मुलांच्या मानसिक जडणघडणीत पालकांची भूमिका

>> मीनल सतीश सरकाळे

आपल्या मुलांचे मानसिक आरोग्य जर चांगले राखायचे असेल तर त्याची महत्त्वाची जबाबदारी पालकांची आहे. कारण या कोरोना महामारीच्या काळात मुलांची शाळा, त्यांचे मित्र त्यांच्यापासून दुरावले आहेत, त्यांच्याशी त्यांचा संपर्क होत नाही म्हणून पालकांना त्यांचे पालकत्व जपून त्यांचा शिक्षक, त्यांचा मित्र, मार्गदर्शक अशा अनेक भूमिका साकाराव्या लागणार आहेत. मुलांच्या या मानसिक जडणघडणीतील पालकांची भूमिका सर्वार्थाने महत्त्वाची आहे.

कोरोना आणखी काही महिने आपली पाठ सोडणार नाही. सहा महिन्यांपूर्वी जेव्हा हा साथीचा रोग पसरला तेव्हा सुरुवातीचा काळ अगदी क्रिटिकल म्हणजेच काळजीत गेला, पण तेव्हा आपणा सर्वांनाच हे लॉकडाऊन काळजीचे होते. हवेहवेसेसुद्धा वाटले. कारण सर्वच व्यवहार ठप्प होते. पण संपूर्ण कुटुंब एकत्र होतं, एकमेकांना वेळ देता येत होता. आता मात्र हे पूर्वीसारखे राहिले नाही. आपल्या प्रत्येकाचाच मानसिक ताण वाढत चालला आहे. वेगवेगळ्या, विशेषतः आर्थिक समस्यांनी प्रत्येकालाच ग्रासले आहे. मोठय़ा व्यक्तींबरोबरच शालेय मुलांनादेखील कोरोनामुळे उद्भवलेला मानसिक ताण सहन करावा लागत आहे. या सर्वांवर कहर म्हणजे कोरोनाकाळात सुरू झालेली ऑनलाइन एज्युकेशनची नवीन शिक्षण पद्धत! यामुळे त्यांच्या बालमनावर किती ताण पडत असेल याचा कोणी विचार करतेय का? ही मुलं लहान आहेत म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. उलट हे त्यांचे असे वय आहे ज्यात आपण त्यांचे मानसिक आरोग्य चांगले जपू शकतो.

मुलांच्या 9 ते 18 वर्षांपर्यंतच्या वयात मेंदूच्या जोडण्या बळकट होण्याचा व सैलावण्याचा दर अतिशय जास्त असतो. त्यामुळे आपण जेवढे चांगले अनुभव त्यांना वारंवार देऊ तितक्या त्यांच्या मेंदूच्या जोडण्या अधिक बळकट होण्यास मदत होईल. म्हणूनच या काळात त्यांचे मानसिक आरोग्य जपणे खूपच गरजेचे आहे.

आपल्या मुलांचे मानसिक आरोग्य जर चांगले राखायचे असेल तर त्याची महत्त्वाची जबाबदारी पालकांची आहे. कारण या कोरोना महामारीच्या काळात मुलांची शाळा, त्यांचे मित्र त्यांच्यापासून दुरावले आहेत, त्यांच्याशी त्यांचा संपर्क होत नाही म्हणून पालकांना त्यांचे पालकत्व जपून त्यांचा शिक्षक, त्यांचा मित्र, मार्गदर्शक अशा अनेक भूमिका साकाराव्या लागणार आहेत. मुलांच्या या मानसिक जडणघडणीतील पालकांची भूमिका सर्वार्थाने महत्त्वाची आहे.

संयमीपणा

सर्वप्रथम स्वतः संयमी राहून आलेल्या परिस्थितीला हसतमुखाने सामोरे जा. कोरोनाची चर्चा घरात करणे थांबवा. भीतीची भाषा वापरल्यानेसुद्धा नकारात्मक भावनांमध्ये वाढ होते व मुलांच्या मनात जास्त भीती निर्माण होते. ‘

पौष्टिक आहार

पोषणयुक्त आहार खूपच महत्त्वाचा आहे. असा आहार दिल्याने मुले सहसा आजारी पडत नाहीत. त्यांची खेळण्याची, शिकण्याची व परस्पर संवाद साधण्याची क्षमतादेखील वाढते. म्हणून आहे त्या घरगुती सामानातून आपण आपली कल्पकता वापरून वेगवेगळे खाद्यपदार्थ बनवून पोषणयुक्त आहार मुलांना देऊ शकतो आणि ते अत्यंत गरजेचे आहे.

सुसंवाद

आपल्या मुलांना ते घरातील एक महत्त्वाचा घटक आहेत याची जाणीव करून द्या. हाच काळ आहे की तुम्ही जास्तीत जास्त मुलांच्या जवळ जाऊ शकता. घरातील निर्णयांमध्ये त्यांना मत मांडण्याची मुभा द्या. त्यांच्याशी सुसंवाद साधा. त्यांना घरातील छोटी छोटी कामे करायची सवय लावा. त्यामुळे त्यांच्यात स्वावलंबन तर येईलच पण तुम्हालादेखील मदत मिळेल.

