तायक्वाँदो प्रशिक्षक बाळकृष्ण भंडारी यांचे निधन

होरांगी तायक्वाँदो अकादमीचे संचालक… 25 वर्षांत हजारो विद्यार्थ्यांना तायक्वाँदो प्रशिक्षण देणारे… स्वयंसिद्धा उपक्रमातून हजारो मुली व महिलांना स्वसंरक्षणाचे धडे देणारे… शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त बाळकृष्ण भंडारी यांचे मंगळवार, 13 एप्रिल रोजी कोरोनामुळे निधन झाले. ते 49 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.

बाळकृष्ण भंडारी यांना नुकताच पुणे महानगरपालिकेचा उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार मिळाला होता. त्यांना 2018 मध्ये क्रीडा युवा संचालनालयाचा उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार व 2019 मध्ये महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती क्रीडा मार्गदर्शन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. मागील 22 वर्षांपासून ते सेंट मीरा कॉलेज आणि 16 वर्षांपासून सेंट फिलिक्स स्कूल येथे विद्यार्थिनींना तायक्वाँदो खेळाचे प्रशिक्षण देत होते. बाळकृष्ण भंडारी यांनी केशवनगर येथे गरीब मुलांसाठी अल्प दरात जिम उभारली होती. ते दरवर्षी दक्षिण कोरिया येथे नवीन तंत्र आत्मसात करून त्याचा उपयोग पुण्यातील खेळाडूसाठी करत असत.

कोरोना काळात लहान मुले आणि युवकांची प्रतिकारशक्ती चांगली रहावी त्यांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगले रहावे यासाठी बाळकृष्ण भंडारी यांनी असंख्य मुलांना ऑनलाइन प्रशिक्षणही दिले, मात्र याच कोरोनाने शेवटी त्यांच्यावर घाला घातला. बाळकृष्ण भंडारी हे दरवर्षी 30 ते 40 विद्यार्थ्यांना ते दक्षिण कोरियाला घेऊन जात असत. तायक्वाँदोची पंढरी असलेल्या सेऊल येथील कुकिवोन या संस्थेने त्यांना निवड समितीचे सदस्य म्हणून घेतले होते. ही उपलब्धी मिळविणारे ते पहिले परदेशी आणि पहिले हिंदुस्थानी आहेत हे विशेष. त्यामुळे बाळकृष्ण भंडारी यांच्या निधनामुळे तायक्वाँदो खेळाची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या