
पु. ल. देशपांडे म्हणजे तमाम मराठी माणसाचे लाडके व्यक्तिमत्त्व. पुलंवर आणि त्यांच्या लेखनावर वाचकांनी भरभरून प्रेम केले. ‘कोटय़ाधीश पुल’ म्हणून ते प्रसिद्ध आहेत. कारण त्यांचे शाब्दिक विनोद आणि अनेक कोटय़ा प्रसिद्ध आहेत. आता पुलंच्या लोकप्रिय कथा नामवंत कलाकारांच्या आवाजात ऐकण्याची संधी सुट्टीच्या दिवसांत रसिकांना मिळणार आहे. ‘स्टोरीटेल’ने हा महिनाभराचा उपक्रम सुरू केला आहे. ‘एप्रिल पुल’ अशी ही संकल्पना आहे.
‘एप्रिल पुल’ या ऑडिओ बुक्समध्ये ‘गुण गाईन आवडी’, ‘गणगोत’, ‘मैत्र’, ‘खिल्ली’, ‘उरलंसुरलं’, ‘चार शब्द’, ‘पूर्वारंग’ या पुस्तकांचा समावेश आहे. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, अविनाश नारकर, अजय पुरकर, चिन्मय मांडलेकर, आस्ताद काळे, सौरभ गोगटे, नचिकेत देवस्थळी, संदीप खरे यांनी पुलंच्या लोकप्रिय साहित्यकृतींना आपल्या आवाजाचा साज चढवला आहे. या दिग्गजांच्या आवाजात पुलंच्या लोकप्रिय पुस्तकांतील कथांचे तीसहून अधिक ‘ऑडिओ बुक्स’ स्टोरीटेल प्रदर्शित करीत आहे. येत्या आठवडय़ात अभिनेते अविनाश नारकर यांच्या आवाजात ‘चार शब्द’मधील ‘झोंबीः एक बाल्य हरवले बालकांड’, त्यासोबतच ‘पूर्वारंग’मधील कथा ऐकता येणार आहेत. उन्हाळ्याच्या सुट्टीत म्हणजेच एप्रिल- मे महिन्यात ही खास पर्वणी पुलप्रेमींनी मिळणार आहे.





























































