हिंदुस्थान बनला X फॅक्टर

>> कर्नल अभय पटवर्धन

बालाकोट हल्ल्यामुळे हिंदुस्थानने पाकिस्तानी आण्विक हल्ल्याच्या धमकीचे समीकरण बदलवून टाकले आहे. आता हिंदुस्थान ‘हा नक्की काय करील’ याची खात्री नसणारा गणितातील ‘एक्स फॅक्टर’ बनला आहे. त्यामुळे पाश्चिमात्य दबावाखाली आपण राजकीय मुत्सद्देगिरीची कास धरू नये. चर्चेच्या आमिषांना बळी पडू नये, उलट हिंदुस्थानने या एक्स फॅक्टरचा फायदा उचलला पाहिजे.

राजकीय शिष्टाचाराची मागणी जरी हिंदुस्थान-पाकिस्तानदरम्यान शांततेच्या चर्चेची असली तरी या घटकेला वार्तालापाच्या माध्यमातून वातावरण निवळण्याची संधी साधण्याचा (डिफ्युज द क्रायसिस) विचारसुद्धा हिंदुस्थानने करता कामा नये. पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानी सिनेटमध्ये केलेल्या ‘शांती चर्चेसाठी आम्ही तयार आहोत’ या कुटील डावाला आपण बळी पडता कामा नये. भविष्यात कदाचित कमालीच्या आंतरराष्ट्रीय दडपणामुळे हिंदुस्थानला चर्चेसाठी होकार द्यावाही लागेल. तशी परिस्थितीदेखील निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्थिती सामान्य होण्यासाठी पाकिस्तानशी चर्चा करायला आपल्याला होकार द्यावा लागला तरी त्या चर्चेचा गाभा दहशतवाद नष्ट करण्याचाच पाहिजे. कारण पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी दिलेला प्रस्ताव वेळ काढण्याचा, छुपा आणि कुटील डाव असू शकतो. नव्हे, असेलच यात शंका नसावी. पाकिस्तान ऑल्वेज लीड्स इंडिया अप द गार्डन पाथ ऍण्ड वन्स द थिंग्ज कुल डाऊन, इट इज बॅक टू बिझनेस ऍज युजअल. त्यामुळे राजकीय शिष्टाचाराचे पालन करावे लागले तरी ते करताना हिंदुस्थान सामरिकदृष्टय़ा काहीही करू शकेल ही टांगती तलवार पाकिस्तान सरकार, तेथील लष्कर आणि आयएसआयच्या डोक्यावर आपण कायमच ठेवली पाहिजे. पाकिस्तानला सतत या दोलायमान दडपणाखाली ठेवण्याची (कीप द प्रेशर ऑन) योजना आखणे हिंदुस्थानसाठी आवश्यक असेल.

पुलवामाचा पाकिस्तानी हल्ला, 26 फेब्रुवारीला हिंदुस्थानने बालाकोटवर केलेला एअर स्ट्राईक आणि 27 फेब्रुवारीला पाकिस्तानच्या नौशेरा, पुंछवरील हवाई हल्ला यामुळे हिंदुस्थानी उपखंडात सामरिक तणाव निर्माण झाला आहे. घटना अतिशय वेगाने घडत आहेत आणि ‘एस्कलेशन लॅडर’ची पुढची पायरी केव्हा येईल, दोन्ही देश ती केव्हा चढतील हे येणारा काळच सांगेल. आपल्यासाठी या परिस्थितीत कमी खर्चिक, कमी धोक्याचे पर्याय उपलब्धच नाहीत. पाकिस्तानने दहशतवादाचा रस्ता सोडावा हे जसे आपण पाकिस्तानला पटवून देऊ शकत नाही किंवा सांगितलं तरी त्याला पटणार नाही, तसेच ‘स्ट्रटेजिक एस्कलेशन’च्या भीतीने यातून माघार घेणे हिंदुस्थानसाठीदेखील मानहानीकारक व सामरिकदृष्ट्या हाराकिरीच असेल.

