतांचा वारसा लाभला आहे. त्यामुळे या राज्यास ‘संतांची भूमी’ असेदेखील म्हटले जाते. या महाराष्ट्राने फुले, डॉ. आंबेडकर, आगरकर, विनोबा भावे, सावित्रीबाई फुले, लोकमान्य टिळक, सावरकर यांच्यासारखे महान व्यक्तिमत्त्व जगास दिले. प्रसिद्ध, गायक, संगीतकार, लेखक, शास्त्रज्ञ आणि अनेक वीर जवान दिले. देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहे ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

पंढरपूरचे दैवत भगवान विठ्ठल हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. पुणे शिक्षणाचे माहेरघर बुद्धिवादी लोकांसाठी ओळखले जाते. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र येथे भाषेची बोलपद्धती थोडी वेगळी वेगळी जाणवते. महाराष्ट्रातील मुंबईचे डबेवाले, कोल्हापूरची चप्पल, नागपूरची संत्री आणि सोलपुरी चादरी जगभर प्रसिद्ध आहे. नववारी साडी, नथ आणि पैठणी महाराष्ट्राची शान आहे. शिक्षण, सहकार, कृषी, ाढाrडा, संस्कृती, साहित्य, कला, नाटय़, चित्रपट, संगीत, उद्योग, संगणक, विज्ञान अशा विविध क्षेत्रांत महाराष्ट्राने आपली वेगळी छाप सोडली आहे. शेतकऱयांचे राज्य असलेल्या महाराष्ट्रात अनेक पिके येथे घेतली जातात.

महाराष्ट्राला अनोखा सांस्कृतिक वारसा आहे. परंपरा, सण, उत्सव, मराठी लोककला जीवनाचा अविभाज्य घटक आहेत. गणेश उत्सव बघण्यास जगभरातून लोक येतात. तमाशा हा नृत्यप्रकार, भारुडे आणि संगीत नाटके मनोरंजनाचा भाग आहे. राम प्रहर झाला असे म्हणून गाव जागे करणारा वासुदेव केवळ महाराष्ट्रात बघायला मिळतो. महाराष्ट्र विविधतेने नटलेले प्राचीन वैभव लाभलेले सुंदर राज्य आहे. मी मराठी महाराष्ट्र माझा म्हणणाऱया तमाम लोकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा. जय महाराष्ट्र!

(लेखिका राजगिरी कॉलेज ऑफ सोशल सायन्सेस, कोची, केरळच्या महाराष्ट्रातील संपर्क अधिकारी म्हणून नियुक्त आहेत.)