मुद्दा : धोकादायक नायलॉन मांजा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>नानासाहेब मंडलिक<<

मोठय़ा शहरात व ग्रामीण भागात सध्या नायलॉन मांजाची बिनबोभाट विक्री होत असून पतंगामुळे जीवघेणे अपघात घडत आहेत. हे अपघात टाळण्यासाठी नायलॉन दोराविक्रीवर सरकारला सरसकट बंदी घालण्यात अपयश आले आहे. संक्रांतीच्या काळात सर्वत्र पतंग उत्सव साजरा केला जातो व दुकानदार हे कोणत्या ना कोणत्या स्वरूपात नायलॉन दोराविक्री करण्यात तरबेज आहेत. या नायलॉन दोराविक्रीमुळे जीवितहानी होण्याची शक्यता टाळता येत नाही व पशुपक्षी यांनादेखील त्यापासून धोका आहे. नुकतेच नाशिक सिन्नर या ठिकाणी जीवितहानीची ताजी घटना घडली आहे. काटलेले पतंग धरण्यासाठी मुले गल्लीबोळात, हमरस्त्यावर सैरावैरा पळतात व अपघात घडतात व घडले आहेत. पतंग गच्चीवर उडवणे हेही अपघाताला आमंत्रण आहे हे विसरून चालणार नाही. नायलॉन मांजाविक्रीची बंदी कागदावरच कशी काय? नागरिकांसह पशुपक्ष्यांच्या जीवावरील संक्रांत थांबणार कधी? संक्रांतीचे मुख्य आकर्षण पतंग उडविण्याचे आहे. मात्र दरवर्षी पशुपक्षी व मानव अपघातात सापडले व कायमचे अपंगसुध्दा झाले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने व राष्ट्रीय हरित लवादाने नायलॉन मांजावर बंदी घातली, पण तरीही बिनबोभाट विक्री कोणाच्या छत्राखाली चालू आहे? अनेक ठिकाणी दुचाकी वाहनधारकांच्या जीवावर बेतले हे सत्य आहे. मागील वर्षी पंचवटी नाशिक या शहरात वीजतारांमध्ये अडकलेला पतंग काढताना एक मुलगा शॉक लागून मृत्यू पावला. नुकत्याच पुणे शहरात डॉक्टर महिलेसह आणखी एका महिलेला जीव गमवावा लागला. मुंबईतदेखील सोमवारी एका दुचाकीस्वाराला याच नायलॉन मांजामुळे जीव गमवावा लागला. अशी खूप पतंग अपघाताची उदाहरणे आहेत. आज संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पोलीस, पक्षीप्रेमी, शाळा, कॉलेज, विविध सामाजिक संघटनांनी, इतर सर्वांनीच नायलॉन मांजाविरुद्ध प्रबोधनात्मक उपकम राबविण्याची नितांत गरज आहे. ठिकठिकाणी वीज तारा धोकादायकरीत्या लोंबकळलेल्या आहेत. त्यामुळे अपघात घडतात. नायलॉन मांजाविक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, जेणेकरून मानव व पशुपक्षी यांची जीवितहानी होणार नाही. जीवघेणे अपघात टाळण्यासाठी संबंधित विभागाने कायद्याच्या आधारे त्वरित कारवाई करावी ही सर्वांचीच रास्त मागणी आहे. विकृतीने प्रेरित होऊन सण साजरे करण्याऐवजी सुसंस्कृतपणे साजरे केले पाहिजेत. खरं तर ज्या ठिकाणी मांजा निर्माण होतो तिथेच आळा घालण्यासाठी प्रयत्न करावेत.