आनंददायी योग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिजीत कुलकर्णी, योगशिक्षक/चार्टर्ड अकाऊंटंट

योगाभ्यासाचे उद्दिष्ट एका वाक्यात सांगायचे, तर योगाभ्यास हा आरोग्य आणि स्वास्थ्य यासाठी करावा.

आरोग्य म्हणजे काय? स्वस्थता म्हणजे काय?

आरोग्य म्हणजे शारीरिक स्वास्थ्य, आरोग्य म्हणजे मानसिक शांती, तणावाचे नियोजन/नियंत्रण करण्याची क्षमता, आरोग्य म्हणजे आध्यात्मिक उन्नती.

अर्थात शरीर, मन आणि अध्यात्म यासाठी योगाभ्यास करावा.

आयुर्वेदात आरोग्याची एक अतिशय सुंदर व्याख्या केलेली आहे –

समदोषः समाग्निश्च समधातुमलक्रियः।
प्रसन्नात्मेन्द्रियमनः स्वस्थ इति अभिधीयते।। -सुश्रुत

या व्याख्येतील पहिल्या भागात शारीरिक आरोग्य म्हणजे काय ते सांगितले आहे. सोप्या शब्दांत सांगायचे तर शरीरातील वात, पित्त आणि कफ हे दोष योग्य प्रमाणात असणे, शरीरामध्ये ऊर्जा, चेतना संतुलित असणे (भूक व्यवस्थित लागणे आणि अन्नपचन व्यवस्थित होणे) पोट साफ राहणे, शरीरातील विविध अवयव, स्नायू, अंतर्गत संस्था यांचे कार्य सहज आणि सुचारू चालू राहणे ही उत्तम आरोग्याची लक्षणे आहेत. आपल्याला आयुष्यात कुठलेही कार्य करायचे असेल तर शरीर स्वस्थ असणे, ऊर्जावान राहणे आवश्यक आहे आणि हेच शारीरिक स्वास्थ्य आपल्याला योगाभ्यासाने मिळते. योगाभ्यासाने शरीर बलदंड होत नाही, पण स्नायूंची लवचिकता मिळते. योगाभ्यासाने शरीरातील अशुद्ध तत्त्वांचा निचरा होतो आणि त्यामुळे शरीरातील ऊर्जांचे संचलन उत्तम प्रकारे होते. शरीर स्वस्थ असेल तर आपल्या शास्त्र्ाांनी सांगितलेली चार पुरुषार्थ अर्थात धर्म (कर्तव्यकर्म), अर्थ (योगक्षेम), काम (आकांक्षा) आणि मोक्ष (अध्यात्म) उत्तम प्रकारे साधले जाऊ शकतात आणि म्हणूनच योगाभ्यास करावा.

वरच्या व्याख्येतील दुसरा भाग तर अतिशय सुंदर आहे. तुमच्या शरीरात चैतन्य आणि उत्साह असला पाहिजे. मन प्रसन्न, समाधानी आणि आनंदी असले पाहिजे. ईश्वराची अनुभूती, आत्मानुभव झाला पाहिजे. हे सर्व असेल तर आपण आरोग्यवान आणि स्वस्थ आहोत असे म्हटले जाऊ शकते आणि हे आरोग्य, हे स्वास्थ्य आपल्याला योगाभ्यासाने प्राप्त होऊ शकते.

पतंजली म्हणतात,

योगांगानुष्ठानात अशुद्धिक्षये
ज्ञानदीप्तीराविवेकख्यातेः।।

योगाभ्यासामुळे शरीरातील अशुद्धींचा क्षय होतो. मनातील नकारात्मक भावना आणि विकारांचा निचरा होतो. शरीर आरोग्यवान होते. मन स्वच्छ होते सात्त्विक गुण निखरून बाहेर येतात आणि मनुष्य अध्यात्ममार्गावर अग्रेसर होतो.

थोडक्यात, शारीरिक आरोग्य आणि लवचिकतेसाठी, रोगांना आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी, शरीरात ऊर्जेचे संतुलन साधण्यासाठी, मनःशांतीसाठी, शरीर आणि मन उत्साही ठेवण्यासाठी आणि आपल्या शास्त्र्ाांत सांगितल्याप्रमाणे ईश्वरी तत्त्वाच्या अनुभूतीसाठी योगाभ्यास करावा. योगाभ्यासाचा प्रारंभ करण्यासाठी नवीन वर्षाची वाट पाहण्याची गरज नाही. आजपासून, आतापासून प्रारंभ करा.