
>>ब्रिगेडियर हेमंत महाजन<<
चीन शिन जियांग प्रांतातील मुस्लिम उईगरांचे चिनीकरण करीत आहे. त्यासाठी मोठमोठी शिबिरे, छळछावण्या सुरू केल्या आहेत. या छावण्यांत जवळपास 20 लाख लोकांना चीन सरकारने डांबून ठेवल्याचा आरोप परदेशी माध्यमांनी केला आहे. या छावण्यांवर संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवी हक्क परिषदेने तीव्र टीका केली आहे. चीनने मात्र हे सर्व आरोप फेटाळले आहेत.
चीनचा शिन जियांग हा प्रांत कझाकिस्तान, किरगिझिस्तान, अफगाणिस्तान, पाकिस्तान या देशांशी संलग्न असून येथे दोन कोटींपेक्षा जास्त उईगर मुस्लिम राहतात. तुर्किक वंशाशी संबंधित असणाऱया या समाजातील लोक उझबेक भाषा बोलतात. यात सुन्नी उईगरांची संख्या जास्त आहे. 1949 पूर्वी हा प्रांत तुर्कस्तानचा भाग होता; पण चीनने या प्रांतावर ताबा मिळविला. 1990 मध्ये सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर येथील जनतेने स्वातंत्र्यासाठी लढा दिला; पण चीन सरकारने लढा चिरडून टाकला. येथे खनिज तेल आणि नैसर्गिक स्रोतांचे साठे आहेत म्हणून चीन सरकारने येथे हान समुदायाची लोकसंख्या वाढविली असून लष्करही तैनात केले.
उईगर जमातीचे लोक अमेरिका, युरोपमध्येही असून त्यांचाही येथील चळवळीला पाठिंबा असतो. स्वातंत्र्यासाठीच्या सर्व चळवळी आतापर्यंत चीनने बळाचा वापर करीत मोडून काढल्या. मात्र शिन जियांगमधील हिंसाचार आतापर्यंत शमवता आला नाही. मागच्या वर्षी शिन जियांग प्रांतात हिंसाचार घडविणाऱया दहशतवाद्यांना पाकिस्तानातील दहशतवादी छावण्यांमध्ये प्रशिक्षण मिळाल्याचा आरोप चीनने केला. शिन जियांग प्रांतातील दहशतवादाबाबत चीनने पाकिस्तानवर दबावही टाकला. मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही.
पाकिस्तानच्या भूमीत चीन उभारत असलेले 4500 किमीहून अधिक लांबीचे रस्ते पाकिस्तानच्या विविध प्रांतांतून जाऊन चीनच्या शिन जियांग भागात प्रवेश करतात. शिन जियांग प्रांतातील अनेक दहशतवादी पाकिस्तानात दहशतवादाचे प्रशिक्षण घ्यायला येतात. हा रस्ता झाल्यास त्यांना येणे-जाणे फार सोपे पडणार आहे. त्यामुळे शिनजिआंग प्रांतातील दहशतवाद वाढण्याची शक्यता आहे.
मुस्लिम धर्मात समाजवादी मूल्यांचा समावेश झाला पाहिजे आणि धर्माचे चिनीकरण झाले पाहिजे. चीनमध्ये इस्लाम धर्माचे देशीकरण करण्यासाठी एक कायदा बनवण्यात आला आहे. या कायद्यानुसार पुढील पाच वर्षांत इस्लाम धर्मात चिनी संस्कृतीच्या मूल्यांचा समावेश होईल. या कायद्यात इस्लामच्या ‘सिनिसायझेशन’चा मुद्दा अधोरिखित करण्यात आला आहे. त्याचा अर्थ कुठल्याही गोष्टीचा चिनीकरण करणे असा होतो. चीनमधील शिन जियांग प्रांतातील उईगर मुस्लिमांवरील बंदीनंतर हा कायदा बनवला गेला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या माहितीनुसार, 20 लाख उईगर मुस्लिमांना कॅम्पमध्ये ठेवले असून त्यांना त्यांच्या धर्माचे पालन करण्यास बंदी आहे. तसेच चीनच्या अनेक प्रांतांत मुस्लिम धर्म मानणे हे बेकायदेशीर आहे. असे केल्यास अटक केली जाते.
