आभाळमाया – धूमकेतूंचे ‘जग’!

>> वैश्विक 

गाजावाजा होत असलेला ‘झेडटीएफ’ धूमकेतू गेल्या पंधरवडय़ात एकदा बरा तर एकदा धूसर दिसला. साधारण देवयानी दीर्घिका दिसावी तसा. धूमकेतूंच्या स्वरूपाविषयीचे आडाखे कधी कधी तसेच प्रत्यक्षात उतरत नाहीत. याचा अनुभव आम्ही 1986 मध्ये ‘हॅली’चा धूमकेतू आला, त्यावेळीच घेतला होता. ‘धूमकेतू’ची वैज्ञानिक चर्चा मात्र आपल्याकडे ‘हॅली’पासूनच सुरू झाली. त्यापूर्वी आलेले कोहौतेकसारखे (1973) धूमकेतू थोडय़ा ‘धास्तावूनच’ पाहिले गेले. शेंडे नक्षत्र दिसलं म्हणजे काहीतरी विपरीत घडणार असा पगडा तेव्हा जनमानसावर अधिक होता. पूर्वी तसाच तो युरोपातही होता. 1910 चं ‘हॅली’चं दर्शन एवढं विलोभनीय होतं की, फोटोग्राफी आल्यानंतरच्या काळात इतका मोठा पिसारा असलेला धूमकेतू टिपण्याची संधी खगोल अभ्यासकांना क्वचितच मिळाली. त्यातला अलीकडचा अपवाद ‘हय़ाकुताके’ या ग्रीन कॉमेटचा.

नंतरही अनेक धूमकेतू येत राहिले. त्यांचा अभ्यास वाढला  तशी धास्ती कमी झाली. आबालवृद्ध धूमकेतू पाहण्यासाठी आकाशाकडे रात्री तासन्तास नजर रोखण्यासाठी तयार झाले.  आता दिसत असलेला धूमकेतू पोपटी रंगाचा आहे. दुर्बिणीतून फोटो घेतले तर ते चांगलंच स्पष्ट होतं. असे अनेक डिजिटल फोटो ‘स्टॅक’ करून (म्हणजे एकावर एक ठेवून) योग्य ती प्रतिमा प्राप्त होते. हे तंत्रज्ञान आता तरुणाईला सहज अवगत आहे… तर या नव्या धूमकेतूच्या निमित्ताने एकूणच धूमकेतूंच्या ‘जगा’ची उजळणी करायला हरकत नाही.

आदिम काळापासून माणसं धूमकेतूंचं निरीक्षण करतच होती. अनेक वर्षांनंतर केव्हातरी अचानक ‘शेपटी’ असलेलं असं ‘नक्षत्र’ दिसायला लागलं की, त्यांना त्या काळानुसार भीतीही वाटत होती. तरीसुद्धा प्राचीन काळापासून केवळ खगोल अभ्यासकांनी त्याचा वैज्ञानिक शोध घेण्याचा प्रयत्न केला. ‘धूम’ म्हणजे धूर, धूसर आणि ‘केतू’ म्हणजे पिसारा, पताका अशा अर्थी ‘धूमकेतू’ हा शब्द आला. अर्थात त्या वेळी धूमकेतू नेमके येतात कुठून, त्यांचं मूळ स्वरूप काय असतं हे ठाऊक होण्याची शक्यता नव्हती. आहेत त्या केवळ धूमकेतू दिसण्याच्या प्राचीन नोंदी. कॉम्प्युटर युग अवतरल्यानंतर ग्रह-गणित किंवा खगोलीय गणिताद्वारे धूमकेतूचं जन्मस्थान, गती, स्वरूप आणि कालावधी यांची माहिती मिळालीच, पण एडमंड हॅली यांनी त्या काळातही (अठराव्या शतकात) आपण शोधलेला धूमकेतू 1910 मध्ये पुन्हा येणार असं म्हटलं होतं आणि तसंच घडलं. प्रसिद्ध अमेरिकन विनोदकार मार्क ट्वेन म्हणत, ‘‘मी ‘हॅली’ धूमकेतूबरोबर जन्मलो आणि त्याच्या बरोबरच जाणार!’’ ट्वेन 76 व्या वर्षी गेले हा केवळ योगायोग. सेन्ट हेलेना येथील वेधशाळेतून अवकाशाचा वेध घेणाऱ्या हॅली यांनी 1705 मध्ये न्यूटनच्या गणितावरून हा धूमकेतू 1758 मध्ये येईल असं सांगितलं, पण पाहण्यापूर्वीच 1742 मध्ये हॅली निधन पावले. मग त्यांचं नाव या धूमकेतूला दिलं गेलं.

