
वैद्य सत्यव्रत नानल
‘प्रकृति’ हा शब्द मराठीमध्ये सर्रास वापरला जातो. आयुर्वेदामध्येसुद्धा प्रकृति म्हणजे काही तरी असते असे आता अनेकांना माहीत झालेले आहे. अनेक रुग्ण दवाखान्यात आल्यावर त्यांची प्रकृति कोणती असे विचारतात. अनेक रुग्ण आजकाल त्यांची प्रकृति कोणती आहे हे स्वतःच सांगतात. बऱयाच वेळा प्रकृतिबद्दल चुकीची माहिती त्यांना असते आणि त्या चुकीच्या माहितीआधारे ते चुकीच्या गोष्टी अनुकरण करू लागतात. त्यामुळे फायदा न होता नुकसानच होते. बऱयाच वेळा ही गोष्टही त्यांना ध्यानात आणून द्यावी लागते. त्यामुळे आज आपण आयुर्वेदानुसार प्रकृति म्हणजे काय ते समजून घेऊया. येथे सामान्य वाचकांना जीवनात आवश्यक ठरेल तेवढीच माहिती देणार आहे.
काही विशेष मुद्दे
– प्रकृति ही जन्मआधीपासून एकच असते. मरेपर्यंत कधीही बदलत नाही.
– गर्भाशयात गर्भ तयार होतो तेव्हाच त्याची प्रकृति ठरते.
– प्रकृति ही वात, पित्त आणि कफ या तीन दोषांची मिळून बनते. त्याचे सात प्रकार आहेत.
समप्रकृती प्रकृति ः (त्रिदोषज प्रकृति ः तीनही दोषांचे समान बल असणे). ही सर्वश्रेष्ठ प्रकृति असते.
द्वद्वज प्रकृति ः दोन दोषांची मिळून बनते ती प्रकृति (वातपित्तज प्रकृति, वातकफज प्रकृति, कफपित्तज प्रकृति)
एकदोषज प्रकृति ः वातज प्रकृति, पित्तज प्रकृति आणि कफज प्रकृति
येथे तीनपैकी ज्या दोषांचे प्राबल्य असेल त्यांची प्रकृति ठरते. म्हणजे तिथे तीनही दोष असतात, परंतु काहींचा जोर जास्त असतो आणि त्यांचीच प्रकृति प्रमुख बनते.
येथे सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, एक दोषज प्रकृति ही सर्वात हीन (वाईट) प्रकृति असते. आयुर्वेदाप्रमाणे एकदोष प्रकृतिची माणसे (स्त्राr-पुरुष दोन्हीही) कायम आजारग्रस्त असतात. त्यांना तब्येतीच्या छोटय़ा-मोठय़ा तक्रारी कायम सुरू असतात. तिथेच तीनही दोषांची म्हणजे समप्रकृति असणे हे भाग्याचे ठरते. उत्तम आयुष्य मिळण्यासाठी उपयुक्त असते.
– आयुर्वेदामध्ये स्वस्थ मनुष्याची प्रकृति पहावी आणि त्याप्रमाणे त्याच्या दीर्घायुष्यातील स्वास्थ्यासाठीचे नियम ठरवावेत असा निर्देश आहे. म्हणजे प्रकृतिप्रमाणे प्रत्येक व्यक्तीची शारीरिक आणि मानसिक ठेवण समजून त्याप्रमाणे त्याच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट ‘जसे दिनचर्या, ऋतुचर्या, हितकर व्यायाम प्रकार, आहारनिवड (पथ्यकर आणि अपथ्यकर पदार्थ), संभोग व त्याचे नियम, योग्य निद्रा इत्यादी सर्व़ ठरवता येते. त्याचे अवलंबन केले ती स्वस्थ आणि दीर्घ आयुष्य प्राप्त होते. (रोगी व्यक्तीबाबत मात्र प्रकृति पहावी की नाही याचे नियम बदलू शकतात. ते वैद्याने ठरवायचे असते.)
प्रकृति ही मानसिक आणि शारीरिक दोन्ही तत्त्वांवर पहावी लागते.
– मानस प्रकृति – सात्त्विक, राजस आणि तामस अशा तीन प्रकृति आहेत, त्यांचा त्रिदोषांशीच संबंध आहे आणि त्यांचा विचारही आयुर्वेद त्रिदोषांच्या आधारानेच करतो. याबद्दल फार विस्ताराने लिहिणे म्हणजे विषयापासून लांब जाणे होईल.
प्रकृति ही गर्भ मातेच्या शरीरात असतानाच ठरत असल्याने या जगात आल्यावर आपण जसे आहोत तसेच राहणार आहोत आणि त्याप्रमाणे आपल्या दैनंदिन जीवनात आपण नियम पाळले पाहिजेत, वागले पाहिजे. त्यामुळे आपण आपले स्वास्थ्य टिकवून ठेवतो जे सर्वात महत्त्वाचे काम आहे. त्यामुळे रोगी नसताना आपली प्रकृति समजून घ्यावी, त्याप्रमाणे जगावे हे सर्वात उत्तम.
दोष म्हणजे काय
इतर शास्त्रानुसार शरीर जसे विविध भावांनी बनलेले असते तसे आयुर्वेदानुसार शरीर हे वात, पित्त आणि कफ या तीन मूळ घटकांनी बनलेले असते. त्यामुळे प्रकृति ठरवताना या तीन घटकांवरच विशेष लक्ष पेंद्रित केलेले असते. या तीन घटकांना दोष म्हणतात. दोष म्हणजे तो घटक जो जोपर्यंत स्वस्थ आहे तोपर्यंत स्वास्थ्य शाबूत राहते आणि तो जेव्हा बिघडतो तेव्हा शरीरस्वास्थ्य बिघडते. इथेच रोगांची निर्मिती प्रक्रिया सुरू होते. ज्याची जी प्रकृति त्याला त्या दोषांचे रोग सहज होऊ शकतात. म्हणजे एकल, वातज प्रकृतिच्या लोकांना वाताचे रोग सहज होतात. त्यासोबत कफ आणि पित्तदोष किती क्षीण आहेत त्यावर त्यांचे रोग होणार की नाही हे अवलंबून असते. त्यामुळे त्या व्यक्तीने वातास विकृतपणे वाढू न देता त्याचे पोषण होईल असा आहार घ्यावा, वागावे-बोलावे-चालावे इत्यादी. म्हणजे एकल कफाची प्रकृति असलेल्या व्यक्तींना कफाचे अनेक रोग सहज होऊ शकतात. हे सर्व गणितीय पद्धतीने प्रत्येक आलेल्या व्यक्तीबद्दल वैद्यास तपासावे लागते. त्याने निदानात अचूकता येते.



























































