लेख – ‘श्री लक्ष्मी-नारायण’ पूजन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> नामदेव सदावर्ते

महाराष्ट्रातील सर्व संतांनी धन–संपत्तीचे क्षणभंगुरत्व सांगितले आहे. श्रीहरीविष्णूंच्या कृपेशिवाय संपत्ती, सत्ता, बळ हे सर्वच निरर्थक आहेत हे अनेक प्रकारे समजावून सांगितले आहे. श्रीहरीकृपा झाली तर संसारासाठी आवश्यक तेवढी संपत्ती कष्टाने प्राप्त होते. म्हणून सर्व संतांनी संसारात राहून आपला व्यवसाय करून सर्व कुटुंबाचा उदरनिर्वाह केला आहे. श्रीहरीविठ्ठलाचे नामस्मरण व चिंतन हीच संतांची उपासना होती. संतांनी लक्ष्मीची आराधना करतानाही श्रीहरीचिंतन केले आहे. केवळ लक्ष्मीपूजन न करता श्रीहरीविष्णूसह लक्ष्मी–नारायण पूजन संत करतात.

देवी लक्ष्मी ही श्रीविष्णूपत्नी असून, ती भगवान श्रीविष्णूंची शोभा  व कांती मानतात. देव–दैत्यांनी क्षीरसागराचे मंथन केले, त्यावेळी लक्ष्मी सागरातून वर आली. ती उत्पन्न होताच देवांचे तेज वाढले. लक्ष्मीने सर्वांना डावलून भगवान श्रीविष्णूंच्या गळ्यात वरमाला घातली. लक्ष्मी विष्णूपत्नी झाली.

दुसरी कथा अशी, लक्ष्मी स्वतः सांगते. मी सूर्यकिरणांनी पूर्ण विकसित झालेल्या कमळातून जन्माला आली आहे. सर्व भूतांच्या कल्याणासाठी मी हा अवतार धारण केला आहे. कमळांची माळा गळ्यात धारण करणारी मी पद्मालक्ष्मी आहे. हे इंद्रा, मी लक्ष्मी, श्री, श्रद्धा, मेधा, धृती, श्रुती व क्षमा आहे. या सद्गुणांच्या रूपात मी प्रकट होत असते.

कालचक्र स्वभावतः परिवर्तनशील असते. कालचक्रात सापडलेली प्रत्येक वस्तू अनित्य असते. सारे जग विनाशशील आहे. नश्वर वस्तूंचा नाश होणारच. त्यासाठी कुणीही शोक करू नये. लक्ष्मीसुद्धा कुणाजवळही कायम स्थिर राहात नाही. चंचल अशा लक्ष्मीने अनेकांचा त्याग केला आहे. समर्थ रामदास स्वामी ‘मनाचे श्लोकात’ लक्ष्मीचे चांचल्य वर्णन करतात.

मना सांग पां रावणा काय जालें ।

अकस्मात ते राज्य सर्वे बुडालें ।

म्हणोनि कुडी वासना सांडी वेगी ।

बळे लागला काळ हा पाठीलागीं ।।

वारा, माकड आणि वीज या तिघांचे स्वभावरसायन एकत्र केले तरी मनाच्या चांचल्याची बरोबरी करता येणार नाही. या मनाची सारी चंचलता सुखाचे टोक गाठण्यासाठी असते. तसेच एका ठिकाणी स्थिर न राहता लक्ष्मी सतत फिरत असते. लक्ष्मीच्या चांचल्याचे वर्णन करताना संत ‘रावणाचे’ उदाहरण देतात. चौदाचौकडय़ांचे राज्य रावणाने चौदा दिवसांत घालविले. रावणाजवळ सोन्याची घरे असलेली लंका व प्रचंड राज्य होते. मंदोदरीसारखी पतिव्रता स्त्री होती. इंद्रजितसारखा शूर आणि तत्पर मुलगा होता. कुंभकर्णासारखा सुस्वभावी म्हणून जागेपणापेक्षा झोपून राहण्यात सुख मानणारा आणि रावणाच्या नादी न लागणारा असा भाऊ होता. अफाट आणि आज्ञाधारक प्रचंड सशस्त्र सेना दिमतीला होती. वाटेल ते रूप बदलता यावे अशी विलक्षण सिद्धी शक्ती होती. रावणाला काहीच कमी नव्हते. रावण भगवान शंकरांचा मोठा भक्त होता. पण, अशा रावणाजवळ देवीलक्ष्मी स्थिर राहिली काय?

