
‘आदर्श’ घोटाळाप्रकरणी ईडी आणि सीबीआयच्या कारवाईला घाबरून काँग्रेसला रामराम ठोकणारे अशोक चव्हाण आज अखेर कमळाबाईच्या पदराआड दडले. पक्षाची अधिकृत फी भरून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आदर्शप्रकरणी नरेंद्र मोदी सरकारकडून कारवाईचे संकेत मिळाल्यानंतरच अशोक चव्हाण यांची पावले भाजपच्या दिशेने पडली होती. आज अखेर ते भाजपवासी झाले. चव्हाण यांच्यासोबत त्यांचे समर्थक माजी आमदार अमर राजूरकर हेसुद्धा भाजपमध्ये दाखल झाले.
भाजप प्रवेशानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अशोक चव्हाण यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात करत असलेल्या कामातून प्रेरणा घेऊन तसेच विकासात्मक काम राज्यात करण्यासाठी आपण भाजपमध्ये प्रवेश केला, असे कारण अशोक चव्हाण यांनी यावेळी सांगितले.
38 वर्षांचा आपला राजकीय प्रवास राहिला असून आजपासून आयुष्याची नवी सुरुवात करत आहे असे सांगतानाच, कुणावरही आपल्याला वैयक्तिक टिप्पणी आणि दोषारोप करायचे नाहीत असेही अशोक चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले. कोणत्याही लालसेपोटी आपण भाजपमध्ये प्रवेश केलेला नसल्याचा दावा करतानाच मिळेल ती जबाबदारी आपण सकारात्मक दृष्टिकोनातून पार पाडू, असे अशोक चव्हाण म्हणाले.
आणखी काही नेते संपर्कात – फडणवीस
काँग्रेसचे आणखी काही नेते संपर्कात असल्याचा दावा यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केला. अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी मिळणार अशी चर्चा असल्याच्या मुद्दय़ावर बोलताना, राज्यसभेचे उमेदवार भाजपचे केंद्रीय नेते ठरवतात. येत्या काही दिवसांत ती यादी येईल, असे ते म्हणाले.
‘आदर्श’ हा राजकीय अपघात!
आता आदर्श घोटाळय़ाचे काय, असा प्रश्न विचारून पत्रकारांनी अशोक चव्हाण यांना छेडले. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले की, ‘हा प्रश्न विचारायला खूप उशीर केलात. आधीच विचारायला हवा होता. ‘आदर्श’बाबत उच्च न्यायालयात आमच्या बाजूने निकाल लागला आहे. काही संस्थांनी याप्रकरणी याचिका दाखल केल्या आहेत. त्यामुळे जी काही कायदेशीर प्रक्रिया असेल ती आम्ही पूर्ण करू. हा सगळा राजकीय अपघात म्हणावा लागेल. मी आतापर्यंत याप्रकरणी अनेक गोष्टींना तोंड दिले आहे; परंतु हा चिंतेचा विषय नाही असे मला वाटते.’


























































