दिल्ली डायरी – तीन राज्यांतील तीन बदल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नीलेश कुलकर्णी, [email protected]

प्रस्थापित नेतृत्वाला बाजूला सारून भाजपने छत्तीसगढ, मध्य प्रदेश व राजस्थानात नव्या नेतृत्वाला संधी देऊन अखेर ‘भाकरी’ फिरवली आहे. ‘आवो विष्णुदेव के अवतार मोहन का भजन करते है,’ हे वाक्य सध्या उत्तर हिंदुस्थानात थंडीप्रमाणे रुजले आहे. तीन-चार महिन्यांत लोकसभा निवडणुका होतील. त्यामुळे एवढ्या कमी कालावधीत कोणत्याही सरकारविरोधात ‘अॅण्टी इन्कमबन्सी’ तयार होणार नाही. त्यामुळे या ‘हनिमून पिरेड’चा फायदा उठवत भाजपने भाकरी फिरवली आहे. त्यामागे राजकारण जरूर आहे. मात्र योग्य वेळी योग्य नेतृत्वबदल केला तर यश हे हमखास मिळतेच. तेलंगणात रेवंत अण्णांचा संघर्षही तेच सांगतो.

राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तिन्ही राज्यांतील निवडणुकीचे वातावरण सुरुवातीला भाजपसाठी फारसे अनुकूल नव्हते. त्यावेळी पंतप्रधान स्वतः मैदानात उतरले. त्यांनी स्वतःचे ‘फेस व्हॅल्यू’ पणाला लावले. या निवडणुकांत जर भाजपचा पराभव झाला असता तर या फेस व्हॅल्यूलाही धक्का बसला असता. मात्र मोदींनी हुशारीने राजकीय खेळी करत या निवडणुकांत शिवराज, वसुंधरा व रमणसिंग कोठेही ‘दिसणार’ नाहीत, याची तजवीज केली. तिथेच या तिघांच्या कारकीर्दीचे पुढे काय होणार याचे उत्तरदेखील मिळाले होते.

चर्चेत व स्पर्धेत असलेल्या नेत्याला मुख्यमंत्री न करता कोणाच्याही ध्यानीमनी नसलेल्या नेत्याला मुख्यमंत्री बनविण्याचा ‘भूपेंद्र पटेल पॅटर्न’ आता दिल्लीकरांनी सबंध देशात राबवायचे ठरवलेले दिसत आहे. वास्तविक, याची सुरुवात मनोहरलाल खट्टर अचानकपणे मुख्यमंत्री झाल्यानंतर झाली होती. त्या वेळी हरयाणात सबंध जाटांनी मिळून ‘खट्टर’ हे आडनाव ‘गुगल’ केले होते. ‘खट्ट्र म्हाऱया लागे..?’ असा सवाल जो तो विचारत होता. खट्टरांसारखा राजकारणात नवखा माणूस मुख्यमंत्री बनवूनही भाजपने हरयाणात अजून तरी पकड कायम राखली आहे. तीच बाब आता या तिन्ही राज्यांत घडली. काही महिन्यांपूर्वी बसने प्रवास करणाऱया भजनलाल शर्मांना मुख्यमंत्री करून पंतप्रधानांनी केवळ वसुंधरा राजेंनाच धक्का दिला नाही, तर ओ.पी. माथूरांपासून ते गजेंद्रसिंग शेखावत वगैरे इच्छुक मंडळींनाही दणका दिला. त्यामुळे वसुंधरा यांची भजनलाल यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतरची रिअॅक्शन व्हायरल होत आहे. भजनलाल यांना संघाचे प्रामाणिकपणे केलेले काम पुण्याईला आले तर, मध्य प्रदेशात मोहन यादवांच्या रूपाने दुसरा ओबीसी नेता तयार करून दिल्लीकरांनी मामांना पद्धतशीरपणे अडगळीत टाकले. छत्तीसगढमध्ये विष्णुदेव साय नावाच्या नम्र व समर्पित नेत्याला मुख्यमंत्रीपदाची संधी देऊन आदिवासी समाजात फिलगुड निर्माण केले. राजस्थानात ब्राह्मण समाजाला मुख्यमंत्रीपदाची संधी देऊन उत्तरेच्या पट्टय़ात ब्राह्मण व्होटबँकेमध्ये योग्य तो संदेश देण्यात दिल्लीकर यशस्वी झाले. पक्षाला दणदणीत बहुमत मिळाल्यानंतर ‘नवे नेतृत्व’ तयार करण्याची हीच योग्य वेळ असल्याने ती वेळ साधली गेली.

वसुंधरा आणि मामांचे काय होणार?

