आभाळमाया – चांद्रजलाचा शोध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> वैश्विक  

या  महिन्यात आपण चंद्राविषयीचं ‘लेटेस्ट’ संशोधन जाणून घेतोय. गेल्या लेखात आपण चंद्रावरच्या मातीविषयी वाचलं. यावेळी चंद्रावरच्या पाण्यासंबंधी. चंद्रावर पाणी असलं तर तिथे वसाहत करू इच्छिणाऱ्या अनेकांना अत्यानंद होईल. चंद्र केवळ आकाशात दिसत होता, त्याच्या कला आणि ग्रहणांचं नुसत्या नजरेने किंवा दुर्बिणीतून निरीक्षण केलं जात होतं त्या काळात त्याचा वैज्ञानिक मागोवा घेण्यापेक्षा तो कविकल्पना फुलवण्याचं एक साधन बनला होता. तलतचं मराठी गाणं ‘घे झाकून मुख हे चंद्रमुखी’ आठवून पहा. सौंदर्याचं लक्षण म्हणून चंद्राची उपमा दिली जायची, परंतु 20/21 जुलै 1969 नंतर चंद्राविषयीच्या साऱ्या संकल्पनाच बदलल्या. पृथ्वीच्या या एकमेव नैसर्गिक उपग्रहावर काळीशार माती आणि खडक आहेत, वातावरण अतिशय विरळ आणि गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या एकषष्ठांश आहे वगैरे माहितीचा ‘धो धो’ मारा होऊ लागल्यावर नव्या पिढीची चंद्राकडे पाहण्याची दृष्टीच बदलली. ती वैज्ञानिक झाली.

अमेरिकेने अट्टहासाने 1960 मध्ये चंद्रावर पहिला माणून उतरवला. रशियाने पहिला अंतराळवीर अवकाशात पाठवल्याने ‘इगो’ दुखावलेल्या अमेरिकेला त्याहून मोठा अंतराळी पराक्रम करावासा वाटला. तत्कालीन अध्यक्ष जॉन केनेडी यांनी तर ‘‘1970 उजाडायच्या आत अमेरिका चंद्रावर माणूस पाठवेल आणि हे काम सोपं नसून कठीण आहे. म्हणूनच आम्ही हे आव्हान स्वीकारतोय’’ असं स्फूर्तिदायक भाषण  केलं होतं. अमेरिकन शास्त्रज्ञांनी त्यांचा हा अभिमान सार्थ ठरवला, पण तो पाहायला केनेडी हयात नव्हते. नील आर्मस्ट्राँग चंद्रावर उतरले तेव्हा रिचर्ड निकसन अमेरिकेचे अध्यक्ष होते.

चंद्रावर पाऊल ठेवल्यानंतर या जवळच्याच नव्या भूभागावर पुन्हा जाता येईल का, तिथे जाऊन राहता येईल का? अशा गोष्टींची चर्चा होऊ लागली. इथे एक गमतीची गोष्ट किशोर कुमारने ‘न्यू दिल्ली’ चित्रपटात 1956 मध्ये एक गाणं गायलंय. कवी शैलेंद्र यांच्या या गाण्याचं संगीत शंकर-जयकिशन यांचे आहे. कविकल्पना कशी आगामी काळाची चाहूल सांगते पहा. त्यात किशोरच्या तोंडी एका कडव्याची सुरुवात मराठीत होते. ‘तुला भीती रे कसली वाटते रे…’ आणि पुढे म्हटलंय ‘कल चांद और तारों में पहुंचेगा ऐटमी घोडा!’ हा ऐटमी घोडा म्हणजे रॉकेट. माणूस अंतराळातही जाण्यापूर्वीची ही दूरदृष्टीची कल्पना.