मार्गदर्शक

शिक्षक म्हणूनदेखील पालकांची जबाबदारी महत्त्वाची आहे. त्यांच्या अभ्यासात त्यांना मदत करा. ऑनलाइन एज्युकेशनमध्ये त्यांच्यावर लक्ष ठेवा. परीक्षा काळात त्यांचे निरीक्षण करा. त्यांच्या शिक्षकांकडून फोनच्या माध्यमातून, व्हाट्सऍपच्या माध्यमातून अभ्यासाचे अपडेट घेत राहा.

वेळापत्रक

त्यांच्या दैनंदिन जीवनाचे एक वेळापत्रक बनवा. नाही तर बहुतेक मुलं सुट्टी म्हणून झोपण्यात वेळ घालवतात. म्हणून त्यांचे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत असे एक वेळापत्रक बनवून ते स्वतः पण फॉलो करा. त्यात त्यांच्या छंदांना पण वेगळा वेळ द्या. त्यांना सामाजिक माध्यमांपासून दूर राहून टीव्हीवर वेगळं काहीतरी पाहण्याचा व पुस्तके वाचण्याचा, आपले विविध छंद जोपासण्याचा, चित्र काढण्याचा प्रयत्न करायला लावा.

खेळ

मुलं ही मौजमस्ती करण्यासाठी तसेच रिलॅक्स होण्यासाठी खेळत असतात. पण या काळात बहुतेक मुलंही मोबाईलवरच खेळताना दिसली. म्हणून स्वतः मुलाबरोबर खेळण्यासाठी वेळ काढावा. काही बैठे, बौद्धिक व वैचारिक खेळ तुम्ही खेळू शकता. घरच्या घरी लंगडी, टेबल टेनिस, चेस, कॅरम खेळू शकता. मुले एखादी गोष्ट विविध प्रकारे करून पाहतात. ती त्यांना करू द्यावी त्यामुळे त्यांच्या परिणामाची तुलना ते करतात, प्रश्न विचारतात व त्यातील समस्यांना तोंड देतात.

अनुकरण

लहान मुलं नेहमी मोठय़ांचे अनुकरण करतात व त्यानुसार वागतात. त्यामुळे तुमच्या वागण्यात संयम आणणे खूप महत्त्वाचे आहे. पालकांनी आरडाओरडा व मारहाण केल्यास मुले तसे वागायला शिकतात. म्हणून मोठय़ांचे वागणे सौजन्याचे, आदराचे व संयमाचे असल्यास मूल तसेच अनुकरण करते.

स्वत्वाची जाणीव

किशोरवयीन मुलांच्या वयाचा टप्पा स्वतःची ओळख करण्याच्यादृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा आहे. स्वत्वाची जाणीव विकसित होण्याची प्रक्रिया ही शारीरिक बदलांशी निगडित तर आहेच, त्यात त्यांना सामाजिक व भावनिक आधाराची गरज खूप असते. म्हणून त्यांच्याजवळ जाऊन त्यांच्याशी सुसंवाद साधणे खूप गरजेचे आहे. म्हणून आठवी ते दहावीच्या मुलांबरोबर त्यांच्या जीवनातील ध्येयाबद्दल चर्चा करा, त्यांना कशात अभिरुची आहे ते पहा, करीअरविषयक विविध पर्याय त्यांच्यासमोर ठेवा, त्यातील फायदे व नुकसान यावर चर्चा करा, पण त्यांनी कोणत्या वाटेवर जायचे हे त्यांचे त्यांनी ठरवले तर खूपच उत्तम होते. यासाठी आपल्या शिक्षण विभागाने करीअरच्या विविध पर्यायांची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी महाकरीयर पोर्टल सुरू केले आहे.

काळजी

एखाद्या मुलाच्या पालकांना जर कोरोनाचा संसर्ग झाला असेल आणि त्यांचे विलगीकरण केले असेल तर त्या कुटुंबातील लहान मुलांची अधिक काळजी घ्यायला हवी, कारण त्यामुळे मुलांमध्ये अस्वस्थतेची भावना वाढू शकते. अशा वेळी त्यांना आश्वासक वाटेल अशा सदस्यांसोबत ठेवायला हवे. त्यांच्यावर कोणताही ताण वाढणार नाही.

जागरूकता

एक पालक म्हणून आपल्या मुलांच्या विकासातील महत्त्वाचे टप्पे आपणास माहिती असणे आवश्यक आहे. एखाद्या मुलामध्ये जर मानसिक आजार आढळला तर त्याकडे वेळीच लक्ष दिले पाहिजे. मनाने दुःखी असलेली मुले कधी कधी जगावेगळी वागतात, अबोल बनतात, एकलकोंडी राहतात, आळशी किंवा जास्त खोडकर बनतात, त्यांची भूक व झोप मंदावते अशावेळी आपण मुलांबरोबर सुसंवाद करून त्यांचे प्रश्न समजून घेतले पाहिजेत. जर ही समस्या कायम राहिली तर शिक्षक, आरोग्यसेवक व समुपदेशकांचा सल्ला घ्यावा.

कोरोनामुळे निर्माण झालेली अनिश्चितता अशीच कायम राहणार आहे. कारण कोरोना अजूनही काही महिने आपली साथ सोडणार नाही. म्हणूनच या काळात पालकांनी आपले स्वतःचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य जपत असतानाच आपल्या मुलांचेसुद्धा मानसिक स्वास्थ्य जपायला हवे.

आपली प्रतिक्रिया द्या