मध्य प्रदेशात शिवराज मामांना मुख्यमंत्रीपदाची संधी नाकारल्यानंतर नाराजी आहे हे खरेच. मात्र ती ‘अश्रूं’च्या रूपाने बाहेर पडत असल्याने दिल्लीकरांची ‘वक्रदृष्टी’ आता अश्रूंवर पडणार काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. राजकारणात डाव शेवटपर्यंत सोडता येत नाही. त्यासाठी हातपाय मारावेच लागतात. मुख्यमंत्रीपद हातून गेल्यानंतर शिवराजमामा थेट शेतात जाऊन सध्या पेरणी करत आहेत. रस्त्यारस्त्यात माता भगिनी रडून मामांचे सांत्वन करत आहेत. ही एकप्रकारे ‘सांत्वन यात्रा’च असून त्यातून शिवराजमामा नवी साखरपेरणी करताना दिसत आहेत. भाजपचे राजकारण ओबीसी मतपेढीवर तरारलेले असल्याने शिवराजमामांसारखा तालेवार ओबीसी नेता दिल्लीकरांनाही फार काळ अडगळीत ठेवता येणार नाही. त्यातच नागपूरकरांचाही मामांना तसा पाठिंबा असल्याने मामा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होतील, अशीही एक हूल ऐकायला मिळते. त्याचबरोबर मोदी त्यांना आपल्या मंत्रिमंडळात कृषीमंत्री करतील, अशीही चर्चा ऐकायला मिळते. एकीकडे मामांचे काय होते? हा प्रश्न असताना, दुसरीकडे मुख्यमंत्रीपदासाठी अडून बसेलल्या वसुंधराराजेंचे काय होणार? हाही प्रश्न महत्त्वाचा आहेच. वसुंधरा यांनी दिल्लीकरांना थेट आव्हान देण्याची हिंमत दाखवली; तर मामांनी अप्रत्यक्ष आव्हान दिले. या दोन्ही पद्धती वेगळ्या होत्या. त्यामुळे वसुंधरा यांचे राजकीय पुनर्वसन सध्या तरी होईल असे दिसत नाहीत. या दोघांच्या तुलनेत ‘जिसकी लाठी उसकी भैंस’ हे मान्य करून गपगुमान राहिलेले रमणसिंग नशीबवान ठरलेत. किमान विधानसभा अध्यक्षासारखे शोभेचे का होईना, पण पद तरी त्यांना मिळाले.

तोंडाची चव गेली…

मध्य प्रदेशच्या निवडणूक निकालानंतरचा किस्सा आहे. विधानसभेला निवडून आलेल्या सर्वच खासदारांचा राजीनामा घेण्याचा आदेश वरून आला. संसदेचे कामकाज सुरू होते. केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेलांना याबाबत कोणी तरी विचारले तर, ‘मंत्रियों के लिए शायद कुछ अलग पॉलिसी होगी,’ असे त्यांनी म्हटले. त्यांचे हे मतप्रदर्शन अवघ्या काही मिनिटांतच पंतप्रधानांपर्यंत पोहचले. त्यानंतर त्यांच्या कार्यालयाकडून ‘तोमरजी के साथ तुरंत मिलने के लिए आना,’ असा निरोप आला. पंतप्रधानांनी पटेलांना, ‘आईये प्रल्हादजी, आपके पराक्रम के कारण हम मध्य प्रदेश मे दिग्विजय प्राप्त कर सके. आप जैसे देश के मंत्री काम कर रहे थे. मै तो सामान्य कार्यकर्ता हूं,’ असे म्हटल्यावर प्रल्हाद पटेलांना एकंदरीत ‘रागरंग’ समजला. ‘नीचे जाकर नड्डाजी से मिलकर स्पीकर को इस्तीफा देना,’ असे सांगून मोदींनी या दोघांचीही काही मिनिटांतच पाठवणी केली. त्यातून कडक संदेशही दिला. मात्र या सगळ्या झमेल्यात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होण्याचे तोमर व पटेलांच्या स्वप्नाचे क्षिप्रा नदीत विसर्जन झाले. देशाचे मंत्री असताना आमदार होण्याची वेळ या दोघांवर आली. आता मोहन यादवांच्या रूपाने तुलनेने तरुण नेतृत्व तयार असल्याने यापुढे काय करायचे? असा यक्षप्रश्न या दोघांपुढेही आहे. दोघांच्या खात्यांमधील कारभाराबद्दल पंतप्रधान समाधानी नव्हते. त्यामुळे या दोघांनाही अडगळीत टाकल्याचे बोलले जात आहे. लोकसभा खासदारांसह या मंत्र्यांना विधानसभेच्या निवडणुकीत उतरवल्यावर या दोघांच्याही ‘मन में लड्डू फूट रहे’ अशी अवस्था झाली होती. आता मध्य प्रदेशातील ऐतिहासिक विजयानंतरही या दोघांच्याही ‘तोंडची चव’ गेलेली आहे. या दोघांत आणखी एक ‘तिसरा’ तोंडाची चव गेलेला माणूस म्हणजे पैलाश विजयवर्गीय. त्यांचेही मुख्यमंत्रीपदाचे ‘दिल के आरमां’ शिवराजमामांच्या ‘अश्रूंच्या पुरा’त वाहून गेलेत.