औसा नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून कामकाज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। औसा

औसा नगर परिषदेचे कर्मचारी आपल्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी काळ्या फिती लावून काम करीत आहेत. प्रधान सचिवांनी घेतलेल्या बैठकीनुसार (डिएमए) कार्यालयात अद्यापही मागण्यांसंदर्भात बैठका होत नाहीत. शासन स्तरावर व डिएमए स्तरावर नगर पालिका, नगर पंचायत मधील कर्मचाऱ्यांच्या मागणी संदर्भात असलेल्या उदासीनतेमुळे व शासनाच्या ढिसाळ कारभाराविरुध्द बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय राज्यातील सर्व नगर पालिका, नगर पंचायत मधील कामगार संघटनांनी एकत्रित येऊन हे आंदोलन करीत आहे.

यासाठी नगरपालिका, नगर पंचायत मधील सर्व कर्मचारी बंधू भगिनींना आवाहन करत संघटना संघर्ष समितीने ठरविलेल्या आंदोलनानुसार 15 डिसेंबर 2018 रोजी नगरपालिका नगर पंचायत स्तरावर धरणे आंदोलन करण्यात आले होते. परंतु अद्याप निर्णय न झाल्याने 29 डिसेंबर ते 31 डिसेंबर पर्यंत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी औसा नगरपालिका, नगरपालिका कर्मचारी व रोजंदारी कर्मचारी काळ्या फिती लावून काम करीत आहेत. 31 डिसेंबर 2018 पुर्वी मागण्या संदर्भात शासन स्तरावर निर्णय न झाल्यास 1 जानेवारी 2018 पासून सर्व अत्यावश्यक सेवेसह सर्व कामकाज बंद करून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तरी सर्वांनी एकत्र येऊन शासन विरुध्दाचा लढा उभा करण्यात यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.

याप्रसंगी संवर्ग कर्मचारी सतिश बेलापट्टे, दिलीप शिंदे, मदन गुसिंगे, न.प. कर्मचारी श्रीराम ताकभाते, महेमुद शेख, अन्वर शेख, युवराज कसबे, वारीस शेख, अकबर शेख, सचिन माळी, वसंत बनसोडे, असद काझी, विशाल कांबळे, महेश उटगे, गिरीश जयशेट्टे, अजय बनसोडे तसेच रोजंदारी कर्मचारी मुक्तदीर पटेल, सुनिता गवारे, रंजना पाटील यांच्यासह आदी उपस्थित होते.