
>> महेश उपदेव
संगीत क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवून सातासमुद्रापार हिंदुस्थानचे नाव गौरवान्वित करणारे, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे व्हायोलिन वादक आणि ज्येष्ठ संगीतकार सुरमणी पं. प्रभाकर धाकडे गुरुजी यांचे नुकतेच निधन झाले. ते 74 वर्षांचे होते. महाराष्ट्रातील त्यांच्या शिष्यांनी संगीत कलेतील प्रभाकर हरवल्याची शोक संवेदना व्यक्त केली आहे. महान संगीतकाराला नागपूरकरांचा सलाम.
राज्य शासनाने धाकडे गुरुजींना वाद्य संगीत पुरस्काराने गौरव करून त्यांच्या संगीत कला साधनेचा गौरव केला होता. 7 डिसेंबर 2020 रोजी धाकडे यांची सुरमयी व्हायोलिन वादनाची मेजवानी खासदार महोत्सवात नागपूरकरांना मिळाली होती. तोच कार्यक्रम नागपूरकरांसाठी अखेरचा ठरला. या कार्यक्रमात ‘भारतीय घटनेचा तू शिल्पकार आहे,’ हे गीत त्यांनी व्हायोलिनच्या सुरावटीने सजवत डॉ. आंबेडकर यांना स्वरसुमनांजली वाहिली होती.
धाकडे गुरुजी यांच्या वडिलांनी बालाजीपंतांनी 1966 साली इंदिरानगर येथील कॉर्पोरेशनच्या शाळेत स्थापन केलेल्या भास्कर संगीत महाविद्यालयातूनच त्यांनी संगीताचे धडे गिरवले. वडील हेच त्यांचे पहिले गुरू होते. भास्कर हे पं. प्रभाकर धाकडे यांचे मोठे बंधू होते. ते उत्तम तबला वादक होते. मुंबईला त्यांचे अपघाती निधन झाले आणि त्यांच्याच स्मृतिप्रीत्यर्थ भास्कर हे नाव संगीत विद्यालयाला देण्यात आले होते. याच महाविद्यालयातून असंख्य विद्यार्थी निघाले असून ते आता देशविदेशांत संगीताची जादू पसरवत आहेत. त्यांची मुले मंगेश आणि विशाल हेसुद्धा संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत.
धाकडे गुरुजी म्हणूनच विख्यात असलेले सुरमणी पं. प्रभाकर धाकडे यांच्या संगीत साधनेचा देशविदेशांत मोठा चाहता वर्ग आहे. दृष्टिबाधित असतानाही संगीत साधनेच्या दिव्य दृष्टीने त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. ते 9 वर्षांचे असताना वडिलांनी त्यांना अंध विद्यालयात शिकण्यास पाठविले होते. तेथे ते अंध मुलांच्या ऑर्केस्ट्रॉत फिमेल व्हॉइसमध्ये गात असत. 1965 साली विशारद झाल्यावर 1966 मध्ये ते एससीएस गर्ल्स स्कूलमध्ये संगीत शिक्षक म्हणून रुजू झाले. बनारसचे पं. गोपालकृष्णन व एम. राजन यांच्या व्हायोलिन वादनाने ते प्रभावित झाले होते. गायकी अंगाने व्हायोलिन वाजविणारे ते दुर्मीळ कलाकार होते. धाकडे गुरुजींनी पुढे व्हायोलिन शिकण्यास सुरुवात केली आणि शाळेत शिक्षण घेत असतानाच मुलांसाठी गाणी कंपोझ करू लागले आणि पुढे त्यांच्या चालींवर हरिहरन, शंकर महादेवन, अनुराधा पौंडवाल, कविता कृष्णमूर्ती यांच्यासारख्या दिग्गजांनी गाणी गायली आहेत.
शाळेत शिकवत असतानाच त्यांनी बुद्धगीत रचण्याचा पायंडा पाडला आणि बुद्ध-धम्मगीतांना वेगळी ओळख निर्माण करून दिली. अनेक चित्रपटांना त्यांनी संगीत दिले आहे. गुरुजींचे विद्यार्थी देशविदेशांत असून विदेशातील अनेक देशांमध्ये त्यांनी त्यांच्या व्हायोलिनची जादू फिरविली होती. देशातील ते एक नामवंत असे संगीतज्ञ म्हणून ओळखले जात होते. अनेक चित्रपटांतील गीतांना त्यांनी संगीत दिले आहे.
1983 साली सुरसिंगार मुंबईच्या वतीने त्यांना ‘सुरमणी’ ही उपाधी बहाल करण्यात आली. त्याच वर्षी जपान येथे पार पडलेल्या दिव्यांगांच्या संमेलनात त्यांनी हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व केले होते. पुन्हा 1990 साली त्यांना ही संधी दुसऱ्यांदा मिळाली. ‘भारतीय घटनेचा शिल्पकार’ ही त्यांची कॅसेट अत्यंत लोकप्रिय झाली आहे. 2009 साली ते आकाशवाणीतून निवृत्त झाले होते.
त्यांच्या शिष्यवर्गाकडून दरवर्षी नियमितपणे गुरुपौर्णिमेला विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले जात होते आणि शिष्यवर्ग त्यांच्या दर्शनासाठी व आशीर्वाद घेण्यासाठी दूरवरून येत होता. या सुरमणीला तमाम रसिकांचा सलाम!



























































