
सामना प्रतिनिधी । जालना
मुलाविरूध्द बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ नये, याकरीता तक्रारदाराकडून 10 हजाराची लाच घेताना कदीम ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भागुजी बजाजी पांढरे (रा. पोलिस वसाहत जालना) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले. गुरुवारी कदीम ठाण्यामध्ये ही कारवाई करण्यात आली.
कदीम ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पांढरे यांनी तक्रारदार यांना फोन केला. तुमच्या मुलाविरूध्द कदीम ठाण्यात एका महिलेने तक्रार अर्ज दिला आहे, तुम्ही ठाण्यात या. तक्रारदार ठाण्यात जाऊन पांढरे यांना भेटले असता, तुमच्या मुलाविरूध्द 376 भादंविप्रमाणे गुन्हा दाखल होऊ शकतो, असे सांगितले. त्यानंतर 20 नोव्हेंबर रोजी पांढरे यांनी पुन्हा तक्रारदार यांना फोन करून, कदीम ठाण्यात बोलाविले. तक्रारदाराने काय, अर्ज आला, मला दाखवा असे म्हटले असता, पांढरे यांनी अर्ज दाखवला नाही. उलट तुम्ही मला 1 लाख रूपये द्या, अर्जदार 5 लाख रूपये मागत आहे. मी तुमची तडजोड 5 लाखात करतो. गुन्हा दाखल झाला तर तुमच्या मुलाची नोकरी जाईल व त्याला जेलमध्ये जावे लागेल. त्यावेळी तक्रारदार पांढरे यांना हो म्हणाले. तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जालना यांच्याकडे तक्रार नोंदविली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने प्रारंभी याबाबत पडताळणी केली. त्यानंतर 22 नोव्हेंबर रोजी कदीम ठाण्यात सापळा लावला. तक्रारदार यांच्याकडून 10 हजाराची लाच घेताना पांढरे यांना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी यांच्यासह पोलीस पथकाने पार पार पाडली.



























































