
>> पद्मजा फेणाणी-जोगळेकर
‘लता मंगेशकर’ हे नावच इतकं जादुमय आहे की, त्यांच्या सोबतच्या प्रत्येक आठवणी, प्रत्येक क्षण मला अलिबाबाच्या गुहेतच घेऊन जातात. दीदींनी माझं ‘धुंद मंद…’ गाणं ऐकून मला सहीसकट भेट दिलेल्या एल. पी. रेकॉर्डस्ही मी जपून ठेवल्यायत. ‘निवडुंग’ चित्रपटासाठी ‘केंव्हा तरी पहाटे’ व ‘लवलव करी पातं’ ही गाणी बाळासाहेबांच्या दिग्दर्शनाखाली गाऊन घेऊन दीदींनी, ‘मला हिच्याकडून गाऊन घ्यायचंय,’ हा शब्दही पुरा केला.
दीदींना दादरच्या पुरोहितांचे, पांढरे बारीक साखर पेरलेले पेढे खूप आवडायचे म्हणून मी त्यांच्यासाठी घेऊन जाई. त्या वेळी आपल्या रूममध्ये टी.व्ही.वर मिकी माऊसची कार्टून्स पाहताना, खळखळून हसणाऱ्या दीदींना पाहून मला आश्चर्य वाटे नि त्यांनी स्वतःत जपलेले मूल पाहून आनंदही होई. त्या वेळी अनेकदा दीदी आधी मला पेढा भरवत, मगच स्वतः खात. त्या छोटय़ा पेढय़ातला तो केवढा मोठ्ठा आनंद!
असंच कधीतरी गप्पा मारताना, दीदी त्यांच्या परिचयातील जुन्या गायकांच्या गायकीची हुबेहूब नक्कल करून दाखवीत. त्या वेळी 25-30 वर्षांपूर्वीचे सारे काही दीदींना जसेच्या तसे कसे काय आठवते, याचे मला कुतूहल वाटे… तर मग कधी त्या माझ्याच समक्ष, दोन्ही हातांनी हातवारे करून, मी जशी गाते, तशीच थेट नक्कल करून दाखवत हास्याचे फवारे उडवीत. एकदा दीदींनी मला, ‘मी भरली वांगी कशी करते ते पाहायला या’ म्हणून स्वतःच्या सपाता मला घालायला देऊन स्वयंपाकघरात नेले. मला कोण आनंद! जणू काही त्यांच्या सुरांनी त्यांच्या सपातांतून माझ्या शरीरात विजेप्रमाणे प्रवास केला तर… काय मज्जा येईल? असेच मला वाटत होते.
कढई, तेल, मसाले, बारीक चिरलेला कांदा, छेद असलेली छोटी वांगी, सारे काही आधीच तयार होते. जणू काही संगीत दिग्दर्शकाने वाद्यवृंदासह गाण्याची जय्यत तयारी केल्यासारखे! मग दीदींनी सर्व मसाले प्रमाणात घेऊन, एका ताटात कालवले आणि छेद असलेल्या वांग्यांत भरून, ती वांगी अलगदपणे उकळत्या तेलात सोडली. ही सर्व प्रक्रिया मला दीदींच्या गाण्याप्रमाणेच भासली….
26 जानेवारी 2001 रोजी सर्वोच्च नागरी पुरस्काराने दीदींना ‘भारतरत्न’ व मला ‘पद्मश्री’ने सन्मानित केल्याचे एकाच वेळी जाहीर झाले, अन् दीदींचे मला अभिनंदनपर सुंदर पत्र आले. मी भाग्यवान अशी की, दिल्लीतल्या राष्ट्रपती भवनातील सोहळ्यातही मला दीदींना राष्ट्रपतींच्या हस्ते भारतरत्न स्वीकारताना पाहायला मिळाले. माझं नाव पुकारल्यावर पुढे येऊन मी गानसरस्वतीला वाकून नमस्कार केला. त्या वेळी त्यांनी माझ्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवीत आशीर्वाद दिला. आणि त्यानंतर मी राष्ट्रपतींच्या हस्ते ‘पद्मश्री’चा स्वीकार केला. हे सारे क्षण माझ्यासाठी केवळ अनमोल आहेत.
माझे गुरू आदरणीय बाळासाहेबांच्या प्रोत्साहनामुळे, वादकांच्या आग्रहामुळे, मी दीदींच्या पंच्याहत्तरीला दीदींना मानवंदना म्हणून ‘तेरे सूर और मेरे गीत’ या कार्यक्रमास सुरुवात केली. दीदींनी इतक्या अप्रतिम गायलेल्या या गाण्यांना त्यांच्या व्यतिरिक्त कुणी स्पर्शू नये असे वाटायचे, म्हणून जवळपास 2 वर्षे मी या कार्यक्रमास नकार देत होते, परंतु ‘साक्षात दीदींनी तुझं कौतुक केलंय, त्यामुळे तू त्यांना तुझ्या गाण्यातून जरूर मानवंदना दे.’ या वादकांच्या प्रेमळ आग्रहामुळे शेवटी मीही सर्व गाणी, मूळ सौंदर्यगाभा न बदलता, माझ्या शैलीत गायचे ठरवले. माझ्या बालपणी दीदींच्या ज्या गाण्यांचे संस्कार झाले ती, तसेच सहसा वाद्यवृंदात गायली जात नाहीत, अशी गाणी मी निवडली. उदा. ‘जाने कैसे सपनों में, ना जिया लागे ना, अजी रूठकर, …त्यातले ‘कहीं ये वो तो नहीं’ हे गाणे तर बाळासाहेबांचे खूप आवडते, म्हणून ते माझ्याकडून नेहमी म्हणून घेत आणि सांगत, यातला ‘वो’ म्हणजे साक्षात् परमेश्वरच मला दिसतो.
दीदींच्या सुरात, ‘प्रभू तेरो नाम’ ऐकताना कानात देव, मनात देव, रोमरोमांत देव आणि डोळ्यांतून फक्त अश्रूधारा अशी माझी अवस्था असते. या दैवी सुरांत परमेश्वराप्रत क्षणार्धात नेण्याचं सामर्थ्य आहे, म्हणूनच वाटतं,..’
‘कहीं ये वो (ईश्वर) तो नहीं?’…





























































