परफेक्शन इज द नेम ऑफ लता मंगेशकर! हम ना तुम्हे भुलाएंगे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>उत्तम सिंह

लताजी… आमची सरस्वतीदीदी! प्रणाम सरस्वतीदीदी, असं म्हणत माझ्या कामाला सुरुवात व्हायची. उभ्या आयुष्यात एकदा तरी लता मंगेशकर यांच्यासोबत काम करायला मिळावं, हे प्रत्येक गीतकार, संगीतकाराचं स्वप्न असतं. माझंही होतं आणि ते पूर्ण झालं. थोडीथोडकी नव्हे, तर लताजींसोबत 50-60 वर्षे काम केले. अनेक गीतांना व्हायोलीन वाजवले. म्युझिक अरेंजर, संगीतकार म्हणून काम केले. माझ्यासारखा भाग्यवान मीच.

सरस्वतीदीदींचा आशीर्वाद नेहमीच माझ्या डोक्यावर राहिला. लताजींनी 17 वर्षांनंतर पहिल्यांदा राजश्री प्रोडक्शनसाठी गाणं गायलं. तो चित्रपट होता – ‘मैंने प्यार किया’. मी या चित्रपटाचा म्युझिक अरेंजर होतो. सुरुवातीला त्यांनी नकार दिला होता; पण माझं नाव ऐकून त्या तयार झाल्या. माझ्यासाठी केवढी मोठी गोष्ट होती ती… बॉलीवूडमध्ये संगीतकार म्हणून माझी एंट्री झाली, त्या पहिल्या चित्रपटापासून मला दीदींचा आशीर्वाद लाभला. ‘पेंटर बाबू’ हा माझा पहिला चित्रपट. 120 संगीतकार, 40 कोरस आणि लता मंगेशकर, महेंद्र कपूर… असा सुंदर समा बांधला गेला होता! तो आयुष्यात पुढे कायम राहिला.

कुणी ‘लिजेंड’ असेच नाही बनत. त्यामागे अखंड साधना असते. दीदींसोबत काम करताना त्या साधनेचे दर्शन व्हायचे. दीदींची रेकार्डिंगची खासियत होती. त्या प्रत्येक गाणं स्वतः लिहून घ्यायच्या. तोच कागद गाताना त्यांच्या हाती असायचा. स्टुडिओत पहिल्यांदा आल्यावर त्या गाणं उतरवून घ्यायच्या. त्यानंतर त्या गीताची धून शिकायच्या. त्या धूनवर रियाज करायच्या. ट्रक लाइव्ह असेल तर आम्ही पूर्ण लाइव्ह रियाज करायचो. म्हणजे एकाच वेळी 60 ते 70 म्युझिशियन वादन करायचे. त्यानंतर कधी पाच वेळा, कधी सहा वेळा रियाज चालायचा. तर कधी त्याहून अधिक. जोपर्यंत लताजींना रिहर्सल हवी तोपर्यंत करत राहायचो. त्यानंतर ‘ट्रक’चा जमाना आला. लताजी ट्रकसोबत रियाज करायच्या. तो रियाज सहा-सात वेळा व्हायचा आणि त्यानंतर फायनल रेकार्डिंगला जायच्या. त्या रेकॉर्डिंग रूमच्या बाहेर चप्पल ठेवायच्या आणि उभं राहून गायच्या. त्यांची ती मूर्ती डोळ्यांसमोरून हटत नाहीय.

लताजींची स्वतःची अशी तत्त्वं असायची. कामाशी खूप प्रामाणिक असायच्या. डबल मिनिंगच्या गाण्यांना त्यांनी कधी हात लावला नाही. त्या नकार द्यायच्या. पुढे पुढे तर त्या गाणं घरी मागवून घ्यायच्या आणि तपासून घ्यायच्या. संगीतकार कोण वगैरे विचारणा करायच्या. एक वेळ अशी आली की त्यांनी अरेंजर कोण असं विचारलं आणि माझं नाव समजल्यावर त्या तत्काळ होकार द्यायच्या. एवढा विश्वास त्यांना माझ्या कामाबद्दल वाटू लागला होता. हम आपके है कौन, दिल तो पागल है, हम तुम पे मरते है, दुश्मन… हा सिलसिला सुरू राहिला.

परफेक्शन इज द नेम ऑफ लता मंगेशकर. रेकार्डिंग रद्द करण्याची वेळ बऱयाचदा यायची. त्यामागचं कारण त्या सांगायच्या नाहीत.  त्या स्टुडिओत यायच्या. रिहर्सल करायच्या. त्या वेळी त्यांना जाणवायचं की, त्यांचा गळा ठीक आहे की नाही. ठीक नसेल तर रेकार्डिंग रद्द व्हायचं. कधी त्यांचा तब्बेत ठीक नसल्याचा मेसेज यायचा. कधी सकाळीच तर कधी आदल्या दिवशी. त्यानंतर दोन-चार दिवसांनी त्या पुन्हा रेकार्डिंगची तारीख द्यायच्या. मीच त्यांना स्टुडिओत घेऊन जायचो आणि परत घरी सोडायचो. 9 ते 10 वर्षे असं सुरू होतं. खूप आठवणी आहेत. मन भरून येतंय.

सरस्वतीमातेला कधी बघितली नाही. पण आपल्यासाठी तर ही ‘लिव्हिंग’ सरस्वती आहे. ती वैकुंठाला गेली. सरस्वतीमातेने तिला आपल्याकडे बोलावले. लताजींच्या स्मृतीला विनम्र अभिवादन!

(लेखक प्रख्यात संगीतकार आणि व्हायोलीनवादक आहेत.)