
अक्षयतृतीयेनंतर सोन्याचांदीच्या दरात थोडी घसरण झाली होती. मात्र लगीनसराईच्या हंगामात सोनेचांदीच्या दरात वाढ होऊ लागली आहे. सराफा बाजाराच्या वेबसाईटनुसार, बुधवारी 24 कॅरेट सोन्याच्या एका तोळ्याची किंमत 60 हजार 330 रुपये आहे. तर चांदीचा भाव पुन्हा एकदा 74 हजार रुपयांच्या पुढे गेला आहे. आज चांदीचा भाव 74315 रुपये इतका झाला. येत्या काळात सोन्याच्या किमतीत वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
एकीकडे सोन्याचा भाव वाढत असताना वापरातले सोने मोडून त्यातून आर्थिक गरज भागवण्याकडे लोकांचा कल दिसत आहे. गोल्ड लोनमध्ये दरवर्षी सरासरी 10 ते 15 टक्के वाढ होत आहे. यामध्ये नियमित मासिक हफ्त्याने कर्जफेडीचा आग्रह नसतो. मासिक हप्त्याच्या रुपाने केवळ कर्जावरील व्याज घेतले जाते.
सोन्याची खरेदी डिजिटल स्वरूपात करता यावी, यासाठी गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंडचा (ईटीएफ) पर्याय आहे. मात्र याचे आकर्षण ओसरू लागल्याचे दिसत आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये गोल्ड ईटीएफमधील गुंतवणूक वार्षिक आधारावर 74 टक्के घसरून 653 कोटी रुपयांवर गेली. मात्र गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूकदारांची संख्या वाढली आहे. एक लक्षात ठेवलं पाहिजे की गोल्ड ईटीएफमधील सोन्याच्या प्रत्येक युनिटला 99 टक्के शुद्ध सोन्याची हमी असते.





























































