आभाळमाया – अंतराळात सर्वाधिक काळ!

खरंच कोणीतरी अंतराळात कुठेतरी आपल्यासारखं किंवा आपल्याला संपर्क करू शकेल असे, अथवा आपला संपर्क समजू शकेल असे असेल का? ही संकल्पना सामान्यांपासून वैज्ञानिकांपर्यंत सर्वांना मोहात पाडते. अनेक कलाकृती तर त्यावर चित्रपट, नाटकाच्या रूपाने येतात. प्रसिद्ध नाटककार वसंत कानेटकर यांनासुद्धा अशा कल्पनेने प्रेरित केले होते. त्यांची भेट झाली तेव्हा ‘खगोल मंडळा’तले काही सहकारीही सोबत होते. ‘खगोल’ विषयात कानेटकरांनी खूप कुतूहल असल्याचे सांगितले आणि पुढे ते म्हणाले की याच विषयावर माहिती घेऊन ‘कल्पनेच्या पलीकडे’ नावाचे नाटक लिहिण्याचा विचार आहे. नंतर थोडय़ाच दिवसांत कानेटकर गेले आणि ते नाटक बहुधा लिहून झाले नसावे.

तेव्हा ‘कुणीतरी आहे तिथे’ म्हणजे ‘आऊटर स्पेस’मध्ये या अजून तरी कल्पनाविश्वातल्याच गोष्टी आहेत. खरोखरच ‘कल्पनेच्या पलीकडलं’ काही सापडले तर तो खगोल संशोधनातला अद्वितीय टप्पा ठरेल. सध्यातरी तसे काही दिसत नाही, मात्र अनेक अंतराळयात्रींनी ‘स्पेस’मध्ये बराच काळ राहून एक आगळावेगळा अनुभव घेतलाय. त्यातली सर्वात महत्त्वाची आणि आपल्या दृष्टीने विलक्षण गोष्ट म्हणजे जवळ जवळ ‘वजनरहित’ अवस्था! तशी अंतराळातही मायक्रोग्रॅव्हिटी पिंवा सूक्ष्म गुरुत्वाकर्षण असतेच, परंतु ते तिथे गेलेल्या माणसाला बिलकूल जाणवत नाही. म्हणूनच त्यांच्या कडेकोट बंदिस्त यानात ही मंडळी ‘तरंगताना’ दिसतात. एवढेच काय, त्यांच्याकडून एखादी वस्तू पिंवा पदार्थ अगदी पाण्याचा थेंबही निसटला तरी तो त्यांच्या अवतीभवती तरंगत राहतो. अशा गोष्टी ‘पकडायच्या’ कशा याचे प्रशिक्षण त्यांना दिलेले असतेच. हे सर्व आता आपल्याला थेट स्पेस स्टेशनमधून पृथ्वीवर दिसते.

तसे स्पेस स्टेशनचे अंतर पृथ्वीपासून दूर नाही. अवघे 402 किलोमीटर म्हणजे काहीच नव्हे. परंतु त्यातले वैशिष्टय़पूर्ण आणि महत्त्वपूर्णही आहे की ते शून्यवत गुरुत्वाकर्षण वजनधारी माणसाला (पिंवा कोणाही सजीवाला) ते ‘सहन’ करावे लागते. त्याचा पुरेसा सराव पृथ्वीवरच्याच कृत्रिम शून्य-गुरुत्वाकर्षण कक्षात करावा लागतो.

स्पेसमध्ये राहणे रोमांचकारी असले तरी त्याचे काही परिणाम धास्तावणारे असू शकतात. शून्यवत गुरुत्वाकर्षणामुळे हाडे ठिसूळ होणे, मणक्याला त्रास होणे असे काही विकार जडण्याची शक्यता वाढते. त्यावरचा व्यायाम, उपचार यांचे प्रशिक्षण दिलेले असले तरीही अनेक अंतराळयात्रींना काही आजारांचा सामना करावा लागतो. अर्थात असे होऊ शकेल याची त्यांना पूर्वकल्पना दिलेली असतेच. त्यामुळे अंतराळयात्रा हा एक साहसी प्रवासही ठरतो.

