शिरीषायन – सवाल माझा ऐका!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>शिरीष कणेकर

फायर ब्रिगेडवाल्याच्या घराला आग लागली तर ती विझवायला तो स्वतः धावतो की त्या एरियात डय़ुटी लागलेल्या सहकाऱयाला तिकडे जायला सांगतो?

  • पोलीस अधिकाऱयाची बायको व चोराची बायको अपघाताने भेटल्या तर पैसे खाण्यावर बोलत असतील की चोरीच्या कमाईवर बोलत असतील?
  • वर्गशिक्षिकेची पोटची मुलगी नापास झाली तर ती मुलीला शिकवणी कोणाची लावते?
  • अश्वशर्यती जिंकलेला घोडा अन्य घोडय़ांना वेगळय़ा प्रकारे खिंकाळून हिणवतो का?
  • बिल्डिंगला लिफ्ट असताना जिन्याच्या पायऱया चढून जाणे हा कायद्याच्या दृष्टीने गुन्हा ठरतो का?
  • जाडय़ा लोकांना लोक हसतात तसे ते सिंगल फसली धुणं वाळत घालण्याच्या काठीसारख्या बारीक लोकांना का हसत नाहीत?
  • प्रत्येकाला सुंदर बायको हवी असते, मग असुंदर मुलींनी जायचं कुठे?
  • एखादा फलंदाज बॅटऐवजी धोपाटणं घेऊन खेळायला उतरला तर चालेल का?
  • कुत्र्या-मांजरांचं पिढीजात वैर पाहता ते कुठल्या राजकीय पक्षाचे असतील असं वाटतं?
  • साडीच्या दुकानातील कारागीर महिला ग्राहकांना साडी नेसल्यासारखं करून दाखवतात, त्यापेक्षा त्या घरूनच चापूनचोपून साडी नेसून का येत नाहीत?
  • घरफोडय़ा रात्री कोणाचं तरी घर फोडायला गेल्याची संधी साधून दुसरे घरफोडे त्याचं घर फोडून चोरीचा माल लंपास का करीत नाहीत?
  • मांजरी पाळणारे बोका का पाळत नाहीत?
  • शेअर्सचे बाजारभाव गडगडले की, स्वयंपाकघरात भांडी गडगडल्यासारखा आवाज कसा येत नाही?
  • अमका तमका ‘बिझनेस’ करतो म्हणजे नक्की काय करतो कसे ओळखायचे?
  • कॉलेजात प्राध्यापक होऊ न शकणारे शाळेत मास्तर होतात का?
  • मितभाषी, अबोल पत्नी अशी गोष्ट कोणी बघितली आहे का?
  • माणसाची हवा गेली असता पुनश्च हवा भरणारा पंप कुठे मिळतो?
  • ज्यांचं गणित चांगलं असतं त्यांना आयुष्याचं गणित सुटतं का?
  • पोरीवर लाइन मारणाऱयाने लाइन सरळच मारावी लागते की वेडीवाकडी मारलेली चालते?
  • लहानपणी दोरीवरून उडय़ा मारणारे मोठेपणी या पक्षातून त्या पक्षात उडय़ा मारतात का?
  • बैलगाडीला घोडा व टांग्याला बैल जुंपले तर त्यातले बैलगाडी व टांगा कसे ओळखायचे?
  • कासवाला उडता येत असतं तर त्याला कावळा म्हटलं असतं की गिधाड?
  • सुंदर तरुणीला हरिणी म्हणतात ते बुद्धीतील साधर्म्यामुळे का?
  • निवृत्ती समारंभात होणाऱया गौरवपर भाषणातला एकही शब्द सबंध नोकरी काळात एकदाही का बोलला जात नाही?
  • परदेशात मुलं असलेल्या मातापित्यांनी मुलांकडे जावे, वृद्धाश्रमात जावे की घरीच मरावे?
  • शोभणारी बायको म्हणजे नक्की कशी?
  • सर्वसाधारणपणे मुलं बापाचं नाव काढतात की पुसून टाकतात?
  • प्लंबर बोलावण्यापेक्षा गळका नळ तसाच गळत राहू देणं अधिक श्रेयस्कर नाही का?
  • पहिल्या पगारातून पेढे आणणं किंवा पिऊन घरी येणं हे दोनच पर्याय असतात का?
  • शर्टाच्या आत बनियन घालण्याची फॅशन गेली का?
  • चपला बाहेर काढून घरात गेलं तर बाहेर चपला चोरीला जाणार नाहीत याची गॅरंटी काय?
  • आपल्या घरी एखादा चप्पलचोर जन्मावा, जेणेकरून घरातल्यांच्या पायतणांचा प्रश्न कायमचा सुटेल असे कोणाला वाटत असेल का?
  • चड्डी घालून आंघोळ करण्यात काही खास फायदे आहेत असे कोणाला वाटत असते का?
  • गाढव आणि म्हैस यांच्या शर्यतीत हमखास म्हैस जिंकणार असे  म्हणणारा नवरा स्वतः कोण असतो?
  • सर्कशीत विदुषकाचं काम करणारे घरी बायकोसमोरही विदुषकच असतात का?

[email protected]