शिन जियांग प्रांतात चीन सरकारने दहशतवादविरोधी लढय़ाच्या नावाखाली उईगर समाजाला चिनी हान संस्कृतीमध्ये बदलण्यासाठी मोठमोठी शिबिरे तयार केली आहेत. दबानचेंग, तुरपानसारख्या मोठय़ा शिबिरांसह प्रांतातील गावागावांत 1200 शिबिरे सुरू आहेत. त्यांना चिनी सरकार पुनर्शिक्षण केंद्रे किंवा व्यावसायिक शिक्षण प्रशिक्षण केंद्र म्हणते; पण या ठिकाणी कम्युनिस्ट पक्षाची विचारधारा, प्रचार, सरकार, राष्ट्राध्यक्षांच्या समर्थनार्थ एकनिष्ठता शिकविली जाते. तसेच उईगर लोकांना चिनी संस्कृती, भाषा स्वीकारण्यास भाग पाडले जाते. जबरदस्तीने दारू पाजणे, डुकरांचे मांस खाऊ घालणे असे प्रकार केले जात असल्याचा दावा येथून पळून आलेल्या लोकांनी केला आहे. तसेच जबरदस्ती धर्मपरिवर्तन करण्यास भाग पाडले जात आहे.अनेक उईगर मुलींना हान चिनी युवकांशी लग्न करण्यास भाग पाडले जाते.
विचारधारा बदलण्याच्या नावाखाली उईगर लोकांना जबरदस्तीने मॅडरिन भाषा शिकविली जाते तसेच कम्युनिस्ट प्रचार गीते, कायदे पाठ करण्यास भाग पाडले जाते. याला विरोध करणाऱयांवर अनन्वित अत्याचार केले जातात. या भागात येणाऱया परदेशी पत्रकारांचा स्थानिक पोलीस, लष्कराकडून सतत पाठलाग केला जातो. शिबिराबाहेर प्रत्येक 500 स्थानिक लोकांमागे एक पोलीस दल तैनात करण्यात आलेला असून प्रत्येकांच्या हालचालीवर नजर ठेवली जाते.
जिनपिंग यांच्या कारकीर्दीपासून तिबेट, शिन जियांगमधील स्थानिक संस्कृतीत चिनी हस्तक्षेप जास्त वाढला आहे. या मुस्कटदाबीमागे चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरोमधील सदस्य असलेले चेंग क्वांआगो यांचा हात आहे. चीनमधील जातीय विविधता मोडून काढण्यात चेंग यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी तिबेटचे प्रशासकीय प्रमुख असतानादेखील अशा प्रकारे सक्तीचा वापर करीत कायदा सुव्यवस्था ताब्यात ठेवली होती. 2016 मध्ये चेंग यांची चिनी सरकारने शिन जियांग प्रांतात नेमणूक केली. त्यानंतर येथील दडपशाहीला मोठय़ा प्रमाणात सुरुवात झाली.
हान लोकांना उच्च पदावर बसवून उईगर लोकांना दुय्यम दर्जा देत त्यांना दाबून ठेवण्याचा प्रयत्न चीन सरकार करीत आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी सत्तासूत्रे हातात घेतल्यानंतर देशातील इस्लामचे चिनीकरण करण्याचा सपाटा लावला आहे. यासाठी त्यांनी एक कायदा मंजूर केला असून त्याच्या मदतीने येत्या पाच वर्षांत इस्लामला चिनी रंगरूप दिले जाईल. कम्युनिस्ट पक्षाच्या सिद्धांतानुसार चालेल असा इस्लाम चीनला हवा आहे. शिन जियांग प्रांताची राजधानी उरूमची येथे 2008 मध्ये झालेल्या हिंसाचारात 200 लोक ठार झाले होते, तर 2013 मध्ये पोलिसांच्या गोळीबारात 27 उईगर आंदोलक ठार झाले होते. वाढत्या हिंसाचारानंतर चीन सरकारने मुस्लिम नागरिकांवर विविध बंधने आणली. दाढी वाढविणे, सार्वजनिक स्थळी, बाजार, प्रवासात महिलांनी बुरखा वापरणे, रमजानमध्ये रोजा करणे आदी धार्मिक गोष्टींवर अंकुश आणत विविध बंधने आणली. त्याचप्रमाणे जिनपिंग यांच्या आदेशानंतर प्रांतातील अनेक धार्मिक स्थळे जमीनदोस्त करण्यात आली. खाणे-पिणे, सांस्कृतिक गोष्टींवर प्रतिबंध लादण्यात आले आहेत.



























