महाभारतात एके ठिकाणी इंद्रदेव राजलक्ष्मीला म्हणाला, हे देवी, मी तुझ्या आज्ञेत राहीन. तुझ्या आज्ञेचे उल्लंघन करणार नाही. मी सतत कालधर्माचे अनुसरण करीन. तूच मला योग्य मार्गदर्शन करू शकतेस. राजलक्ष्मी इंद्राला आपला स्वभाव सांगते. कालचक्रात सतत भ्रमण करणे हा लक्ष्मीचा मूळस्वभाव आहे. लक्ष्मीचा वास कोठे असतो कोठे नसतो, हे लक्ष्मी स्वतः इंद्रदेवाला सांगते. धर्माचरण करणाऱया ज्येष्ठ पुरुषांच्या निवासस्थानी मी सतत राहते. सत्य व धर्म यांचे उल्लंघन न करणारे मला खूप प्रिय असतात. दान, अध्ययन, यज्ञयाग, कर्तव्यनिष्ठा यांची ज्यांना आवड असते. देव, गुरुजन, माता–पिता व वंदनीय पुरुषांची जे लोक मनोभावे सेवा करतात अशा सत्यनिष्ठ, सज्जन भक्तांच्या हृदयात माझा निवास असतो. अंतर्बाह्य स्वच्छता ज्यांना प्रिय असते व संकटसमयी जे धैर्याचा त्याग करीत नाहीत, अशा लोकांच्या ठिकाणी मी निवासाला येते. जे सतत प्रयत्नशील असतात अशा लोकांची संगत मला फार आवडते. स्वच्छता, शूचिर्भूतपणा, सौंदर्य आणि आरोग्य या रूपाने मी प्रगट होत असते. संयमशीलता, उद्योगप्रियता, अध्ययनप्रियता आणि प्रयोगशीलता, तन्मयता ही माझ्या उदयाची लक्षणे आहेत. मी चंचल नाही अथवा स्थिरही नाही. चंचल मनाच्या पुरुषांच्या सहवासात मी चंचल दिसते.

दुर्गुणी माणसाच्या सहवासाने, संसर्गाने लक्ष्मीला दोष लागतो. अहंकारशून्यता, सहृदयता, क्षमाशीलता, अद्रोह, शूचिता व कोमलता हे गुण म्हणजे लक्ष्मीची तेजस्वी प्रभा होय. आळस, निद्रा, अविवेक, क्रोध आणि स्वार्थ या दुर्गुणांची जेथे वस्ती असते तेथे लक्ष्मी कधीच राहात नाही. अन्याय–अत्याचाराने साठविलेली संपत्ती कुठेही टिकत नाही. योगायोगाने ती जशी येते तशीच ती निघून जाते. उद्योगाला, सत्कर्माला देव मानणाऱ्यांच्या घरी लक्ष्मी जन्म घेते.

कर्मफळाचा सिद्धांत न समजल्यामुळे माणसे अनुचित कर्मे करतात. धनाचा लोभ करतात. धनार्जन करीत असताना अनेक पापांचा जन्म होतो. त्या धनाचा विनियोगही पापाच्या कुकर्मात होतो. धनाचा विनियोग सत्कर्मासाठी केला नाही तर धन अनर्थकारी ठरते. बुद्धिमान लोक धनाचा विनियोग सत्कार्यासाठी करतात. शुभकर्माने लक्ष्मीची वृद्धी होते. सद्गुणांनी, दैवीगुणांनी लक्ष्मी स्थिरावते आणि संयमाने ती लक्ष्मी सुरक्षित राहाते.

त्याग, तपश्चर्या, शास्त्रांचे अनुशीलन, श्रद्धा, यज्ञ, क्षमा, भाव, शुद्धी, संयम आणि सत्य या सद्गुणांना आत्म्याची संपत्ती म्हणतात. ज्यांच्या अंतर्यामी श्रीभगवान नारायण राहतो त्याला लक्ष्मी सोडून जाणे शक्य नाही. तो भगवंत नारायण हृदयी धरून ठेवावा. जेथे शिव असतो तेथे शक्ती असते. तसेच जेथे श्रीहरी विष्णू असेल तेथे श्रीलक्ष्मी असतेच. संत ज्ञानदेव म्हणतात–

तैसे सकळ पुरुषार्थ । जेथे स्वामी का सनाथ ।

तो श्रीकृष्णरावो जेथ । तेथ लक्ष्मी ।।

सर्वच लोक श्रीलक्ष्मीचे पूजन आदराने भक्तिभावाने करतात. लक्ष्मीमाता आपण केलेल्या पूजनाने प्रसन्न व्हावी व तिने आपल्या घरी सतत राहावे, अशी आशा सर्वांना असते. त्यासाठी अनेक क्रत, उपासना आहेत. जीवनोपयोगी वस्तूंच्या खरेदीसाठी सर्वांना धनसंपत्ती हवी असते. म्हणून सर्वसामान्य माणूस प्रयत्नपूर्वक लक्ष्मीप्राप्तीसाठी धडपडत असतो. लक्ष्मीप्राप्तीमुळे घरात सुखसमाधान राहते. दीपावलीच्या दिवशी घरोघरी अत्यंत भक्तिभावाने लक्ष्मीपूजन केले जाते.

दिवाळीच्या आनंदाच्या दिवसात लक्ष्मीचे पती श्रीविष्णू यांचे भक्तिभावाने पूजन करून, हे महाविष्णू देवा, तू माझ्या घरी लक्ष्मीसह ये. अशी आराधना पूजन करणे आवश्यक आहे. अशी संतांची शिकवण आहे. देवी लक्ष्मीच्या ऐश्वर्याचे वर्णन करताना ज्ञानराज म्हणतात– भगवंताची अखंडपणे चरणसेवा करणारी देवी लक्ष्मी तर ऐश्वर्यवती आहेच. पण लक्ष्मीच्या अनेक दासीसुद्धा ऐश्वर्यसंपन्न आहेत. लक्ष्मीच्या दासींचे ऐश्वर्य ज्ञानदेव सांगतात–

तियां खेळतां करिती घरकुली ।

तया नामे अमरपुरें जरि ठेविली ।

तरि न होती काय बाहुली । इंद्रादिक तयांची ।।