ठसा – नरेंद्र लांजेवार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> राजेश देशमाने

प्रयोगशील ग्रंथपाल, मुक्त पत्रकार, निवेदक, स्तंभलेखक, साहित्यिक अशा एक ना अनेक जबाबदाऱया लीलया पार पाडणारे अशी नरेंद्र लांजेवार यांची ओळख होती. नरेंद्र लांजेवार यांचा जन्म 11 मे 1968 चा. शालेय, महाविद्यालयीन शिक्षण बुलढाण्यात घेतल्यानंतर त्यांनी बुलढाण्यातील भारत विद्यालयात ग्रंथपाल म्हणून नोकरी स्वीकारली. नरेंद्र लांजेवार यांनी आपल्या 54 वर्षांच्या आयुष्यात प्रयोगशील ग्रंथपाल म्हणून वाचक चळवळ राबविली. शाळेव्यतिरिक्तसुद्धा कोणत्याही शासकीय अनुदानाशिवाय त्यांनी पन्नास बाल वाचनालय ग्रंथालये सुरू केली. मुलांना लहानपणापासूनच वाचनाची आवड निर्माण व्हावी व वाचन संस्कृती जिवंत राहावी यासाठी ते सतत धडपड करीत असत. शाळेतील अनेक विद्यार्थ्यांना लिहिते वाचते करण्यासाठी वाङ्मय मंडळ शाळेत स्थापन करून हस्तलिखित मासिक दरमहा प्रकाशित करून ते ग्रंथालयाच्या भिंतीवर लावत होते. पालक, मुले आणि शिक्षकांसाठी सुमारे दोनशे कार्यक्रम त्यांनी आकाशवाणीवर घेतले. ग्रंथपालाच्या नोकरीसोबत वाचन साहित्य चळवळीत ते सतत कार्यरत राहत. बुलढाणा जिह्यासाठी सांस्कतिक व साहित्यिक कार्यक्रमाचे आयोजन नेहमी ते करत असत. विदर्भ साहित्य संघाचे ते आधारस्तंभ व आजीवन सदस्य होते. जिल्हास्तरीय साहित्य संमेलन ही संकल्पना त्यांनी मांडली व सातत्याने सुरू ठेवली. महाराष्ट्रातील नामवंत वृत्तपत्रांमधून त्यांनी विपूल लेखन केले. बालक पालक संवाद पत्रकारिता हादेखील त्यांचा आवडता विषय होता. मुक्त पत्रकार म्हणून ते कार्यरत होते. नरेंद्र लांजेवार यांनी शेतकऱयांच्या आत्महत्या, चिता आणि चिंतन, कथांकूर, एका नाण्याची तिसरी बाजू, वाचन संस्कृती, आक्षेप आणि अपेक्षा, शिक्षणावर बोलू काही, सल उकल, प्रश्न आणि प्रश्नचिन्ह, अभिव्यक्तीची क्षितिजे, वाचू आनंदे मिळवू परमानंदे, बुलढाणा जिल्हा साहित्य दर्शन अशा अनेक पुस्तकांचे लेखन केले. त्यांना अनेक पुरस्कारांनीदेखील सन्मानित करण्यात आले. गेली 25 वर्षे बुलढाण्यातील शासकीय स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाचे संचलनदेखील त्यांनी केले. नरेंद्र लांजेवार यांच्यावर साने गुरुजी, विनोबा भावे, नरेंद्र दाभोळकर, बाबा आमटे, मेधा पाटकर यांच्या विचारांचा प्रचंड पगडा होता. डाव्या विचारसरणीशी बांधीलकी ठेवणारे लांजेवार प्रचंड मानवतावादी होते. भारत विद्यालयात ग्रंथपाल म्हणून नोकरी करताना त्यांच्या ग्रंथालयाशेजारी असणाऱया झाडावर कबुतरांचे थवे राहायचे. या सहवासातूनच त्यांच्या फुप्फुसांना संसर्ग झाला व पल्मोनरी फायब्रोसिस आजार जडला, ज्यामध्ये फुप्फुसाच्या कोशिका अकार्यक्षम होत जातात आणि फुप्फुसाचा तेवढा भाग निकामी होत जातो. तीन वर्षांपूर्वी या आजाराचे निदान झाले. तीन वर्षे त्यांनी या आजाराशी झुंज दिली. पद्मश्री डॉ. हिंमतराव बावस्कर यांनी नरेंद्र लांजेवार आजारी असताना त्यांची तीन वेळा भेट घेतली. दोन दिवसांपूर्वीच त्यांच्या फुप्फुसाच्या प्रत्यारोपणाचा निर्णय घेतला होता. त्यासाठी अपोलो हॉस्पिटल, हैदराबादची निवडही केली होती. परंतु हे सर्व प्रयत्न अधुरेच राहिले. मृत्यूच्या काही तास अगोदरपर्यंत ते आजारी असतानादेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांच्या संपर्कात होते. बुलढाण्यात मराठीतील पहिल्या आद्य लेखिका ताराबाई शिंदेंचे स्मारक व्हावे व बुलढाण्यात सुसज्ज नाटय़गृह व्हावे यासाठी ते सतत संघर्ष करीत राहिले. येणाऱया काळात त्यांच्या या दोन इच्छा पूर्ण झाल्या तर त्यांना खऱया अर्थाने श्रद्धांजली ठरेल.