
>> वैश्विक
उत्तर गोलार्धात आलेला सूर्य आता सहा महिने आपल्याला वाढत्या क्रमाने प्रखर प्रकाश (ताप) देणार, परंतु ही प्रकाशऊर्जाच आपली जीवनदायी आहे. प्रकाश आणि अंधार या दोन्ही गोष्टी जीवसृष्टीच्या उत्पत्तीला आणि निकोप वाढीला सारख्याच आवश्यक असतात. माणसाने गेल्या दीड शतकात विजेचे दिवे लावून रात्रीच्या आकाशाची बारमाही ‘दिवाळी’ केली असली तरी घनदाट अरण्यात आणि डोंगरदऱयांतील अंधारात विविध कीटक, प्राणी, पक्षी आणि अन्य प्रजाती आपला निवारा शोधत असतात. काही कीटकांना तर रात्र हाच दिवस असतो. त्यांचे जैविक व्यवहार तिमिरावर अवलंबून असतात. म्हणूनच केवळ उजेड किंवा केवळ अंधार उपयोगाचा नाही. पृथ्वीवर रोज त्याची बऱयाच भागांत समसमान वाटणी झाल्याने तिथे वनस्पतींपासून प्रगत माणसांपर्यंत जीवसृष्टी बहरलेली आहे. निसर्गाच्या तम-तेजाच्या सम्यक कोष्टकात माणसाने स्वतःपुरता बदल घडवून दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस मुख्यत्वे अर्थार्जनासाठी केला आहे.
पहाटे सूर्य पूर्व क्षितिजावर दिसण्यापूर्वीच्या प्रकाशात जागं व्हावं आणि सायंकाळी तो पश्चिम क्षितिजाखाली गेला की रोजचे व्यवहार थोडय़ाच वेळात थांबवून झोपी जाणं अशी जगाची रीत जवळपास एकोणिसाव्या शतकापर्यंत होती. पहारा देणारे रक्षक आणि ज्ञानार्थी अभ्यासक वगळता जागरण करणारे विलासी अपवादात्मक असत, परंतु काळाबरोबर सारं बदललं. तसं ते अपरिहार्यही होतं. त्याचे फायदे सुरुवातीला दिसलेच, पण नंतर आरोग्याच्या बाबतीतले तोटेही लक्षात येऊ लागले.
तसं पाहिलं तर आपल्या विश्वात प्रकाशापेक्षा अंधारच अधिक आहे. अब्जावधी तारे रात्रीच्या आकाशात चमचमत असूनही ते काळोखं दिसण्याचं कारण म्हणजे एकतर ते परस्परांपासून अतिदूर आहेत आणि त्या सर्वांची प्रचंड वाटणारी गोळाबेरीज संपूर्ण ज्ञात विश्वाला अवघी चार टक्के आहे. मग एकदा सूर्य हा आपला अतिजवळचा जनक तारा मावळला की अंधारच दिसणार.
आपला सूर्य वैश्विक अंतरांच्या तुलनेत खरोखरच अतिशय जवळ आहे म्हणण्यापेक्षा पृथ्वी हा ग्रहमालेतला तिसरा ग्रह त्याच्या बराच जवळ आहे असं म्हणूया. सूर्य ते पृथ्वी अंतर आहे सुमारे 15 कोटी किलोमीटर आणि प्रकाशाचा वेग सेकंदाला 3 लाख किलोमीटर. या वेगाने सूर्याचा प्रकाश आपल्या डोळय़ांपर्यंत पोहोचायला सुमारे सवाआठ मिनिटे लागतात. याचाच अर्थ असा की सूर्यकिरण डोळय़ांपर्यंत येत नाही तोपर्यंत सूर्यप्रकाश आपल्याला दिसत नाहीत. सवाआठ मिनिटांचा हिशेब लक्षात घेतला तर सूर्य आपल्याला प्रत्यक्ष दिसण्यापूर्वीच सवाआठ मिनिटे उगवलेला असतो. अवकाशातील सर्वच ताऱयांच्या बाबतीत असंच आहे. आपल्या सर्वात जवळची देवयानी दीर्घिका आपल्याला दिसते. याचा अर्थ आपण तिथून 22 लक्ष वर्षांपूर्वी निघालेला प्रकाशकिरण पाहत असतो.
समजायला थोडं कठीण, पण अनुभवायला विस्मयकारी असे हे वैश्विक विक्रम. आता आपल्या सूर्याच्या प्रकाशाविषयी सांगायचं तर या ताऱयाच्या गाभ्यात हायड्रोजनमधून हिलियम वायू तयार होण्याची जी तप्त घुसळण सतत सुरू असते. त्यातून निर्माण होणारी ऊर्जा प्रकाशाच्या रूपाने बाहेर पडते. म्हणजे प्रकाशकण किंवा प्रोटॉन हे सूर्याच्या गाभ्यात जन्म घेतात. सूर्याचा व्यास आहे 14 लाख किलोमीटर म्हणजे त्रिज्या सात लाख किलोमीटर. गाभ्यातील प्रकाशकण सेकंदाला तीन लाख किलोमीटर वेगाने निघाला तर हे अंतर काहीच नाही, परंतु त्याच्या मार्गात इतके अडथळे येतात की, त्याला सूर्याच्या पृष्ठभागावर येण्यासाठीच 10 लाख वर्षे लागतात. वास्तविक साध्या गणिती मांडणीने या प्रवासाला केवळ सवादोन सेकंद लागायला हवेत, परंतु या तेजकणाचा प्रवास फार अवघड असतो. त्याला तेजकणाचं ‘रॅण्डम वॉक’ म्हणतात. तो स्वतंत्र लेखाचाच विषय आहे. प्रचंड गर्दीत मागे-पुढे होत काही वेळा शंभर मीटर अंतर पार करायला आपल्याला तासभर लागावा असा हा प्रकार.
या धक्काबुक्कीतून निसटलेला प्रकाश सूर्याच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचला की सुसाट सुटतो आणि अवघ्या सवाआठ मिनिटांत 15 कोटी किलोमीटर पार करून आपल्याला दिसतो किंवा स्पर्श करतो. सकाळच्या कोवळय़ा उन्हात किंवा संध्याकाळी कलत्या उन्हाचा आस्वाद घेताना या प्रकाशवेगाचा विचार मनात आला तर निसर्गाने आपल्याला किती अमूल्य गोष्ट दिली आहे हे लक्षात येईल. मध्यान्हीचा सूर्य मात्र तापदायक ठरतो. आता पुढच्या तीन-चार महिन्यांत त्यापासून बचाव करण्यासाठी काळजी घ्यावी लागेल. म्हणूनच पूर्वी ऋतुचक्राशी निगडित वेशभूषा होती. मुंडासं वगैरे गोष्टी समाविष्ट होत्या. आताही फॅशनेबल ‘कॅप’ मिळतातच.
सूर्यप्रकाशाची गती आणि शक्ती दोन्हींचा कधी तरी विचार केला तर या सोप्या गोष्टी वाटतील. विज्ञानाचा प्रकाश सभोवतीच पसरलेला असतो. त्याची जाणीव झाली की आनंद मिळतो. आणखी एक, प्रकाशापेक्षा ज्ञात वेगवान असं विश्वात काही नाही. ‘टॅकिऑन’ची चर्चा झाली, पण सैधांतिक कणाच्या कल्पनेतून काहीही निष्पन्न न झाल्याने प्रकाशाची गतीच (अजून तरी) सर्वश्रेष्ठ आहे.
[email protected]





























