ठरावीक कालावधीने येणारे किंवा पॅरॅबोलिक (अण्वस्त्र्ा) कक्षेमुळे एकदाच दिसू शकणारे धूमकेतू येण्याची एखादी ‘जागा’ असावी याचा विचार होऊ लागल्यावर लय़ुशनर या शास्त्र्ाज्ञाने त्यांच्या ‘जगा’विषयी भाकीत केलं, तर अर्नेस ओपिक यांनी धूमकेतू सूर्यसंकुलाच्या सीमेवरच्या भागात आहेत असं म्हटलं. त्याबाबत ठोस सिद्धांत मांडला तो डच संशोधक जॅन उर्ट यांनी. 1950 मध्ये सूर्यसंकुलाबाहेर धूमकेतूंचा सूर्य संकुलाभोवतीच पसरलेला ‘ढग’ असून त्यात ते लक्षावधी धूमकेतू जन्मतात असं म्हटलं. म्हणूनच या ‘ढगा’ला ‘उर्ट क्लाऊड’ असं नाव मिळालं.

या क्लाऊडमध्ये हजारो अब्ज (ट्रिलियन) एवढय़ा संख्येने छोटे-मोठे धूमकेतू भिरभिरत आहेत. त्यातले बहुसंख्य छोटय़ा आकाराचे म्हणजे 1 ते 2 किलोमीटर व्यासाचे असले तरी इतर अब्जावधी धूमकेतूंचा व्यास 20 किलोमीटर एवढा मोठा असतो. उर्ट क्लाऊडचा अंत सूर्यमालेशीच निगडित आहे.

धूमकेतूंचा हा ‘ढग’ 4.6 अब्ज वर्षांपूर्वी सूर्याच्या भोवतीचे आपल्या पृथ्वीसारखे ग्रह तयार होत असताना झालेल्या वस्तुमानातील ‘देवाण-घेवाणी’तून झाला. त्यातील अनेक धूमकेतू ‘सन ग्रेझिंग’ म्हणजे सूर्याच्या जवळ जाऊन त्यातच विलीन झाले आणि अजूनही होत असतात. काही धूमकेतू सूर्यमालेतील गुरू-शनीसारख्या मोठय़ा ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणाने खेचले जातात. शूमेकर-लेव्ही यांनी शोधलेला नववा धूमकेतू तुकडे होत गुरू ग्रहावर आदळल्याचे फोटोही प्रसिद्ध झाले होते. आम्हीही ती ‘धडक’ दुर्बिणीद्वारे पाहण्याचा प्रयत्न केला होता, पण त्या वेळी आपल्याकडे नेमकं जुलै महिन्यातील पावसाळी वातावरण होतं.

‘उर्ट क्लाऊड’च्या अंतर्भागाला ‘हिल्स क्लाऊड’ असंही म्हणतात. तेसुद्धा एका संशोधकाचं नाव आहे. अनेक धूमकेतू हिल्स किंवा उर्ट क्लाऊडमधून विलक्षण वेगाने बाहेर पडतात आणि सूर्याच्या दिशेने जाऊ लागतात. अनेकदा त्यांची गती रोखणारं ‘इन्शुलेटिंग’ कवच तयार होतं आणि ते तिथेच राहतात. तरी त्यांची संख्या आणि चपळता अशी की, ‘उर्ट’च्या मर्यादेतून बाहेर पडून सूर्याकडे येणाऱ्या धूमकेतूंची संख्या खूप असते. त्यातले अनेक अगदी नगण्य असतात. धूमकेतूंच्या बर्फाळ गोलकाला सूर्याच्या उष्णतेने शेपूट फुटून त्यातील वायूंच्या रासायनिक गुणधर्मांवरून शेपटाचा रंग ठरतो…निळा, हिरवा, लाल वगैरे.

सामान्य माणसाला सहज दिसणाऱ्या धूमकेतूचं कुतूहल वाटतं. यानंतरच्या काळात अतिशय ‘देखणा’ धूमकेतू आला आणि त्याने 1910 मध्ये अवतरलेल्या ‘हॅली’ धूमकेतूसारखं विराट-पुच्छ दर्शन घडवलं तर आपलं जग अशा धूमकेतूचं वैज्ञानिक पद्धतीने स्वागत करायला तयार आहे आणि त्या निरीक्षणाबरोबरच्या अभ्यासातूनच धूमकेतूंच्या ‘जगा’ची जाणीव होणार आहे.

[email protected]