
>> वैश्विक
दिवस ‘ऑक्टोबर हीट’चे आहेत. पाऊस निश्चित गेलाय की नाही ते आकाशाकडे बघून रोज ठरवावं लागतंय. इतका बदल वातावरणात गेल्या काही वर्षांत घडताना दिसतोय. ‘क्लायमेट चेन्ज’ला वगैरे अर्थ नाही असं मानणारी मंडळीही बरीच आहेत. त्यांना त्याचं गांभीर्य जाणवत नाही किंवा प्रत्यक्ष झळ पोचत नसते, परंतु अमेरिकेसारख्या प्रगत देशाच्या पूर्व किनाऱ्यावरील फ्लोरिडा राज्यात ‘इयान’ नावाच्या वादळाने जे काही अभूतपूर्व थैमान घातलंय आणि कोलोरॅडो नदीच्या पाणीटंचाईमुळे ‘सिलिकन व्हॅली’सारख्या कॅलिफोर्नियातील ‘पॉश’ भागात ‘विजेचं ‘लोडशेडिंग’ करावं लागलं या बातम्या सुखावह नाहीत.
विराट विश्वाचा छोटासा अंश असलेली आपली सूर्यमाला आणि त्यातील अल्पांशाने असलेली आपली पृथ्वी वैश्विक पर्यावरणाचाही भाग असतेच. सूर्यावर गेल्या सहा आणि सात ऑक्टोबरला सौर वादळांचा ‘मॅक्झिमा’ म्हणजे अत्युच्च बिंदू होता. याचा अर्थ असा की, आपला जनक-तारा असलेल्या सूर्याचा क्षोभ होण्याचा हा काळ आहे. दर 11 किंवा 121 वर्षांनी सूर्याच्या पृष्ठभागावरील काळे डाग (डार्क स्पॉट) म्हणजे तुलनेने कमी तापमानाचा सन स्पॉट एकदम उष्णतेची उसळी घेऊन प्रसरण पावतो असे अनेक स्पॉट असतात. त्यातून उसळणाऱ्या सौर ज्वाला सूर्याच्या पृष्ठभागावरून बाहेर अंतराळात एक-दीड कोटी किलोमीटरपर्यंत फेकल्या जातात आणि सूर्याच्या प्रचंड गुरुत्वाकर्षणामुळे कमानीसारख्या होऊन पुन्हा सूर्याकडे खेचल्या जातात.
या सगळ्या घुसळणीचा परिणाम म्हणजे सूर्याच्या चुंबकीय क्षेत्राचा झालेला प्रकोप पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राला भिडतो आणि पृथ्वीवरच्या आधुनिक यंत्रणा धोक्यात आणतो. पृथ्वीच्या दक्षिण व उत्तर धुवीय भागात नेहमी दिसणारे ‘अरोरा’ किंवा रंगीबेरंगी ध्रुवीय प्रकाश दूरवरून दिसू लागतो.
या सौर वादळांची आणि त्यांच्या घातक परिणामांची नोंद रिचर्ड कॅरिंग्टन आणि रिचर्ड हॉगसन यांनी 1 सप्टेंबर 1859 रोजी केली तेव्हापासून अशा उत्पाती सौर वादळांना ‘कॅरिंग्टन इव्हेंट’ असं नाव मिळालं. अशा सौर वादळाची पाश्चात्त्य देशांतली नोंद अगदी इसवी सन 774 मधली आहे. सोलार सायकल किंवा सौर चक्राच्या नियमिततेचा अंदाज येऊ लागल्यावर सौर-डाग केव्हा जास्त असतील याचं भाकीत करणं सोपं झालं. 1859 मध्ये झालेल्या सौर वादळाने जगात क्वचित कोठे असलेल्या टेलिग्राम किंवा तारयंत्रणेवर विपरीत परिणाम झाला होता. त्यावेळी हिंदुस्थानातसुद्धा तारायंत्र होती आणि तत्काळ संदेश ‘कड-कट्ट’ प्रकारच्या तारेने पाठवला जायचा. स्थानिक पोस्ट ऑफिसमधली ही यंत्रे आम्ही पाहिलेली आहेत.
