मुद्दा – पाणी हेच जीवन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रा. सचिन बादल जाधव

पृथ्वीवर  सजीव सृष्टीला जगण्यासाठी आवश्यक घटक म्हणजे पाणी. पाण्यामुळे सृष्टी जिवंत राहते. सर्व सजीवांचे जीवन  पाण्यावर अवलंबून असते. पाणी हे बहुमोल आहे, पण तरीही  कळत-नकळत आपल्याकडून पाण्याचा अपव्यय होत असतो. एकीकडे पाण्याचा बेसुमार वापर तर दुसरीकडे हंडाभर पाण्यासाठी उन्हातान्हातील मैलोन्मैलांची वणवण असे विरोधाभास दर्शविणारे चित्र आहे. पृथ्वीवर पिण्याच्या पाण्याचा साठा मर्यादित आहे. त्यामुळे त्याचा वापर जपून करायला हवा.

मानवाने आपल्या सुखसोयींसाठी झाडांची कत्तल केल्यामुळे जंगले नष्ट झाली आहेत. त्यामुळे पाऊस अनियमित पडत आहे. जागतिक बदल, प्रदूषण, ग्लोबल वार्मिंग या विविध कारणांमुळे पाण्याचे स्रोत कमी होत आहेत. पावसाचे प्रमाण कमी होत आहे.  आपले शरीर बऱ्याच अंशी पाण्याने बनलेले आहे. आपण अन्नाशिवाय काही आठवडे जिवंत राहू शकतो, पण पाण्याशिवाय सात दिवसांपेक्षा जास्त जिवंत राहू शकत नाही. दुष्काळ व प्रदूषित पाण्यामुळे पशु-पक्षी आपला जीव गमवू लागले आहेत. आपल्याला मिळणारे हे पाणी वर्षा ऋतूमुळेच मिळते. हे जल टिकवून ठेवले तर मानवी जीवन टिकून राहील हे आताचे कटू वास्तव आहे. म्हणून हे पाणी निष्फळ वाहून जाऊ नये यासाठी माणसाने पावसाच्या प्रत्येक थेंबाचा सदुपयोग करणे जरुरीचे आहे. हा थेंब न् थेंब साठवून ठेवण्याकरिता पाण्याच्या टाक्या, हौद बांधणे, डोंगर उतारावर चार खणणे, धरणे बांधून पाणी अडवणे, शेतात शेततळी बांधणे, बंधारे बांधणे इत्यादी माध्यमांतून जलसंवर्धन होणार आहे.