कांदा निर्यातबंदी उठवा; महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी

371
balasaheb-thorat

जगभरात लॉकडाऊन असताना शेतात मेहनत करून मोठ्या कष्टाने शेतकर्‍यांनी कांद्याचे उत्पादन घेतले आहे. कांद्याला आता चांगला भाव मिळत होता. त्यामुळे चार पैसे हातात पडतील अशी आशा शेतकर्‍याला होती. मात्र, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने अचानक कांदा निर्यातबंदी जाहीर करून शेतकर्‍यांवर अन्याय केला आहे. ही निर्यात बंदी तात्काळ मागे घ्यावी अशी मागणी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. केंद्र सरकारच्या या अन्यायी निर्णयाविरोधात काँग्रेस पक्ष बुधवारी राज्यव्यापी आंदोलन करणार आहे, असेही ते म्हणाले.

थोरात म्हणाले की, तीन महिन्यांपूर्वी म्हणजे 4 जून 2020 रोजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कांदा, बटाटा, डाळींना जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळल्याची घोषणा केली होती. मग तीन महिन्यात निर्णय का फिरवला, त्यांनी घेतलेल्या निर्णयाची ते व्यवस्थित अंमलबजावणी करु शकत नाहीत, असे सांगत थोरात यांनी नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला आत्मनिर्भर बनवण्याच्या घोषणा करतात. मत्र, प्रत्यक्षात शेतकर्‍यांचे नुकसान करणारे निर्णय घेतात. त्यामुळे शेतकरी कसा आत्मनिर्भर होणार, असा सावलही त्यांनी केला. शेतकर्‍याचे उत्पन्न दुप्पट करणार, शेतमालाला दीडपट हमी भाव देणार, देश सुजलाम सुफलाम करणार, या मोदी सरकारच्या फक्त घोषणाच आहेत, हे नेहमी दिसून येत आहे, असे ते म्हणाले.

बाजारात मागील काही दिवसांत कांद्याला चांगला भाव मिळत असल्याचे आशादायी चित्र निर्माण झाले असतानाच केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने अचानक निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याने कांदा उत्पादक शेतकरी व निर्यातदारांनाही मोठा फटका बसला आहे. आधीच जवळपास 50 टक्के कांदा सडल्याने नुकसान झाले आहे. मात्र, कांद्याला चांगला भाव मिळत असल्याचे आशादायी चित्र बाजारात दिसत असताना मोदी सरकारच्या या निर्णयाने शतेकऱ्यांचे नुकसान होणार आहे. देशाचा विकासदर उणे 24 पर्यंत खाली घसरला आहे. सर्वच क्षेत्रात घसरगुंडी झालेली असताना कृषी क्षेत्राची कामगिरी समाधानकारक आहे.त्यामुळे पंतप्रधानांनी तात्काळ या प्रकरणात लक्ष घालून कांदा निर्यातबंदी उठवावी आणि शेतकर्‍यांना चार पैसे जादा कसे मिळतील हे पहावे, असे थोरात म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या