बागलाण तालुका दुष्काळाने होरपळतोय! पाण्यासाठी वणवण सुरूच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, सटाणा

बागलाण तालुका दुष्काळी जाहीर झाला असला तरीही शासनाकडून येणारी मदत येईल तेव्हा येईल मात्र शासकीय अनुदानापासून वंचित असलेल्या तालुक्यातील शेतकरी आजही टाहो पोडताना दिसत आहे. यंदाच्या दिवाळीत दुष्काळाने डोके वर काढले आहे. बागलाण तालुक्यातील पावसाची सरासरी जवळपास 459 मि.मी. आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून सातत्याने या सरासरीपेक्षा कमी पाऊस होत असल्याने बागलाण तालुका दुष्काळाने होरपळत आहे.

यंदाच्या पावसाळ्यात मात्र निसर्गाने कहरच केला. तालुक्यात सर्वदूर यंदा पावसाने अवकृपा केली. परिणामी नदी, नाले, विहिरी, कोरडय़ाठाक पडल्या आहेत. कधी नव्हे यंदा निसर्गाने हात दिल्याने शेतकरी वर्गासह सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाला आहे. बागालण तालुक्यात 1 जून 2018 ते 15 ऑक्टोबर 2018 दरम्यान अवघा 355 मि.मी. पाऊस झाल्याने तालुक्यातील शेतीसिंचनासह पिण्याच्या पाण्याने गहन प्रश्न निर्माण केला आहे. तालुक्यातील हरणबारी व केळझर ही दोघेही मध्यम लघुप्रकल्प किमान भरलीत ही समस्त बागलाणवासीयांच्या दृष्टीने समाधानाची बाब आहे. मात्र नदी, नाले, विहिरी कोरडय़ाठाक झाल्याने शेतकऱयांच्या चिंतेत भर पडली आहे.

बागालणमध्ये आजमितीस श्रीपुरवडे, वडेखुर्द, गोराणे, इजमाने, भाक्षी, चौगांव, खिरमाणी, रामतीर व नवेगांव या नऊ ठिकाणी पाण्याचे टँकर सुरू आहेत. तर तहसीलदार बागलाण यांच्याकडे नऊ गावांमध्ये टँकर सुरू करण्यासाठी प्रस्ताव दाखल झालेले आहेत. हिवाळ्याच्या प्रारंभीच तालुक्यातील पिण्याच्या पाण्यासाठी गहन परिस्थिती निर्माण झाली आहे. यावरून जानेवारीनंतर भयावह परिस्थिती निर्माण होणार आहे.

बागलाण तालुका कृषिप्रधान तालुका आहे. शेतीमालाला भाव नाही, शेतकरी वर्गाकडे पैसा नाही, यामुळे बाजारात मंदीची परिस्थिती निर्माण झाली आहे. व्यावसायिकांमध्ये मोठय़ा प्रमाणात चिंता निर्माण झाली आहे. शासनाकडे शेतकरी वर्गाची थकीत अनुदाने जरी या काळात मिळाली तरी बुडत्याला काडीचा आधार अशी गत बागलाणवासीयांची असणार आहे.

पावसाची आकडेवारी
1 जून ते 15 ऑक्टोबर 2018 दरम्यान तालुक्यातील मंडळ निहाय पाऊस आकडेवारी मि. मी. मध्ये सटाणा 291.2, ब्राह्मणगाव 206.2, नामपूर 249.9, जायखेडा 407.5, वीरगाव 301.3, डांगसौंदाणे 384.4, मुल्हेर 643, ताहाराबाद 358 मि.मी.

summary- baglan district is facing drought