जैश-ए-मोहम्मदच्या पाकव्याप्त कश्मीरमधील बालाकोटच्या अड्डय़ावर केलेल्या हवाई हल्ल्यामुळे हिंदुस्थानच्या दहशतवादविरोधी आणि एकूणच संरक्षण धोरणात लक्षणीय बदल झालेला दिसून येतो. मागील चार दशके आपला देश सीमेवर होणाऱया चकमकी किंवा पाकिस्तानी ‘छुप्या’ युद्धाला तोंड देतो आहे. यापूर्वी आण्विक हल्ल्याची भीती दाखवत पाकिस्तानने हिंदुस्थानच्या पारंपरिक युद्ध पद्धतीच्या सामरिक पर्यायांवर (ऑप्शन्स ऑफ कन्व्हेन्शनल कॉन्फ्लिक्ट) वचक ठेवला होता. पारंपरिक युद्धात पराभव पत्करावा लागल्यास पाकिस्तान आण्विक हल्ल्याची भीती दाखवून आपली सामरिक शक्ती आणि शस्त्रसज्जतेची कमतरता भरून काढत असे. कारगील युद्ध आणि संसदेवरील हल्ल्यानंतर ‘ऑपरेशन पराक्रम’च्या अकरा महिन्यांच्या तैनातीमधे तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींनी ‘कुठल्याही परिस्थितीत लाइन ऑफ कंट्रोल ओलांडू नका’ अशी कठोर हिदायत दिली होती किंवा मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर मनमोहन सिंग सरकारने प्रतिहल्ला केला नाही याचे मुख्य कारण हेच होते. मात्र केंद्र सरकारने उरी हल्ल्यानंतर स्थलसेनेच्या ‘सर्जिकल स्ट्राईक’चा पहिला बॉम्ब (फर्स्ट साल्व्हो) टाकला. हिंदुस्थानी सैन्याने ती कारवाई सीमापार केल्यामुळे पाकिस्तान सामरिकदृष्टय़ा स्तंभित झाला. अर्थात, हिंदुस्थानचे संरक्षण धोरण बदलले आहे हे सत्य पाकिस्तानने नाईलाजाने स्वीकारले असले तरी त्यापासून धडा मात्र घेतलेला नाही.

हिंदुस्थान सीमापार स्ट्राइक करायला कचरणार नाही, आपल्या आण्विक युद्धाच्या धमकीला तो आता भीक घालणार नाही हे पाकिस्तानच्या आकलन शक्तीच्या बाहेर होतं. बालाकोटवरील हिंदुस्थानी हवाई हल्ल्यापर्यंत हिंदुस्थानी उपखंडात हीच परिस्थिती होती. बालाकोटवरील हल्ल्यानंतर पाकिस्तानला काहीतरी जबाबी कारवाई करणे क्रमप्राप्त होते. कारण बालाकोट हल्ल्यामुळे आण्विक हल्ल्याच्या धमकीला (डेटरन्स डॉक्ट्रिन) हिंदुस्थान भीक घालत नाही हे उघड झालं होतं. मात्र 27 फेब्रुवारीला पाकिस्तानने हिंदुस्थानी सीमेच्या थोडंच आत जाऊन खाली जागा व शेतांवर विमानांच्या माध्यमातून बॉम्ब टाकून (शॅलो एअर रेड्स ऑन एम्प्टी प्लेसेस अक्रॉस एलओसी) ‘‘आम्हीदेखील तुमची री ओढू शकतो’’ हे दाखवून दिलं. त्याचबरोबर नॅशनल कमांड ऑथॉरिटीची बैठक बोलावून आण्विक हल्ल्याचं जुनंच तुणतुणं परत एकदा वाजवलं. ‘‘आम्हाला हिंदुस्थानबरोबर सामरिक तणावात राहावं लागलं तर तालिबानच्या शरणागतीची अफगाण शांतीवार्ता धोक्यात पडेल’’ अशी धमकी अमेरिकेला दिली. पुन्हा त्या जोडीला निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी चुपचाप हिंदुस्थानशी वार्तालाप सुरू करण्याची पेशकश केली. मात्र त्यामुळे हिंदुस्थानसाठी दुविधात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे.

पाकिस्तानने ‘आम्ही एस्कलेशन लॅडरची पायरी चढायला तयार आहोत’ हे दर्शवणारं आपलं आण्विक हल्ल्याच्या धमकीचं अस्त्र परत एकदा वापरलं असलं तरी ते कुठपर्यंत ताणायला तयार आहेत याचं मात्र आकलन होऊ शकलेलं नाही. एक मात्र खरं की, ते ही पायरी चढू शकतात याची जगाला जाणीव झाली आहे. एस्कलेशन लॅडरच्या पायऱ्या चढायची तयारी पाकिस्तानने दाखवल्यास आण्विक युद्धाच्या भीतीने जागतिक महाशक्ती मध्ये पडतील आणि तत्काळ युद्धबंदी करायला भाग पाडतील याची पाकिस्तानला खात्री होती असं म्हटल्यास ते वावगं होणार नाही. त्यामुळे जर हिंदुस्थानने आता तणाव कमी करण्यासाठी एकतर्फी माघार घेतली तर ती हिंदुस्थानची सामरिक कमजोरी समजण्यात येईल आणि ‘आपण न्यूक्लिअर डेटरन्ट पुन्हा एकदा प्रभावीपणे वापरू शकलो’ याची खात्री पटून पाकिस्तान चेकाळून उठेल आणि हिंदुस्थानवर जिहादी हल्ले करायला उद्युक्त होईल.

