वेब न्यूज – ‘ई पासपोर्ट’च्या दिशेने हिंदुस्थान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> स्पायडरमॅन

नुकत्याच सादर झालेल्या बजेटमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तंत्रज्ञान क्षेत्रासाठी बऱ्याच काही घोषणा केल्या आहेत. स्वदेशी डिजिटल करन्सी, ग्रामीण भागात स्वस्त दरात इंटरनेटची सेवा आणि इतर सरकारी ई सेवा पोहोचवणार, सुलभ व्यवहारांसाठी बँका आणि पोस्ट ऑफिसेस एकत्र जोडणार, खासगी कंपन्यांना 5 जीच्या सेवांमध्ये प्रवेश अशा अनेक निर्णयांची घोषणा या वेळी करण्यात आली. मात्र सगळ्यात लक्षवेधी ठरले, ती म्हणजे ‘ई पासपोर्ट’ आणण्याची घोषणा होय.

अर्थात, बजेट सादर होण्याच्या आधी, म्हणजे गेल्याच महिन्यात विदेश मंत्रालयात हिंदुस्थान सरकारचे सचिव असलेल्या संजय भट्टाचार्य यांनी ट्विटरद्वारे नागरिकांना माहिती दिली होती की, देशवासीयांसाठी लवकरच ‘ई पासपोर्ट’ची सुविधा सादर करण्यात येणार आहे. विदेशात प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी ही योजना अत्यंत फायद्याची आणि वेळ वाचवणारी असणार आहे. या ‘ई पासपोर्ट’मध्ये आपल्या ड्रायव्हिंग लायसन्ससोबत असते तशीच एक चिप असणार आहे. या चिपमध्ये प्रवाशाच्या संपूर्ण माहितीसोबत त्याचा बायोमॅट्रिक डाटादेखील सुरक्षितपणे सेव्ह केलेला असणार आहे. नेक्स्ट जनरेशनचे हे ‘ई पासपोर्ट’ बायोमॅट्रिक डाटाला अधिक सुरक्षित करतील असे या क्षेत्रातील तज्ञांचे म्हणणे आहे.

हा आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेला ‘ई पासपोर्ट’ दिसायला आपल्या नेहमीच्या पासपोर्टप्रमाणे असणार आहे. मात्र यात बसवण्यात आलेली ‘चिप’ याला एक अनोखे महत्त्व प्रदान करणार आहे. एकाच ’चिप’मध्ये असलेल्या प्रवाशाच्या संपूर्ण माहितीमुळे व्हेरिफिकेशन- अर्थात प्रवाशाची ओळख पटवण्याची प्रोसेस अत्यंत सुलभ आणि वेगाने करणे शक्य होणार आहे. अंदाजे 50 टक्के इतकी वेळेची बचत या ’ई पासपोर्ट’मुळे होणार असल्याचा अंदाज आहे. मुख्य म्हणजे या ’ई पासपोर्ट’मुळे डुप्लिकेट पासपोर्टच्या धंद्याला चांगलाच आळा बसणार आहे. या ’ई पासपोर्ट’साठी नागरिक सामान्य पासपोर्टसाठी जसा अर्ज करतो, तसाच अर्ज करून तो मिळवू शकणार आहेत.