माणूस चंद्रावर गेल्यावर तेरा वर्षांनी ती खरी ठरली आणि माणसाच्या संशोधनाबरोबरच त्याचा हव्यासही वाढू लागला. वैज्ञानिक त्यांचं काम करत असतानाच अनेकांना चंद्रावरच्या जमिनीचा ‘व्यवहार’ कसा करायचा, तिथे ट्रिप कशी न्यायची, वस्ती कशी करायची याची स्वप्नं पडू लागली, पण चंद्रावरच्या भूमीवर पदचिन्ह उमटवलं तरी तेवढं जगण्याला पुरेसं नव्हतं. तिथे ना हवा ना पाणी. मग शोध सुरू झाला पाण्याचा. कारण पाणी सापडलं तर त्याचं विघटन करून प्राणवायू आणि हायड्रोजन मिळेल. म्हणजे श्वसनाची आणि इंधनाची सोय झाली. गुरुत्वाकर्षणाचं पुढे बघू पण आधी तिथे पाणी शोधायचं आणि मग त्या जमिनीत काही पिकं येतील का पाहायची या दृष्टीने संशोधन सुरू झालं. असं म्हटलं जातं की, काही अब्ज वर्षांपूर्वी चंद्र तरुण असताना तिथे पाणी आणि वातावरण होतं. 1961 मध्ये कॅल्टेक विद्यापीठाचे अभ्यासक वॉटसन आणि मूरी यांनी चंद्रावरच्या पाण्याची आता वाफ झाली असली तरी त्याच्या ध्रुवीय प्रदेशात जमिनीत खोलवर जलसाठे असतील असं भाकीत केलं होतं. त्यात तथ्य आहे हे हळूहळू लक्षात येऊ लागलं. ‘अपोलो-14’ मोहिमेतूनही त्याला दुजोरा मिळत होता. त्यापूर्वी रशियाचं ‘ल्युना’ 1976 मध्ये चंद्रावर उतरवलं. त्याने चांद्रमातीचे जे नमुने आणले त्यातही पाण्याचा 0.1 टक्का अंश दिसत होता.पण ही माती पृष्ठभागाच्या 194 सेंटिमीटर खोलवरून काढली होती. चांद्रपृष्ठावर पाण्याच्या थेंबाचीही तीव्र सूर्यप्रकाश आणि सौर वाऱ्यांमुळे लगेच वाफ होते.

मग चंद्रावर पाणी राहणार कसं? त्याचं एक उत्तर असं की, तुलनेने कमी सौर ऊर्जा पोचणाऱ्या चंद्राच्या ध्रुवीय प्रदेशात कधीकाळी धडकलेल्या शेकडो धूमकेतूंनी जो बर्फाचा साठा सोडला आहे, त्यातून पाणी मिळेल. 2005 मध्ये जपानच्या कागुया मोहिमेत मात्र गॅमा रे परीक्षणात पाणी फार आढळलं नव्हतं. काही धातूंचा शोध लागला पण पाण्याची वानवा होती.

हे यश हिंदुस्थानने सोडलेल्या ‘चांद्रयान-1’ या यानातून पाठवलेल्या ‘नासा’च्या ‘इम्पॅक्ट प्रोब’ला लाभलं. ‘चांद्रयान-1’ मधून चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळच्या शेक्लेटन विवरात नासाच्या या ‘इम्पॅक्ट प्रोब’ (धडक यंत्रणेने) उडी घेतली आणि त्याला चंद्रावरील पाण्याचा सुगावा लागला. आपल्या दृष्टीने हे मोठं यश होतं. कारण जागतिक संशोधनातल्या एका समस्येवरचा उतारा त्यातून सापडत होता. या गोष्टीलाही आता एक तप उलटलं. आता ‘नासा’चे त्यादृष्टीने आणखी प्रयत्न सुरू आहेत. पण समजा पाणी सापडलंच तर या चांद्रतलावर, तिथल्या भूमीवर ‘हक्क’ कोणाचा याची चर्चा आताच होऊ लागली आहे. युनोच्या ‘आउैटर स्पेस ट्रीटी’ किंवा जागतिक अंतराळ करारानुसार कोणीही चंद्रावर संशोधन करू शकतो… परंतु उद्या एखाद्या देशाने तिथे कृत्रिम वसाहत उभारली आणि दुसऱ्या देशानेही तसंच काही करायचं ठरवलं तर? तर शहाणी माणसं सौहार्दाने एकत्र नांदू शकतात… मात्र जगाची स्पर्धेची तऱ्हा ‘निराळ’च आहे. त्यात उद्या बिचारा चंद्रही ओढला जाणार!

[email protected]