मुखवटे सोलताना – दुर्लक्षित पण महत्त्वाचं… कला कोमेजताना…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>मलिका अमरशेख

64 कलांच्या ऐवजी आज शंभराच्या वर कला जन्म घेत्या झाल्या, पण जरा नजर टाकली तर मन चरकतंच. शिल्पकला… चित्रकला… कुठं आहेत या कला? अजिंठा लेणी, वेरूळ लेणी, काही हेमाडपंथी देवालयं, हंपी, सूर्यरथ, खजुराहो, कान्हेरी गुंफा आणि आता? शून्य शिल्पकार. फक्त महान लोकांचे पुतळे बनवण्यापुरतेच… मग त्यांची कला – त्याचं काय?

64 कलांच्या ऐवजी आज शंभराच्या वर कला जन्म घेत्या झाल्या, पण जरा नजर टाकली तर मन चरकतंच. शिल्पकला… चित्रकला… कुठं आहेत या कला? अजिंठा लेणी, वेरूळ लेणी, काही हेमाडपंथी देवालयं, हंपी, सूर्यरथ, खजुराहो, कान्हेरी गुंफा आणि आता? शून्य शिल्पकार. फक्त महान लोकांचे पुतळे बनवण्यापुरतेच… मग त्यांची कला – त्याचं काय? म्हणतात की, ताजमहाल बनवल्यानंतर त्या शिल्पकाराला मारून टाकलं की जेणेकरून त्यानं ताजमहालनंतर दुसरी कोणतीच अप्रतिम वास्तू निर्माण करू नये म्हणून! जर इतकी विखारी वृत्ती त्यावेळचे राज्यकर्ते ठेवतात तर त्याहून आपण काय वेगळे? आपण कुठे त्यांची कलावस्तू भव्यदिव्य निर्मितीला वाव दिलाय?

महापुरुषांचे पुतळे उभारणे, ते पण पाचदहा वर्षातून एकदा! सरकार बदललं की, महापुरुषांची व्याख्या पण बदलणार. किंबहुना पुसूनच जाणार मग? त्यांनी कसं जगावं?

पूर्वी बाहेरचं सोडा आपल्याकडे राजा रविवर्मा, हळदणकर, एस. के. आरा, आबालाल रहमान हे तर होतेच, पण अनेक अनाम चित्रकार ज्यांच्या बोटात जादूच… असे दुर्लक्षित राहिलेले… आज त्यांचं नावही कुणाला आठवत नसेल. तर अशांसाठी आपण काय करणार आहोत? या कला पुढंही वाढाव्यात. एवढंच नाही तर जगभरात आपली वास्तुकला व चित्रकला जावी यासाठी आपण काय प्रयत्न करीत आहोत?

शिल्पकला तर संपल्यातच जमा आहे, पण त्यासाठी आपण खूप काही करू शकतो. पर्यावरण प्रेमी जगभरात आहेत आणि आपल्याकडे खूप सुंदर पर्यटन स्थळं आहेत. आपण त्या सर्व पर्यटन स्थळांवर फार सुंदर शिल्प चित्रकला करू शकतो! त्यावेळी राजाश्रय होता. आजही जर शासनानं लक्ष दिलं तर पुनश्च वेगळे अजिंठा-वेरूळ आपण उभारू शकतो. हिंदुस्थानचा इतिहास लेण्यात बद्ध करू शकतो. साहित्य-चळवळी-लोक-गावसंस्कृती सर्व आपण वेगवेगळय़ा खेडय़ात-गावात त्यांचा इतिहास त्यांची संस्कृती उभारून शिल्पकारांना हातभार परत महसूलही मिळवू शकतो आणि पुनश्च आपली अस्तंगत झालेली शिल्प व चित्रकला वृद्धिंगत करू शकतो.

आज फक्त इतिहासाचं नाव काढून ढेकर द्यायचे दिवस नाहीत. उद्याची पिढी तुम्हाला जाब विचारेल किंवा सगळं विसरून अमेरिकन कॅनडात ठुमकायला किंवा पैसे गोळा करायला जातील. मग कोणती संस्कृती सांगणार तुम्ही जगाला? मागचीच? वेरूळ-अजिंठा?

आज अस्तंगत झालेल्या कला पुन्हा जिवंत करायच्या आहेत. हीच आपली ओळख आहे.

