दिल्ली डायरी – बिगुल फुंकले; ‘तुतारी’ कोण वाजवणार?

1167

>> नीलेश कुलकर्णी, [email protected]

कडाक्याची थंडी असली तरी जेएनयू प्रकरणामुळे तसेच एनआरसी विरोधातील आंदोलनामुळे थंडीतही दिल्ली कमालीची धुसफुसतेय. अशा विचित्र वातावरणात दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीचे बिगुल निवडणूक आयोगाने फुंकले आहे. दिल्लीसारखे राज्य ताब्यात घेण्यापेक्षा विद्यमान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना राजकीयदृष्टय़ा कसे बेदखल करता येईल याचा प्रयत्न भाजपकडून होत आहे. अर्थात केजरीवाल यांच्याकडे विकासकामांची तुतारी आहे. ते सवयीप्रमाणे ती जोरजोरात वाजवत आहेत तर भाजपकडून राष्ट्रवादाची तुतारी वाजवणे सुरू आहे. आता दिल्लीकर कोणाच्या विजयाची तुतारी फुंकतात, ते निकालानंतर कळेलच.

दिल्लीत केजरीवालांचा ‘झाडू’ भाजप आणि काँग्रेसची साफसफाई करणार असे अंदाज निवडणूकपूर्व सर्वेक्षणात वर्तविण्यात येत आहेत. मावळत्या वर्षी झारखंडच्या पराभवाने तोंड कडवट झालेल्या सत्ताधाऱयांसाठी नववर्षाचीही सुरुवात कडवट होणार अशी चिन्हे आहेत. दिल्लीसारख्या कॉस्मोपॉलिटिन राज्यात दुसरा प्रभावी मुद्दा हाताशी नसल्याने हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरणावरच भाजपची भिस्त आहे. गेल्या वेळच्या निवडणुकीत दिल्लीकरांनी केजरीवालांना तब्बल 67 जागा देऊन मुख्यमंत्रीपदावर सन्मानाने बसवले होते. अवघ्या तीन जागा मिळवत भाजपने थोडी इभ्रत वाचवली होती. सलग 15 वर्षे दिल्लीत सत्ता गाजविणाऱया काँग्रेसला तर भोपळाही फोडता आला नव्हता. अर्थात गेल्या पाच वर्षांत यमुनेखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. तथापि केजरीवालांनी बाष्कळपणाला चिकटपट्टी लावून गांभीर्याने काम केल्यामुळे भाजपपुढच्या अडचणी खऱया अर्थाने वाढल्या आहेत. नुसत्या नौटंकीने राजकारणात फार काळ रेटता येत नाही हे केजरीवालांना उशिरा का होईना समजले हे बरेच झाले. अन्यथा दिल्लीत झाडाची फांदी जरी तुटली तरी केजरीवाल त्यासाठी पंतप्रधानांना जबाबदार धरत. त्यात हसू केजरीवालांचे होई आणि पंतप्रधानांना फुकटची सहानुभूती मिळत असे. केजरीवालांना नायब राज्यपालांकरवी सत्ताधाऱयांनी त्राही भगवान करून सोडल्यामुळे त्यांचा त्रागाही समजण्याजोगा असला तरी त्याचे समर्थन करता येणार नाही. मात्र केजरीवालांनी नौटंकीऐवजी विकासकामांचा अवघड मार्ग स्वीकारला आणि तो बऱयापैकी यशस्वी करूनही दाखवला. त्यामुळे मतदानाला बाहेर पडणारा झोपडपट्टय़ा, कच्च्या घरांमध्ये राहणारा वर्ग माफक दरातील पाणी व विजेमुळे केजरीवालांवर प्रचंड खूश आहे. शिक्षण क्षेत्रातील आमूलाग्र बदलामुळे मध्यम व उच्च मध्यमवर्गीयांमध्ये केजरीवालांबद्दल गुडविल आहे तर ‘मोहल्ला क्लिनिक’सारखी संकल्पना हिट झाली आहे. याचा अर्थ केजरीवालांचे राज्य म्हणजे काही रामराज्य नव्हे. त्यात त्रुटी जरूर आहेत, मात्र समस्यांच्या मुळाशी जाऊन भिडण्याची हिंमत त्यांनी दाखवली आहे हे मान्य करावे लागेल. याउलट विरोधी पक्षात आनंदीआनंद आहे. भाजपचे मनोज तिवारी आणि विजय गोयल यांच्यात मुख्यमंत्रीपदावरून आतापासूनच राजकीय हाणामाऱया सुरू आहेत. काँग्रेसमध्ये ही निवडणूक राहुल गांधींनी त्यांच्या टीमच्या हाती दिल्यामुळे दिल्लीतले म्हातारे अर्क नाराज आहेत. गेल्या वेळी काँग्रेसचा भोपळाही फुटला नव्हता. यावेळी किमान ‘भ्रमाचा भोपळा’ तरी फुटेल अशी अपेक्षा होती, मात्र काँग्रेसमधील ‘म्हातारे’ फारसे काही घडू देतील असे वाटत नाही. जेएनयू प्रकरण कितपत चिघळेल यावरही पुढचे गणित अवलंबून असेल. सद्यस्थितीत तरी केजरीवाल हे भाजपला वरताण ठरतील अशीच चिन्हे आहेत.

