एक कोटी किमतीची कलाकृती, जगप्रसिद्ध शिल्पकार सदानंद बाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

जगप्रसिद्ध चित्रकार, शिल्पकार सदानंद बाकरे यांनी एक प्रयोगशील कलाकार म्हणून आपल्या चित्र व शिल्पकलेचा वेगळा ठसा कला जगतावर उमटविलेला आहे. त्यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे.

सदानंद बाकरे यांनी कोकणातील सह्याद्री कला महाविद्यालयात प्रात्यक्षिक दाखविताना घडविलेल्या एका कलाकृतीची किंमत तब्बल एक कोटी रुपये असल्याची माहिती या महाविद्यालयाचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध चित्रकार, शिल्पकार प्रकाश राजेशिर्के यांनी दिली.

 जागतिक कीर्तीचे कलावंत सदानंद बाकरे ब्रिटनमधून परतल्यानंतर दापोलीजवळच्या मुरुड समुद्र किनाऱ्यावर बाकरे यांचे मन रमले आणि तेथे त्यांनी अनेक वर्षे वास्तव्य केले. प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रुपचे सदानंद बाकरे हे प्रमुख संस्थापक सदस्य होते.  बाकरे यांनी ब्रिटनमधील वास्तव्यातही अनेक कलाकृती घडविल्या. सह्याद्री कला महाविद्यालयातील त्यांची कलाकृती अनमोल आहे. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त चित्र – शिल्प स्पर्धांचे आयोजन केले आणि प्रदर्शनात बाकरे यांची कलाकृती मांडून या कलाकृतीची प्रथमच किंमत जाहीर केली, असे प्रकाश राजेशिर्के यांनी सांगितले.

अशी घडली कलाकृती

सह्याद्री कला महाविद्यालयाला बाकरे यांनी अनेकदा सदिच्छा भेट दिलेली आहे. एका भेटीच्या त्यांनी शिल्पकलेचे  प्रात्यक्षिक दिले. कला महाविद्यालयाच्या परिसरात एका नवीन इमारतीचे काम सुरू होते. लाकडाच्या पट्टय़ा  इतस्ततः विखुरलेल्या होत्या. त्या पट्टय़ा पाहून  शिल्पकार बाकरे यांना एक भन्नाट कल्पना सुचली आणि त्यांनी बाटलीच्या तोंडावर तोल साधेल अशी अर्धवर्तुळाकार कलाकृती घडविली. या कलाकृतीच्या दोन्ही बाजूला करवंटय़ा लावून त्यात पक्ष्यांना खाणं आणि पाणी ठेवण्याची सोय केली.