
>> प्रा. डॉ. वर्षा तोडमल
संशोधन व संशोधनात्मक लेखन करू इच्छिणाऱ्या मराठी लेखकांसाठी 9 डिसेंबर रोजी मसाप व साहित्यसेतूतर्फे साहित्य संशोधन कार्यशाळा होत आहे. त्यानिमित्त संशोधनक्षेत्राची माहिती देणारा लेख.
कोणत्याही क्षेत्रातील संशोधन हा एक बौद्धिक व्यापार आहे. संशोधन म्हणजे एखाद्या समस्येची सोडवणूक. मुळात शोध घेणे ही माणसाची एक मूलभूत प्रवृत्ती आहे. कुतूहलातूनच माणसाची शोधप्रक्रिया सुरू होते. माणसाच्या मनात निर्माण होणाऱया प्रश्नांमध्येच खऱया अर्थाने या शोधप्रक्रियेचे रहस्य दडलेले असते. केवळ एखाद्या गोष्टीचा शोध घेणे म्हणजे संशोधन नव्हे. तो संशोधनाचा पहिला घटक ठरतो, परंतु त्या घटकाचे संश्लेषण, विश्लेषण करणे, त्यावर पुन्हा विचार करणे, नव्या सिद्धांतापर्यंत पोहचणे या प्रक्रियेमुळे संशोधनाला परिपूर्णता प्राप्त होते. अर्थात कोणतेही संशोधन हे कधीही परिपूर्ण होऊ शकत नाही. संशोधन ही एक सतत चालणारी अशी चिंतनप्रक्रिया आहे. संशोधन हे एक पद्धतीशास्त्र आहे, शोध घेणे, नव्याचा शोध घेणे पुराव्याधारे एखादी गोष्ट सिद्ध करणे किवा सिद्ध गोष्टींचे नव्या स्वरूपात उपयोजन करणे, चिकित्सा करणे असे अनेकविध अर्थ व प्रक्रिया आहेत. संशोधन हा सत्याकडे प्रवास करणारा अभ्यासपूर्ण मार्ग आहे. कष्ट आणि विशिष्ट प्रकारच्या नियोजनामुळे संशोधनाचा माध्यमातून सत्याप्रत पोहचता येते.
मानवी जीवनात आज विज्ञानयुगामुळे प्रचंड परिवर्तन झालेले दिसून येते. मानवी जीवनातील या परीवर्तनाबरोबरच साहित्याचे क्षेत्रही विस्तारित झाले आहे. मानवी जीवनातील प्रतिबिंबाचा साहित्य हा आरसा असेल, तर साहित्यातील परिवर्तन हे नक्कीच लक्षणीय असल्याचे आपल्याला जाणवेल. या परिवर्तनाचा शोध घेणे, हे साहित्याच्या आकलनाच्या संदर्भात महत्त्वाचे ठरते. केवळ आशय आणि अभिव्यक्तीच्या पातळीवरच आज साहित्याचे आकलन मर्यादित राहिलेले नाही, तर त्याला सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाची परिमाणेही प्राप्त झालेली आहेत. म्हणूनच आज साहित्याचे आकलन क्षेत्रही विस्तारलेले दिसते. या पार्श्वभूमीवर आजच्या साहित्य संशोधनाचा वेध घेणे महत्वाचे आहे.
पुणे विद्यापीठात मागील तीन वर्षांत प्रकाशित झालेल्या 600 शोध निबंधांमध्ये वाङ्मयचौर्याचे प्रकार आढळले गुणवत्तापूर्ण संशोधन करण्याऐवजी बोगस संशोधन पत्रिकांमध्ये लेख, संशोधन छापण्याच्या प्रकारांना चाप लावण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) महासंघ स्थापन करण्याचा विचार करत आहे. एकीकडे एम. फिल. आणि पी.एचडी.च्या संशोधन केंद्रांना मान्यता द्यायची विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायचे, पण गुणवत्ता नाही. म्हणून शोधनिबंध प्रकाशित करण्यासाठी निर्बंध आणायचे इत्यादी वर्तमानपत्रातील नुकत्याच येऊन गेलेल्या बातम्या गुणवत्तापूर्ण संशोधानासंदर्भात गंभीरपणे विचार करण्याची आवश्यकता स्पष्ट करतात. मग कालच्या तुलनेत आजचे संशोधन गुणात्मकदृष्टया खालावले आहे का ?
ललित साहित्यासोबतच चरित्र, सामाजिक-राजकीय विषय, इतिहास, प्रवासवर्णने, चित्रपट, संगीत, आरोग्य, अर्थकारण, संस्कृती, कौशल्ये, प्राचीन परंपरा, लेणी, उत्खनने, भाषा, लिपी, मंदिरे, हस्तलिखिते आदी अनेक विषयांवरील लेखनासाठी अभ्यासपूर्ण तंत्रे अवगत असणे आवश्यक आहे. साहित्य हे केवळ आनंदापुरते वा सौंदर्यजाणिवेला परीपुष्टता देण्यापुरते मर्यादित राहिलेले नाही, तर त्यांचे सामाजिक व सांस्कृतिक अधिष्ठाने आज अधिक महत्त्वाचे मानले जाऊ लागले आहे. त्यामुळे समाजशास्त्र, मानसशास्त्र, इतिहास, तत्त्वज्ञान यासारख्या अनेक विषयांशी असणारा साहित्याचा अनुबंध लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.