आता प्रश्न असा की अशा नेहमीपेक्षा विपरित वातावरणाच्या दृष्परिणामांपासून रक्षण करणारे अंतराळयात्रींचे कवच म्हणजे त्यांचा ‘स्पेशल स्पेस सूट.’ समजा तो नष्ट झाला (तसं होतच नाही) तर माणूस अंतराळात 15 सेपंदांत बेशुद्ध आणि 90 सेपंदांनंतर केव्हाही मरण पावतो. कारण स्पेसमधला व्हॅक्युम (निर्वातपणा) माणसाला जगायला अत्यावश्यक असलेला ऑक्सिजन पिंवा प्राणवायू देऊ शकत नाही आणि मेंदूला प्राणवायूचा पुरवठा श्वासाद्वारे झालाच नाही तर काय होणार? अशा दुर्धर प्रसंगी फुप्फुसे फुगून अनावस्था प्रसंग ओढवू शकतो.

या सर्व शक्यता वैज्ञानिकांना ठाऊक असल्याने पुरेशी काळजी घेऊनच कोणीही स्पेसमध्ये पाठवले जाते. त्यामुळे असा विपरित अपघात कधीही घडलेला नाही हे स्पेस वैज्ञानिकांचे यश आणि अंतराळयात्रींचे साहस आहे. हिंदुस्थानी वंशाची सुनीता विल्यम्स अंतराळ स्थानकात अडकल्याने डिप्रेस्ड पिंवा आजारी झाली असे म्हणणाऱ्यांनी या सर्व गोष्टींचा साकल्याने अभ्यास करायला हवा पिंवा त्या जाणून तरी घ्यायला हव्यात. गेल्या लेखात आपण त्याविषयी वाचलंच आहे.

…मग अंतराळात सर्वाधिक काळ राहण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे? रशियन अंतराळयात्री ओलेग कोनोनेन्को यांनी तब्बल 1,111 दिवस अंतराळात घालवलेत. त्याआधी वेलेरी पोल्याकॉव यांचा विक्रम 437 दिवसांचा होता. ही बातमी अगदी अलीकडची म्हणजे गेल्या 23 सप्टेंबरची आहे.

एकूण 20 देशांच्या 270 अंतराळयात्रींनी स्पेस स्टेशनवर कमी-अधिक दिवस वास्तव्य केलेले आहे. पिगी व्हिटसन या महिला अंतराळयात्रीने स्पेसमध्ये 655 दिवस वास्तव्य केलेय. दुसरा क्रमांक कदाचित सुनीता विल्यम्सचा असेल. कारण ती फेब्रुवारीपर्यंत तिथेच सुखरूप असणार आहे. आताच तिचे स्पेसमधले 491 दिवस पूर्ण झालेत. आता थोडी माहिती सर्वाधिक काळ अंतराळात काढणाऱ्या व्यक्तीची.

ओलेग दिमित्रियेविच कोनोनेन्को या अंतराळात सर्वाधिक काळ घालवणाऱ्या अंतराळ-निवासींचा जन्म 21 जून 1964 चा. म्हणजे यंदाच त्यांनी साठी पार केली. 2008 मध्ये स्पेस-फ्लाइटबरोबरच ‘स्पेस वॉक’ करण्याचा अनुभवही ओलेग यांना मिळाला. 4 फेब्रुवारी 2024 रोजी त्यांनी स्पेसमध्ये सर्वाधिक काळ राहण्याचा सन्मान प्राप्त केला आणि 23 सप्टेंबर 2024 रोजी ते ‘सोयूझ’ यानाने पृथ्वीवर परतले. व्हॉलीबॉलपटू असलेल्या ओलेग यांची प्रकृती उत्तम आहे. त्यांचे अंतराळातले 1,111 दिवस सलग वास्तवाचे नाही तर एकूण पाच अंतराळ मोहिमांमध्ये सामील होऊन केलेले आहेत.

वैश्विक  
[email protected]