कथा एका चवीची- एक लिंबू झेलू बाई

>> रश्मी वारंग

उन्हाळा सुसह्य करणारं लिंबू सरबत. हिंदुस्थानातील सर्वाधिक लोकप्रिय नैसर्गिक पेयाचा मान या सरबताला मिळतो. आंबटगोड चवीचं सगळय़ांना परवडणारं लिंबू सरबत. त्याच सरबताची ही गारेगार गोष्ट.

आंबटगोड चवीचं लिंबू सरबत म्हणजे उन्हाळा सुसह्य करणारं पेय. लिंबू सरबताशिवाय उन्हाळा पूर्णच होत नाही. लिंबांची लागवड आशियाई देशांत प्राचीन काळापासून आहे. ही वनस्पती मूळची हिंदुस्थानातील असून तिचा प्रसार इजिप्त, मेक्सिको, वेस्ट इंडीजपर्यंत झाला. अरब लोकांनी या वनस्पतीचा प्रसार इटली व स्पेन येथे केला. सन 1493 मध्ये इटालियन खलाशी ािढस्तोफर कोलंबस याने अमेरिकेत प्रथम लिंबाची लागवड केली. संस्कृत ‘निंबू, निंब’ या उच्चाराचेच बदलते रूप लिंबू, लिमन, लेमन असे झाले असावे असा तर्क मांडला जातो. आपल्यासाठी लेमन आणि लाईम साधारण सारखंच असतं. पण त्यात वर्गीकरण दिसून येतं. हिंदुस्थानात लागवडीखाली असलेल्या कागदी लिंबाचा समावेश लाईममध्ये होतो, तर ईडलिंबू, गलगल यांचा समावेश लेमनमध्ये होतो.

अशा या लिंबाचे औषधी गुणधर्म लक्षात आल्यावर लिंबू पाणी  हिंदुस्थानींचं आवडतं पेय ठरलं. साखर या मिश्रणात खूप अलीकडे आली. पण त्याआधी लिंबू, पाणी, मध वा गूळ हा पर्याय होता. लिंबू सरबताचेच सुधारीत रूप म्हणजे शिकंजी. उत्तर हिंदुस्थानात शिकंजी किंवा शिकंजाबीन लोकप्रिय आहे. शरबत ए शिकंजावीन या नावाचे ते लघुरूप आहे. लिंबू सरबत बनवण्यासाठी लिंबू, पाणी, साखर, मीठ एवढा मालमसाला पुरतो. शिकंजीमध्ये या सगळय़ांच्या जोडीला प्रांतिक वैविध्यानुसार काळं मीठ, पुदीना, आलं, मिरपूड असं काय काय वाढत जातं. हिंदुस्थानाप्रमाणेच पाकिस्तानातही शिकंजी लोकप्रिय पेय आहे.

थोडंसं गरगरलं, अस्वस्थ वाटलं तरी घरच्या घरी पटकन लिंबू सरबत बनवता येतं ही या पेयाची खासियत. लहानांपासून मोठय़ांपर्यंत कुणीही ते बनवू शकतं ही सहजता या सरबतात असल्याने हिंदुस्थानातील सर्वाधिक लोकप्रिय नैसर्गिक पेयाचा मान या सरबताला मिळतो. बाराही महिने लिंबाची उपलब्धता हा त्यातला आणखी महत्त्वाचा भाग.

लिंबू सरबतावरचं हिंदुस्थानींचं हे प्रेम लक्षात घेऊनच कितीतरी शीतपेय कंपन्यांनी लाईम अथवा लेमनी चवीत लिंबू सरबत

बॉटलबंद करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. पण त्याही पलीकडे घरच्या घरी तयार होणारं किंवा सोडय़ाची साथ घेत लिंबू सोडा बनून येणारं लिंबू सरबत तितकंच लोकप्रिय राहिलेलं दिसतं. ऑरेंज फ्लेवरची शीतपेय आल्यावर हिंदुस्थानी संत्री, मोसंबी ज्यूस जसे मागे पडले तसं लिंबू सरबताचं झालं नाही हे विशेष.

लहानपणीच्या गाण्यांमधलं ‘एक लिंबू झेलू बाई दोन लिंबू झेलू’ असो किंवा ‘संत्रं लिंबू पैशा पैशाला… शाळेतल्या मुली आल्या खेळायला’ ही गाणी असो, या गाण्यांमधूनसुद्धा लिंबाने सोबत केलेली दिसते. दुपारच्या उन्हाची काहिली निववण्याची ताकद या पेयात आहे. या आंबटगोड चवीच्या लिंबू सरबतासह अख्खा उन्हाळा गार होतो.

(लेखिका आरजे व स्तंभलेखिका आहेत.)