आमच्या खांद्यावर बंदूक ठेवल्याचे वाईट वाटते, थोरात यांची एकनाथ शिंदेंवर नाराजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तुम्ही सुरतला गेला, पुढे गुवाहाटीला गेला आणि नंतर गोव्याला गेलात… या काळात तुम्ही बंदूक मात्र आमच्या खाद्यावर ठेवली याचे वाईट वाटते, अशी खंत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदनाच्या ठरावावरील भाषणात व्यक्त केली.

या वेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, मी खूप सरकारे पाहिली आहेत. एका पक्षाचे सरकार असले तरीही अडचणी, तक्रारी असतात. आमदारांच्या कुरबुरी असतात. कामासाठी दबाव असतो. पण या सर्व तक्रारी आम्ही संयमाने घेतल्या. आम्ही टोकाची भूमिका कधीच घेतली नाही. बंडखोरी करताना एकनाथ शिंदे व बंडखोर आमदारांनी आघाडीवर टीका केली. त्याबद्दल नाराजी व्यक्त करताना तुम्ही आमच्या खांद्यावर बंदूक ठेवायला नको होती!

असे परत येतील वाटले नव्हते

देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भाषणात मी यांना घेऊन परत आलो, असा उल्लेख केला होता. त्याचा उल्लेख करताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, मी पुन्हा येणार असे फडणवीस म्हणायचे. पण तुम्ही असे परत याल असे कधी वाटले नव्हते, असा टोला त्यांनी लगावला.

उद्धव ठाकरेंचे जागतिक पातळीवर कौतुक

महाविकास आघाडी सरकारने केलेल्या कामांचा आढावा बाळासाहेब थोरात यांनी घेतला. अडीच वर्षांत शेतकऱयांच्या कर्जमाफीसारखे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. करोनाचे जागतिक संकट असतानाच तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काम करीत होते. त्यांनी केलेल्या दोन वर्षांच्या कामाचे कौतुक जागतिक पातळीवर करण्यात आले याकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.