संस्कृती सोहळा – गोविंदाचा लागला छंद नामाचा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रा. डॉ. प्रकाश खांडगे

श्रीकृष्ण हा योगेश्वर असला तरी त्याचे लोकसखा हे रूप जनसामान्यांमध्ये लोकप्रिय आहे. श्रीकृष्ण केवळ लोकसखा नाही तर लोकनायकही आहे. त्यामुळे अवघ्या विश्वाचा नियंता अर्थात ‘जगत् नियंता’ म्हणून त्याचे रूप सर्वपरिचित आहे.

‘गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ।’ असा भगवान श्रीकृष्णाचा नामघोष गोकुळ अष्टमी आणि गोविंदाच्या दिवशी सुरू असतो. कारण भगवान श्रीकृष्ण हे अवघ्या हिंदुस्थानवासीयांचे दैवत! श्रीकृष्ण हा योगेश्वर असला तरी त्याचे लोकसखा हे रूप जनसामान्यांमध्ये लोकप्रिय आहे. श्रीकृष्ण केवळ लोकसखा नाही तर लोकनायकही आहे. त्यामुळे अवघ्या विश्वाचा नियंता अर्थात ‘जगत् नियंता’ म्हणून त्याचे रूप सर्वपरिचित आहे. ‘योगियांना दुर्लभ असणारा कृष्ण मी पहिला’ असे गौळणी एकमेकींना सांगतात. गोकुळातल्या गौळणींचा उल्लेख संतांनी ‘वेदगर्भीच्या श्रुति’ असा केला आहे. ‘श्रुति नेति नेति म्हणती’ असे संतांनी म्हटले आहे. ‘असा नाही असा नाही मग कसा?’ असा कृष्णाबाबतचा चकवा संतांनाही पडला. मग ते शेवटी म्हणतात, ‘तोचि घरी आला नंदाच्या राऊळा.’

‘रूप धरिले सगुण चांगले’ कृष्णाचा महिमा मयुरा, वृंदावनात सोहळ्याच्या रूपाने सुरू असतो कृष्णाष्टमीला. आंध्र प्रदेशात हारिकथेच्या रूपाने, कर्नाटकात यक्षगानाच्या रूपाने, पश्चिम बंगालमध्ये कीर्तनियाच्या रूपाने, बाऊलच्या रूपाने, आसाममध्ये नटसंकीर्तनच्या रूपाने, उत्तर प्रदेशात रासलीलेच्या रूपाने, मयूर नृत्याच्या रूपाने श्री कृष्णाचे संकीर्तन सुरू असते. काही ठिकाणी नुसतेच कथाकथन, गायन, काही ठिकाणी नृत्य, नाटय़ सुरू असते.

महाराष्ट्रात सोंगी भारूड, कीर्तन, तमाशातील गौळण आदी प्रकारात श्रीकृष्णाचे संकीर्तन सुरू असते. त्यातील कीर्तन प्रकारात नेमाचे कीर्तन म्हणजे नित्य कीर्तन आणि नैमित्तिक कीर्तन असे दोन प्रकार वारकरी कीर्तनात येतात. श्रीराम जन्म, श्रीकृष्ण जन्म, दत्त जयंती, हनुमान जयंतीची कीर्तन ही नैमित्तिक कीर्तनात मोडतात. संपूर्ण महाराष्ट्रातील मंदिरांमधून कृष्णाष्टमीची कीर्तने रात्री नऊला सुरू होतात आणि रात्री 12 वाजता कृष्ण जन्म साजरा होतो. कृष्ण जन्माच्या कीर्तनाचे विशिष्ट अभंग असतात ते असे –

