
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकांच्या अगोदर आपापल्या समाजाच्या मागण्या घेऊन अनेक संघटना केंद्र सरकार विरोधात निदर्शने करण्यासाठी रस्त्यावर उतरल्या आहेत. 13 पॉइंट रोस्टर लागू करण्याऐवजी 200 पॉइंट रोस्टर लागू करण्यात यावा अशी मागणी करत काही आदिवासी आणि दलित संघटनांनी आज हिंदुस्थान बंदची हाक दिली आहे. मात्र या बंदचा फारसा प्रभाव संपूर्ण देशात दिसत नसून उत्तरेकडील राज्यांमध्ये काही ठिकाणीच याचे परिणाम पाहायला मिळत आहेत.
बंदमुळे देशातील काही राज्यांमध्या अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. या बंदमध्ये आदिवासी अधिकार आंदोलन, ऑल इंडिया आंबेडकर महासभा, संविधान बचाओ संघर्ष समिती अशा काही संघटना सहभागी झाल्या आहेत. तसेच या बंदला काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पक्ष अशा एनडीएच्या विरोधातील पक्षांनी पाठिंबा दिला आहे.

आदिवासी-दलित संघटनांच्या मागण्या
1. उच्चशिक्षण संस्थांच्या नियुक्त्यांमध्ये 13 पॉइंट रोस्टर ऐवजी 200 पॉइंट रोस्टर लागू करण्याची मागणी केली आहे.
2. बहिष्कार, भेदभावाला पाठिंबा देणाऱ्या सवर्णांना 10 टक्के आरक्षणाचा लाभ नाकरण्यात यावा.
3. आरक्षणात बदल करून संविधानावरील हल्ले थांबवावे.
4. देशातील 24 रिक्त पदांवर भरती करणे.
5. 20 लाख आदिवासींना वनभूमीवर हटवण्यासंदर्भातील कोर्टाचे आदेश पूर्णत: रद्द करण्यासाठी अध्यादेश आणणे.
6. गेल्यावर्षी 2 एप्रिल रोजी हिंदुस्थान बंदवेळी समर्थकांवरील खटले आणि रासुका हटवण्याची मागणी.




























