‘कैलाश छाप’ माचिस
बेताल बडबडू नका, तोंडाला कुलूप घाला असा संदेश पंतप्रधानांनी कित्येकदा देऊनही भाजपच्या नेत्यांवर त्याचा काडीमात्र फरक पडताना दिसत नाही. भाजपचे मध्य प्रदेशचे नेते कैलाश विजयवर्गीय यांच्या ‘काडीलावू’ विधानाने सध्या खळबळ माजली आहे. विजयवर्गीय हेही भाजपातले एक स्ट्रटेजिस्ट वगैरे आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजपने लोकसभेच्या 18 जागा जिंकल्यानंतर त्यांची वाहवा झाली होती. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्रीपद मिळावे म्हणून या विजयवर्गीय यांनी भाजपचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना त्राही भगवान करून सोडले होते. सुमित्रा महाजन यांच्याशी तर त्यांचा छत्तीसचा आकडा. विजयवर्गीय नेहमीच वादग्रस्त बरळत असतात. मात्र आताचे बरळणे त्यांच्या अंगाशी आले आहे. ‘इंदूर मैं आग लगा देता’, असे बेताल वक्तव्य करून विजयवर्गीय यांनी काँग्रेसला आयतीच संधी दिली आहे. तेथील कमलनाथ सरकारने विजयवर्गीय यांच्यासह 350 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी रातोरात कैलाश विजयवर्गीय यांचा फोटो असलेल्या काडेपेटय़ा तयार करून घरोघर वाटून त्यावर ‘इंदूर मे आग लगा देता’, असा मजकूरही छापला आहे. कैलाश विजयवर्गीय यांची ‘माचिस’ भाजपला आणखी किती ‘चटके’ देते ते भविष्यात दिसेलच.

विद्वान ‘डीपीटी’
गंगा, यमुना आणि सरस्वतीचा संगम असणाऱया पवित्र प्रयागराजमधून पुढे येत अलाहाबाद विद्यापीठ ते देशाच्या संसदेपर्यंत आपल्या विद्वत्तापूर्ण भाषणांची छाप सोडणारे देवीप्रसाद त्रिपाठी यांचे नुकतेच निधन झाले. ‘डीपीटी’ या नावाने दिल्लीच्या राजकीय वर्तुळात लोकप्रिय असणाऱया त्रिपाठींचे व्यक्तित्त्व विलक्षण होते. आणीबाणीविरोधातील आंदोलनात त्रिपाठी आणि अरुण जेटली तुरुंगात एकाच खोलीत होते. तिथे त्यांचे मैत्रबंध जुळले ते कायमचे. आणीबाणीतून सुटका झाल्यानंतर बाहेर त्रिपाठींच्या स्वागताला उभी असलेली पहिली व्यक्ती म्हणजे अरुण जेटली. त्यानंतर दोघांचा राजकीय प्रवास वेगवेगळ्या विचारधारांमुळे वेगवेगळ्या दिशेने झाला. राजीव गांधी पंतप्रधान असताना डीपीटी त्यांचे खासम्खास बनले. तोच विश्वास त्यांनी नरसिंह रावांचाही संपादन केला. सोनियांच्या विदेशी मुद्दय़ावरून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तिथेच ते शेवटपर्यंत स्थिरावले. त्यांची राज्यसभेतली अनेक भाषणे गाजली. त्याचबरोबर त्यांचे शेजारी देशातील सत्ताधाऱयांशी असलेले मैत्रीचे संबंधही एक कुतूहलाचा विषय असायचा. नेपाळमधील बहुतांश नेते हे या डीपीटींचे खास मित्र. एका डोळ्याने दिसत नसताना आणि दुसऱया डोळ्याने अंधुक दिसत असतानाही हा माणूस शेवटपर्यंत वाचत आणि लिहित राहिला. जिद्दीने पुढे गेला. ‘रसरंजन के साथ बौद्धिक चर्चा’ हा शब्दप्रयोग त्यांनी दिल्लीच्या पत्रकारांमध्ये लोकप्रिय केला. डीपीटी एकदा ‘ऑफ द रेकार्ड’ खुलले की पत्रकारांसाठी तो ‘ज्ञानाचा खजिना’ असायचा. स्वांतत्र्यपूर्व ते स्वातंत्र्योत्तर सरकारातले निरनिराळे राजकीय किस्से ते जबरदस्त पद्धतीने रंगवून सांगत. बौद्धिक उंचीच्या तुलनेने त्यांना राजकारणात तसे फारसे काही मिळाले नाही. राज्यसभेशिवाय त्यांच्या नशिबी काही आले नाही, मात्र त्यावर मोहोर उमटवून राजकारणातही विद्वतेला पर्याय नसतो हे सिद्ध करत ‘डीपीटी’ अनंताच्या प्रवासाला निघून गेले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या