असे झाल्यास जिहादी हल्ल्यांच्या नव्या वावटळीला सक्षमरीत्या तोंड देणं हिंदुस्थानसाठी कठीण होईल. जे सरकार व जनतेला मान्य होणार नाही, पण हिंदुस्थानने डावपेचात्मक माघार न घेता सीमेपलीकडून होणाऱया जिहादी कारवायांचा बदला म्हणून घातक जमिनी हल्ले केले किंवा पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा भंग करण्याच्या प्रयत्नांना हवाई हल्ल्यांनीच उत्तर देत सामरिक तणाव कायम राखला आणि परिस्थिती तरल (फ्ल्युईड/इन स्टेट ऑफ फ्लक्स) ठेवण्यात यश मिळवले तर मात्र बालाकोट स्ट्राइकद्वारे हिंदुस्थानला मिळालेला ‘इनिशिएटिव्ह’ कायम राखता येईल. अर्थात हिंदुस्थानलादेखील एस्कलेशन लॅडरवर एकदोन पायऱया वर चढाव्या लागतील आणि हिंदुस्थानी लष्कर तसेच वायुदल कधी, कुठे, कसा व कितीही मोठा हल्ला करू शकतात या सामरिक जाळय़ात पाकिस्तानला अडकवून ठेवावे लागेल. बालाकोट हल्ल्यामुळे हिंदुस्थानने पाकिस्तानी आण्विक हल्ल्याच्या धमकीचे समीकरण बदलवून टाकले आहे. आता हिंदुस्थान ‘हा नक्की काय करील’ याची खात्री नसणारा गणितातील ‘एक्स फॅक्टर’ बनला आहे. त्यामुळे पाश्चिमात्य दबावाखाली गुडघे टेकून राजकीय मुत्सद्देगिरीची कास न धरता किंवा एक सामरिक पाऊल मागे घेत वार्तालापांच्या माध्यमातून सांप्रत संकट दूर करण्याच्या आमिषांना बळी न पडता हिंदुस्थानने या एक्स फॅक्टरचा फायदा उचलला पाहिजे.

ज्याला आम्ही फौजी लोक ‘कायनॅटिक ऑपरेशन्स’ म्हणतो अशी ऑपरेशन्स करणे, पाकिस्तानला सतत कारवाईच्या दडपणाखाली, भीतीखाली ठेवणे हा सकल दहशतवाद, जिहादीविरोधी धोरणाचा (टोटल ऑपरेशनल प्लॅन्स) एक हिस्सा आहे. हे उद्दिष्ट पूर्णत्वास नेण्यासाठी इतर गोष्टींचाही विचार करणे, त्यावर अंमल करणे अपेक्षित आहे. मुत्सद्देगिरी, सैनिकी कारवाई, शांती चर्चा, राजकीय शिष्टाचाराचे पालन आणि ‘कॅरट ऍण्ड स्टिक ऍप्रोच’ यांच्या आलटून पालटून वापरामुळे पाकिस्तान वठणीवर येऊ शकेल. त्याचप्रमाणे प्रत्येक वेळी प्रसारमाध्यमांमध्ये आपल्या यशाचा डंका वाजवून पाकिस्तानला खजील करणे आपल्यासाठी अडचणीचेही ठरू शकते. ‘डू नॉट ह्युमिलिएट युअर एनिमी आफ्टर हिज डिफिट फॉर, ही विल राईझ बॅक टू सीक रिव्हेंज. इन्स्टीड, शो हिम कर्टसी अँड ही वुड बिकम सबसर्व्हियन्ट’ हे दुसऱया महायुद्धात अण्वस्त्र वापरून जपानला शरण आणल्यानंतर अमेरिकन राष्ट्रपती थिओडोर रुझवेल्ट यांनी केलेले प्रतिपादन सदैव लक्षात ठेवले पाहिजे. हीच राजकीय व सामरिक मुत्सद्देगिरी आहे.

abmup54@gmail.com.