
>> वैश्विक
अवकाशाची ओळख करून घेण्याचा उत्तम काळ आलेला असताना ती ओळख रंजक पद्धतीने करून घेणे एवढय़ासाठी महत्त्वाचे असते की, त्यामुळे ज्या तारकासमूहांचा अभ्यास करायचा त्यांचे आकार लगेच लक्षात राहतात आणि या तारकासमूहांविषयीच्या प्राचीन कथांवरून हेच साध्य होत असते. एरवी निखळ खगोल अभ्यासात ही नावे आणि आकार यांना फारसा अर्थ नसतो. उदाहरणार्थ मृग नक्षत्र किंवा तारकासमूह. अतिशय सुंदर अशा या तारकासमूहाचा आकार आपल्याकडच्या संकल्पनेनुसार पारध झालेल्या मृग किंवा हरणाचा आहे. ग्रीक कथेनुसार याच आकारात ‘ओरायन’ नावाचा शिकारी बसवता येतो. दोन्ही आकार वेगवेगळा विचार करताना खरेच वाटतात. पण मृगातील ताऱ्यांनी हरीण किंवा शिकारी चितारणारे तारे काही एखाद्या फळय़ावर काढलेल्या चित्रासारखे नसतात. म्हणजे एकाच पातळीवर (प्रतलात) नसतात. त्यांचे खगोलीय स्वरूप आणि अंतर भिन्न असते. त्या सगळय़ांचे मिळून एकच ‘रूप’ पाहताना ही गोष्ट सतत लक्षात ठेवावी लागते.
आम्हाला आकाश शिकवणाऱ्या प्रदीप नायक सरांचा उल्लेख या लेखमालेत बऱ्याचदा येतो. याचे कारण गेली छत्तीस वर्षे ते एका ध्यासाने हजारो लोकांना आकाशाचे ‘धडे’ देतायत. तारकासमूहांचं वर्णन करताना ते प्राचीन कथाही अगदी रंगवून सांगतात आणि त्याचबरोबर या कथा केवळ नक्षत्रांची ओळख करून घेण्यापुरत्याच आहेत याची जाणीव करून देऊन वैज्ञानिक माहितीवर भर देतात. रंजक वर्णनामुळे क्लिष्ट वाटणारी खगोलीय माहितीही त्या निवेदनातून कायमची ध्यानात राहाते.
चंद्र पत्नी रोहिणीच्या मोहात पडलेल्या प्रजापतीला शिक्षा करण्यासाठी ‘व्याध’ निर्माण झाला आणि त्याच्या त्रिकांड बाणाने त्या मृगाचा वेध घेतला. तेच मृग नक्षत्रात दिसते किंवा हाती ढाल आणि खड्ग घेतलेला ‘ओरायन’ शिकारीही ग्रीक कथा ऐकली की ‘दिसू’ लागतो. पण हा केवळ तारकासमूह लक्षात राहण्यासाठीचा स्मरण रंजनाचा खेळ. प्रत्यक्षात मृगातील काक्षी (बिट्टलग्युस) मृत्युपंथाला लागलेला लाल महाकाय तारा सूर्याच्या 18 कोटीपट विशाल आहे. मात्र त्याची घनता फारच कमी म्हणजे सूर्यापेक्षा 20 पट कमी आहे. तो पृथ्वीपासून सुमारे 430 प्रकाशवर्षे अंतरावर आहे. सेकंदाला धावणाऱ्या प्रकाशवेगाने तिथे पोहोचायला एवढी वर्षे लागतील असाच त्याचा अर्थ. हा आपल्या मृगाचा एक पाय आहे. त्याचा दुसरा पाय (किंवा खूर) असलेला तेजस्वी राजन्य (रिगेल) हा तारा नजरेला एकाच प्रतलावर दिसत असला तरी तो आपल्यापासून 775 प्रकाशवर्षे अंतरावर असून या ताऱ्याला एक जोडीदार असल्याने त्याचे स्वरूप ‘द्वैती’ आहे. तिसरा पाय मिन्टाका ताराही असाच ‘द्वैती’ किंवा जोडतारा आहे. तो आपल्यापासून 920 प्रकाशवर्षे अंतरावर आहे. चौथा बेलट्रिक्स आपल्यापासून 245 प्रकाशवर्षे अंतरावर आहे. या हरणाच्या शेपटीत एक प्रचंड तेजोमय ‘नेब्युला’ असून तो आपल्यापासून 1600 प्रकाशवर्षे अंतरावर असून सुमारे 20 हजार सूर्यमाला त्यामध्ये सामावल्या जाऊ शकतील एवढा त्याचा विस्तार आहे.
याच मृग समूहाचा उल्लेख खेडोपाडय़ात काही ठिकाणी ‘खाटलं-बाजलं’ असाही होतो. म्हणजेच तारकासमूह लक्षात ठेवण्यासाठी विविध संस्कृतींमधल्या लोकांनी आपल्या आसपासच्या वस्तू किंवा प्राण्यांचे आकार त्यात बसवल्याने त्यांचं निरीक्षण सहज करता येऊ लागले.
एकाच तारकासमूहातील तारे परस्परांपासून खूप दूर तसंच वेगळय़ा खगोलीय ‘स्वभावा’चे असले आणि आपल्यापासून प्रत्येकाचं अंतर भिन्न असलं तरी ते आपल्याला एकाच फलकावर चितारल्यासारखे का दिसतात? याचेही कारण त्यांच्यातले आणि आपल्यातले प्रचंड अंतर हेच अहे. यासाठी आम्ही एक साधा प्रयोग करतो. रंगीत मखमली बोर्डावर ठळकपणे दिसतील अशा काही पिना किंवा काडय़ा चिकटवतो. त्यांचे आकार किंवा लांबी कमी जास्त असते. पण दुरून पाहिल्यास त्यांची डोकी (हेड्स) एकाच प्रतलात असल्याचा भास होतो. अवकाशी आकारांचेही तसेच आहे.



























