मात्र 1859 नंतर टेलिफोन, वीजपुरवठा, विजेच्या बॅटऱ्या, कपॅसिटर्स आणि कालांतराने कृत्रिम उपग्रह, कॉम्प्युटर, सेलफोन असं सगळं इलेक्ट्रोमॅग्नेटिकच्या कक्षेत आलं. सौर वादळांनी आता दणका दिला तर ही सर्व यंत्रणा काही काळ खंडित किंवा दीर्घकाळ निकामी होऊ शकते. 1925 मध्ये अशा वादळांनी टेलिग्रामबरोबरच टेलिफोन यंत्रणा आणि रेडिओ प्रक्षेपणात अडथळा आणला होता. 1989 मध्ये टीव्ही प्रक्षेपणात व्यत्यय आला. त्यामुळे संभाव्य सौर वादळापासून सावध राहायला हवं हे खरं असलं तरी एखाद्या सन स्पॉट म्हणून उफाळणाऱ्या सौर ज्वाला सेकंदाला 3000 किलोमीटर (कारण त्या प्रकाशकणांच्या (फोटॉन) असतात) सूर्याबाहेर फेकल्या जात असल्याने उपग्रहांनाही त्यांचा पत्ता केवळ 30 मिनिटं आधी लागू शकतो. तेवढय़ा वेळात कसली उपाययोजना करणार!
थोडक्यात कॅरिंग्टन इव्हेन्टचा प्रकोप झालाच तर तो टाळता येणं कठीणच. 2012 मध्येही सौर-वादळांचा परिणाम पृथ्वीवर झाला होता, पण त्याची तीव्रता कमी असल्याने आपण ती गोष्ट विसरूनही गेलो. या उसळणाऱ्या सौर ज्वालांना करोनो मास इजेक्शन असं म्हणतात. त्यांचा प्रताप पुढच्या पिढय़ांना जास्त जाणवेल याचं कारण आपली तांत्रिक प्रगती.
एका बाजूला या संशोधनाच्या जीवावर आपण चंद्र, मंगळावर उडय़ा मारण्याची स्वप्न पाहत असलो तरी या इलेक्ट्रोमॅग्नेटिक यंत्रणांवर सौर वादळांचा तडाखा बसला तर प्रचंड नुकसान होऊ शकतं. त्यांचा फारच मारा झाला तर कृत्रिम उपग्रह निकामी होऊ शकतात. मग विजेअभावी संदेशवहनाशिवाय जगाला काही काळ अंधारयात्रा अनुभवायला मिळू शकते.
म्हणून सूर्याचा जवळून अभ्यास करण्यासाठी नॅसा आणि युरोपीय स्पेस एजन्सी वगैरे मंडळींनी हे यान सोडलंलं आहे. सूर्याचं प्रभामंडळ ऊर्फ करोना त्याने जेव्हा जवळून न्याहाळल तेव्हा ‘सूर्यस्पर्श’ या लेखातून आपण त्याविषयी माहिती घेतली होती.
सध्याच्या सौर वादळामुळे यंदा ऑक्टोबरात माणसांवरच नव्हे तर झाडंपानं आणि पशुपक्ष्यांवर काय परिणाम होतात ते पहावं लागेल. कारण चुंबकीय क्षेत्राचं नैसर्गिक (इन्स्टिंक्टिव्ह) ज्ञान असलेले पक्षी मार्गावरून भरकटू शकतात, होरपळू शकतात. आपले सेलफोन बंद पडू शकतात. असं झालं तर तो सूर्यप्रकोप समजायचा आणि नाही घडलं तर सूर्यकृपा म्हणायची!






























































