रद्दीतून साकारल्या कलाकृती, उमा शर्मा यांच्या कलाकृतीची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्’मध्ये नोंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रद्दीच्या कागदाचे कोलाज करून त्यापासून अनोख्या कलाकृती साकारण्याची किमया मथुरा येथील आर्टिस्ट उमा शर्मा यांनी केली आहे. त्यांच्या सर्वात मोठय़ा पेपर कोलाज पेंटिंगची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्मध्ये झाली आहे. हे विक्रमी पेंटिंग बघण्याची संधी मुंबईकर रसिकांना मिळाली आहे. जहांगीर कलादालनात 7 ते 13 जूनदरम्यान उमा शर्मा यांचे ‘कागज की जुबानी’ प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

मथुरा येथील उमा शर्मा कलाकार आणि कला शिक्षक आहेत. पेपर कोलाज ही त्यांची खासीयत आहे. शर्मा यांनी मुंबईतील एसएनडीटी महाविद्यालयातून फाईन आर्टस् (पेंटिंग) या विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली असून अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस् पुरस्कारासह अनेक सन्मान त्यांना मिळाले आहेत. पाच दशकांच्या दीर्घ कलाप्रवासात त्यांची अनेक सोलो प्रदर्शने, कार्यशाळा झाल्या आहेत.

उमा शर्मा यांची पेंटिंग्ज वास्तववादी असतात. त्यात गावे, घाट आणि मंदिरे दिसतात. निसर्ग आणि धर्माशी त्यांची विशेष जवळीक आहे. त्याचे दर्शन त्यांच्या कलाकृतींमधून होते. रद्दीचा कागदापासून या अप्रतिम कलाकृती साकारलेल्या आहेत.

– ‘ट्वेल्व्ह बर्डस्’, ‘फुलवाली’, ‘सिटी स्केप’, ‘मार्ंनग ऍट गंगा घाट’, ‘हट इन अ व्हिलेज’, ‘आंगन वृक्ष’, ‘कृष्ण’, ‘साईबाबा’ आणि अशी अनेक कोलाज चित्रे या प्रदर्शनात पाहता येणार आहेत. लहान आकारापासून ते मोठय़ा आकाराच्या कोलाजपर्यंत ऐंशीहून अधिक कलाकृती प्रदशर्नात आहेत. त्यांचा आनंद 13 जूनपर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 7 या वेळेत रसिकांना विनामूल्य घेता येईल.

– ‘ माझी पेंटिंग्ज हा कागदाशी झालेला संवाद आहे. त्यासाठी मी पेंट आणि कुंचला वापरत नाही. माझ्या सर्व भावना मोठय़ा आकाराच्या मी तयार केलेल्या पेपर कोलाजमध्ये पाहता येऊ शकतात, असे उमा शर्मा सांगतात.