
>>ज्ञानेश्वर गावडे<<
हवामानातील बदलांचा विपरीत परिणाम पाऊसपाण्यावर नाही तर धनधान्याच्या उत्पादनांवरही होणार आहे. गहू, मका आणि तांदूळ या तीन पिकांमधील पोषणमूल्य कमी होण्याची भीती आहे, असे सांगणारा एक अहवाल अलीकडेच प्रसिद्ध झाल्याची चिंतायुक्त माहिती प्रसिद्ध झालेली आहे. आजही समाजात जुनी माणसे भेटली की, त्यांच्या दीर्घायुची चर्चा करताना, पूर्व आयुष्यातील खाण्यापिण्याचा व आरोग्याचा मुद्दा निघतोच. पूर्वीचे कसदार खाणे (प्रदूषणमुक्त) पूर्वायुष्यात आल्यामुळेच आरोग्य सुरळीत व ठणठणीत आहे यावर एकमत होते हिंदुस्थानी हवामान विभागात हवामानाचा अंदाज वर्तविण्याऱ्या गटाचे प्रमुख डॉ. डी. एस. पै यांनी म्हटले आहे की, नुकतीच केरळमध्ये अभूतपूर्व व सततची पर्जन्यवृष्टी ही नवी नाही. केरळसारखाच अनुभव ईशान्येकडील राज्यांतही पाहावयास मिळतो. पश्चिम घाटाला खेटून असलेल्या महाराष्ट्र कर्नाटक राज्यांतही अनुभवायास मिळतो. पुणे येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रापिक मिटाल्जीचे डॉ. रॉक्सी कौल यांच्या मते तीक्रतम पावसाने पंचाईत होण्याची वेळ येथून पुढे पुनः पुन्हा येणार आहे. अन्न देणाऱ्या मातीला मानव निसर्गाच्या पाण्यापासून वंचित करीत आहे. झपाटय़ाने शहरीकरण होत असल्याकारणाने पाणी जमिनीत मुरण्यास जागा कमी पडत चालली आहे. भूजल खोल खोल जात आहे त्याचा अन्न उत्पादनांवर प्रतिकूल परिणाम होतोच. त्याशिवाय अन्नाचे पोषणमूल्य घसरत चालले आहे. त्यासाठी भूजल पातळी सांभाळली पाहिजे. पावसाचे पडणारे पाणी थांबविता तसेच ते जिरवता आले पाहिजे, ते वाहते करायला पाहिजे. वाहते पाणी थांबविता आले पाहिजे तरच सर्वदूर जिरवता येईल. जिरवलेल्या पाण्यामुळे भूजल पातळी सांभाळली पाहिजे.



























