या पार्श्वभूमीवर सर्वत्र संशोधन हा आज चिंतेचा विषय झालेला दिसतो. पदोन्नती डोळ्यांसमोर ठेवून संशोधन करण्यासाठी प्रवृत्तीही वाढत चाललेली दिसते आणि संशोधनही एकांकी होत असल्याचे जाणवते. त्याच्या नाचा विचार ज्या गंभीरपणाने होणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे होताना दिसत नाही त्यामुळेच साहित्यसंशोधन कार्यशाळांची गरज निर्माण झालेली दिसते.
अभ्यासकांच्या मनात निर्माण होणाऱ्या प्रश्नातच संशोधनाचे बीज असते. म्हणून प्रारंभी प्रश्न निर्माण झाले पाहिजेत, त्यासाठी वाचनाची आवश्यकता असते. त्यातून अभ्यासक्षेत्र निश्चित होते, संशोधनाचे विषय गवसतात. अन्यथा मार्गदर्शकाने लादलेले विषयच घ्यावे लागतात. कुठलेली संशोधन हे लादलेले होऊ शकत नाही, ती स्वयंपूर्त अशी प्रक्रिया आहे. संशोधनाची दृष्टी आली की अनेक विषय डोळ्यासमोर येतात. हे शतक जसे सामाजिक, राजकीय आणि ऐतिहासिक अंगाने जसे महत्त्वाचे आहे तसेच ते साहित्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचे आहे संशोधन हे एकप्रकारे भाषा व साहित्याला दिलेला कृतिशील प्रतिसाद असतो.
संशोधन हे बाह्य वा व्यावहारिक दडपणाखाली सक्तीने होण्याजोगे काम नसते. त्यात मन गुंतले पाहिजे, जीव ओतला गेला पाहिजे. तरच अर्थपूर्ण असे काहीतरी त्यातून सिद्ध होईल व अभ्यासक आपल्या परीने काहीतरी नवी भर ज्ञानक्षेत्रात घालू शकेल. संशोधन म्हणजे चिकित्सक दृष्टीने केलेला व्यवस्थित अभ्यास व त्या अभ्यासातून नव्या गोष्टींचा शोध ही संशोधनाची कोशातील व्याख्या आहे. याचा अर्थ एखाद्या विषयाची पुरेशी जाणीव होणे, नंतर त्याला आवश्यक साधनसामग्रीची व्यवस्था लावणे आणि नंतर त्याआधारे निवडलेल्या विषयावर काही प्रकाश टाकण्याचे काम करण्याची दिशा या प्रकरच्या कार्यशाळा करू शकतात-
संशोधन व संशोधनात्मक लेखन करू इच्छिणाऱया मराठी लेखकांसाठी मसाप-साहित्यतर्फे साहित्य संशोधन कार्यशाळा 9 डिसेंबर रोजी होत आहे. त्यानिमित्ताने संशोधनाची क्षेत्रे आणि पद्धती संशोधनाचे आयोजन, ग्रंथांच्या नोंदी करताना पाळावयाचे काही संकेत, वाङ्मयचौर्याचे प्रकार, टीपांचे उद्देश, अभ्याससाधनांची सूची, निर्देशसूची, प्रबंधाची मांडणी, विषय निवडीत घ्यावयाची दक्षता, संशोधनाच्या दिशा दाखवणारे काही ग्रंथ, विषयाचा आवाका लक्षात येण्यासाठी आवश्यक असणाऱया संदर्भ ग्रंथांचे संकलन, अभ्यास विश्लेषण इ. गोष्टींचे तंत्र म्हणजेच संशोधनाच्या उपयोजनाचे योग्य तंत्र वापरल्यास उपयुक्त व विश्वासह अशा ग्रंथांची निर्मिती होऊ शकेल.
नव्या संशोधकांना संशोधनाची योग्य दिशा दाखवणे ही काळाची गरज आहे. आज विद्यार्थी संशोधनप्रक्रिया न समजून घेताच संशोधनाकडे वळतो शिवाय संशोधन करायचे म्हणजे नेमके काय करायचे ? याचीच जाणीव नसते. ते समजून घेण्यासाठी आणि साहित्य संशोधनाला नवी दिशा देणारे लेखन प्रकाशात येण्यासाठी साहित्य संशोधन कार्यशाळा उपयोगी पडतील असे वाटते.
(लेखिका आबासाहेब गरवारे महाविद्यालयात मराठी विभागप्रमुख आहेत.)
[email protected]



























































