vat purnima प्रासंगिक – वटपौर्णिमेच्या निमित्ताने…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> आकाश दीपक महालपुरे

वटपौर्णिमा म्हणजे हिंदुस्थानातील हिंदू स्त्रीच्या जिव्हाळय़ाचा दिवस! खरे तर अनंत काळापासून ही परंपरा चालत असल्यामुळे या सणाला वडाच्या झाडाखाली असंख्य सुवासिनींचा मेळा जमायचा. आनंदाला उधाण यायचे, चैतन्याला पालवी फुटायची. मजा-मस्तीचे स्नेहसंमेलन बघायला मिळायचे. त्या सुवासिनीचे आनंदी असणे नेहमी सुखावह वाटायचे. त्यांच्या भावनांना आवरणे शक्य नसायचे. बाजारपेठेत तर फणसाच्या राशी लागायच्या. आंब्याचे फडच्या फड उतरायचे. आंबा व फणस विकणाऱ्यांभोवती बायकांचा गराडा असायचा.

नव्याने लग्न होणाऱ्या मुलींसाठी लागणाऱ्या परडय़ा बुरूड बायका विकत असताना दिसायच्या. तसेच नवीन लग्न झालेल्या मुलींच्या ‘आया’ आपल्या मुलीची ओवश्याची परडी तिच्या आयुष्यात सुखाचे दान मिळावे म्हणून मनोभावे खरेदी करतानासुद्धा दिसायच्या. पण काळ बदलला. काळाच्या ओघात माणसं बदलली आणि आजकाल त्याच काळाच्या ओघात काही स्त्रिया जुने संस्कार, जुन्या रुढी-परंपरा विसरून नव्या संस्कारात पदार्पण करत आहे. प्रामुख्याने कौटुंबिक शैलीचा ऱ्हास झालेला आहे. एकमेकांवर असलेल्या विश्वासाची कमतरता ही एक मोठी समस्या उद्भवली आहे. एकटे राहत असल्यामुळे कुंटुंबे संस्कृतीपासून दूर लांबवर जात आहेत. त्यामुळे समस्या आणखीनच जटील होत चालल्या आहेत. त्याचा परिणाम थेट वैवाहिक जीवनावर पडतो आहे.

खरे तर, संसाराच्या रहाटगाडय़ात जेवढी भूमिका स्त्रीची आहे, अगदी तितकीच भूमिका पुरुषाचीसुद्धा आहे. पण आजकाल संस्कार आणि संसारातील आपली मुख्य जबाबदारी कशाला म्हणतात, याचे भानदेखील पुरुष वर्गाला अजिबात राहिलेले नाही. मग किमान ज्या नवऱ्यासाठी अखंड सौभाग्य मागायचे किंवा उदंड आयुष्य मागायचे. तो नवरा तरी त्या लायकीचा हवा ना! तरीही आजकाल नवऱ्याचा छळ सहन करणाऱ्या बऱ्याच स्त्रिया वडाची पूजा करतात. सौभाग्यासाठी वडाला रेशीम धागा गुंडाळतात. खरे तर सामाजिक स्थिती आज बदललेली आहे. बोटांवर मोजण्याइतकेच स्त्री-पुरुष संस्कार आणि संस्कृती जपत आहे.