हिंदुस्थान कलासंपन्न अन् समृद्ध देश आहे. विविध संस्कृती व परिपूर्ण भव्य पर्यावरण… समुद्र तिन्ही बाजूला, असीम अफाट जंगल-जैवविविधता – आपण त्यांचा अभ्यास करीत नाही वा जे अभ्यास करतात, आपण त्यांची दखल घेत नाही. हे खूप चुकीचं आहे. पूर्वी आपण इतिहास घडवायचो. आता आपण इतिहासच काय भविष्यपण पुसत चाललोय…

इतिहासच नाही तर पुढील पिढी माफ करणार नाही ही हयगय…

पर्यावरणासाठी एक चिमुकली ग्रेटा थुनबर्ग उभी राहिली आणि आपण?

पर्यावरण जास्तत जास्त बिघडवतोय अन् त्याची ना खंत ना खेद! आपल्या कलावंतांना जगण्यासाठी जशी दाद लागते तशी भाकरही लागते.

काय करतोहोत आपण? माती महाग नसते. रंग महाग असतात. पण मातीपासून जे प्रतिसृष्टी निर्माण करतात ते कुणी घेतं का? आपले देव असतात संगमरवराचे – सिरॅमिकचे.

फक्त गणपती उत्सवात गणपती बनवणं हे शिल्पकाराचं मूळ ध्येय नसतं. त्याला आणि काही भव्य दिव्य घडवू द्या… त्याला प्रोत्साहन द्या, दाद द्या. त्याच्या मूर्ती कल्पनांना हिंदुस्थानातच काय जगभरात पोचवायला मदत करा… पूर्वीच्या मूर्तींना (हिंदुस्थानी) जगभरातले लोक करोडो रुपये खर्चून विकत घेतात… आताचे लोक काय प्रतिभावान नाहीत? अलबत आहेत.

शिल्प आणि चित्र या सर्वात पुरातन कला आहेत. अब्जावधी वर्षांचा इतिहास आहे मातीला…

आज त्या कला मृतवत् झाल्यात. त्यांना संजीवनी द्यायला हवी. आपण बाजारात उभे नाही आहोत. मागणी तसा पुरवठा किंवा पैसे मिळतात फक्त कॉम्प्युटरवर वर्क करून कॉलसेंटर वा तत्सम यंत्र त्यावर काम करून पैसे मिळवायचे यात समाधान सर्वांना मिळेल का? कला आणि विकास यात जमीन अस्मानाचा फरक आहे. कलेमध्ये तुम्ही स्वतःला सिद्ध करता – नवनिर्माण करता. तुमचं ध्येय असतं ते. समाधान असतं…

आणि जर जो निर्माण करतो त्यालाच तुम्ही खच्ची करीत असाल तर तो समाज सर्वात दुर्दैवी होय! की जो आपलीच मूळं कुऱहाडीनं कापतो. आपल्याच समाजातली सर्जनशीलनांशी पाळंमुळं तोडतो. नाळ तोडतो अन् संबंध जोडतो तो यंत्रांशी!

महान तज्ञ संशोधक स्टिफन हॉकिंग यानं स्पष्ट शब्दांत जगाला सुनावलंय –

‘‘जर तुम्ही यंत्रांच्या मागे लागून यांत्रिक बौद्धिकता प्रगत कराल तेव्हा मानवजातीचा विनाश होईल!’’

हे लक्षात घ्या – यंत्र आपलं भविष्य नाही. कलासंस्कृती आपलं भूत, वर्तमान अन् भविष्य आहे. जे जगभरात आपली संस्कृतीच नाही तर इतिहासात आपलं नाव सुवर्णाक्षरात नोंदवील…

अजिंठा-वेरूळमधल्या लोकांनी कुठेही आपली नावं कोरलेली नाहीत हे लक्षात घ्या.

इतकी निरपेक्ष समर्पणासाक्षी कला जपणारे कलावंत त्यांना जतन करून तेवढीच अप्रतिम कला निर्माण करणारे कलावंत यांना आपण जिवंत जागर करायला हवेत. त्यांना दाद देऊन त्यांना नवनिर्मितीसाठी सर्वतोपरी मदत करायला हवी!

[email protected]