आकाशाची वाणी सांगें सकळांसी ।

तळमळ मानसी करूं नका ।।1 ।।

देवकीच्या गर्भा येईल भगवान ।

रक्षील ब्राह्मण गाई भक्त ।। 2 ।।

उतरील भार मारील दैत्यांसीं ।

आनंद सर्वांशी करील तो ।।3 ।।

रोहिणी उदरीं शेष बळिभद्र ।

यादव समग्र व्हा ते तुम्ही ।।4 ।।

ऐकोनियां ऐसें आनंद मानसी ।

येती स्वस्थळासी नामा म्हणे ।। 5 ।।

वारकरी संत साहित्याचे अभ्यासक डॉ. दतात्रय डुंबरे यांनी वारकरी श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या कीर्तनाबद्दल माहिती देताना सांगितले, ‘वारकरी आणि नारदीय या दोन्ही परंपरांमध्ये श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करतात. त्या वेळी जन्माचा अभंग झाल्यावर पाळणा बांधला जातो. पाळण्यात श्रीकृष्णाची मूर्ती ठेवलेली असते. मुख्य कीर्तनकार पाळण्याची दोरी हाती धरतो. पाळण्यावर भक्त भाविक फुले उधळतात. कीर्तनकार बुवा, टाळकरी आणि महिला मंडळ श्रीकृष्णाचा पाळणा म्हणतात. बाळक्रीडेचा अभंग होतो.  ‘कंठी धरला, कृष्ण मणी’ अभंग सुरू होतो आणि प्रत्यक्ष शिंक्यावर दहीहंडी बांधलेली असते ती कीर्तनकार फोडतो. त्यानंतर रात्री बारानंतर गोपाळकाला सुरू होतो. वारकरी कीर्तन सप्ताहात शेवटचे कीर्तन काल्याचे कीर्तन असते. ‘काला  वाटू एकमेका । वैष्णवनिका सकळ’ असे अभंग सुरू असताना दही – लाह्यांचा काला भाविकांना वाटला जातो.’

‘गोकुळीच्या सुखा । अंतपार नाही

लेखा । बाळकृष्ण नंदा घरी

आनंदल्या नरनारी । गुढी या तोरणे

करिती कथा गाती गाणे ।’

असे श्रीकृष्ण जन्मानंतरचे गोकुळींचे वर्णन येते. गौळणी आणि कृष्णाच्या खोडय़ांचे वर्णन बाळक्रीडेच्या अभंगाद्वारे होते.

कीर्तनातील संकीर्तनाने कृष्णमय झालेल्या वातावरणानंतर गोपाळकाला संपूर्ण देशभर साजरा होतो. मुंबईत गोपाळ काल्याचा उत्साह इतका मोठा असतो की, त्याचे रूपांतर कधी कधी उन्मादात होते. लालबाग, परळ, माझगाव, गिरगाव, गिरणगावात गोपाळ काल्याचा म्हणजे दहीहंडीचा अपूर्व सोहळा असायचा. स्थानिक लालमातीतले पैलवान आणि त्यांचे म्होरके हाती चांदीची गदा फिरवीत रात्रीचं श्रीकृष्ण जन्म झाल्यावर निघायचे.

गोविंदा रे गोपाळा । गोविंदा रे गोपाळा ।

यशोदेच्या ताह्या बाळा ।

तुझ्या घरात नाही पाणी ।

घागर उताणी रे गोविंदा ।

गोविंदा रे गोपाळा । गोविंदा रे गोपाळा ।

ढा कू मा कू म ढा कू  मा कू म  ढोलांच्या, झांजांच्या आवाजात गोविंदा निघायचा. गिरगाव, गिरणगावचे लोण उपनगरात, ठाणे, वसई, विरार, कल्याण, भिवंडी, डोंबिवलीकडे पोहचले. गोविंदा राजकीय झाला तरी चैतन्य कायम होते. आता कोरोनामुळे गोविंदावर बंधने आली आहेत. ‘घटा घटांचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे’प्रमाणे ‘थरा थरांचे रूप आगळे’ असे आजच्या गोविंदाचे स्वरूप आहे. थरांचा थरथराट असला तरी गोविंदा म्हणजे राज्यातल्या तरुणाईचा खळाळत राहणारा चैतन्याचा झरा! गोविंदाला राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय लौकिक प्राप्त झाला. त्याला राष्ट्रीय साहसी खेळाचा दर्जा प्राप्त करून देण्याचे प्रयत्न सुरू झाले. आधुनिक गोविंदाभोवती प्रकाशझोत वाढला, पण या उत्साहात एखाद्या मंदिरात साजऱया होणाऱया श्रीकृष्ण जन्मोत्सवाचा मांगल्यमय नंदादीपही स्मरणात ठेवावा लागेल. कारण तो संस्कृतीचा खरा मूलाधार आहे.

(लेखक ज्येष्ठ लोककला अभ्यासक आहेत)

 [email protected]