बारसूचे माळरान पेटले, आंदोलन चिघळले; आंदोलक ठाम!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बारसू रिफायनरीविरोधी आंदोलन आज चिघळले. कोकणची राखरांगोळी करणारा प्रकल्प रद्द करा, अशी जोरदार मागणी करीत हजारो आंदोलकांनी थेट सर्व्हेक्षण आणि माती परीक्षण सुरू असलेल्या कामावरच धडक दिली. यामुळे बिथरलेल्या ‘ईडी’ सरकारने पोलिसी बळाचा वापर करून आंदोलकांवर अमानुष लाठीचार्ज केला. यात महिला, वृद्धांनाही बेदम मारहाण करण्यात आली. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांडय़ाही फोडल्या. या अमानुष लाठीहल्ल्यात तब्बल 400 जण जखमी झाले असून 20 जणांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना राजापूर आणि रत्नागिरीतील रुग्णालयांत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रणरणत्या उन्हाचा अनेकांना फटका बसला. काहींना उष्माघाताचा त्रास झाला. अनेक जण बेशुद्ध पडले. लाठीहल्ल्यातून वाचण्यासाठी पळताना कोसळले.

प्रदूषणकारी आणि कोकाणासाठी विनाशकारी ‘रत्नागिरी रिफायनरी व पेट्रोकेमिकल प्रकल्प’ बारसू येथे राबवण्यासाठी ‘ईडी’ सरकारकडून वाट्टेल त्या मार्गाचा अवलंब केला जात आहे. रिफायनरी प्रकल्प बारसू, सोलगावमध्ये प्रस्तावित असला तरी याचा विषारी परिणाम शिवणे, गोवळ, देवाचे गोठणे, धोपेश्वर परिसरासह संपूर्ण रत्नागिरी-कोकणावर होणार असल्याने गेल्या सलग पाच दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. मात्र सरकार आणि प्रशासनाकडून हे आंदोलन दडपण्यासाठी पोलिसी बळाचा वापर केला जात आहे. स्थानिकांचे कोणतेही म्हणणे ऐकून न घेता सशस्त्र्ा पोलिसांच्या सहाय्याने संपूर्ण पंचक्रोशीत दहशत निर्माण केली जात आहे. स्थानिकांचा विरोध असताना माती परीक्षणाच्या नावाखाली जागेचे सर्वेक्षणही करण्यात येत आहे. याच दडपशाहीविरोधात आज आंदोलकांचा पुन्हा एकदा भडका उडाला. सुमारे पाच हजार आंदोलक थेट सर्वेक्षण सुरू असलेल्या ठिकाणी घुसले. मात्र भर दुपारी 2.15 वाजताच्या सुमारास पोलिसांनी लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांडय़ा पह्डण्यास सुरुवात केली. यात अनेक जण गंभीर जखमी झाले.

पोलिसी दडपशाहीविरोधात घोषणाबाजी
यावेळी स्वतःच्या हक्कासाठी लढणाऱ्या आंदोलकांनी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, हरहर महादेव, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, रिफायनरी हटवा, कोकण वाचवा, जमीन आमच्या हक्काची… नाही कुणाच्या बापाची, एकच जिद्द… रिफायनरी रद्द अशी घोषणाबाजी केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांना चर्चेलाही वेळ नाही
स्थानिकांशी चर्चेसाठी सरकार तयार असल्याचे सांगणारे मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांना रिफायनरीविरोधकांशी चर्चा करायला गेल्या सहा महिन्यांपासून वेळ मिळत नसल्याचे रिफायनरी विरोधक संघटनेचे सत्यजित चव्हाण यांनी सांगितले. गेल्या सहा महिन्यांत मुख्यमंत्री आणि पालिकमंत्र्यांची तीन वेळा भेट घेऊन चर्चेसाठी स्थानिकांच्या वतीने पत्र देण्यात आले. मात्र मुख्यमंत्री रत्नागिरीत येऊनही त्यांनी चर्चा करणे टाळले. तर पालकमंत्री जाणीवपूर्वक भेटत नसल्याचा आरोपही त्यांनी मुंबई प्रेस क्लबमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत केला.

ग्रामपंचायतींचा ठराव प्रकल्पविरोधी असतानाही प्रकल्प दामटवण्याचा प्रयत्न
धोपेश्वर ग्रामपंचायतीचा भाग असलेल्या बारसूसह सोलगाव, शिवणे, गोवळ, देवाचे गोठणे अशा पाचही ग्रामपंचायतींमध्ये प्रकल्प प्रदूषणकारी असल्याने रिफायनरीविरोधात ठराव एकमताने मंजूर करण्यात आले आहेत. असे असताना ग्रामपंचायतींना कोणतीही माहिती न देता हा प्रकल्प राबवण्यासाठी थेट कार्यवाही सुरू केल्याचा प्रकार दडपशाही असल्याचे प्रकल्पविरोधी संघटनेचे नरेंद्र जोशी यांनी सांगितले.

चर्चा प्रकल्पाच्या ठिकाणी, शेतकऱ्यांसोबत करा!
आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून प्रशासन स्थानिकांसोबत चर्चेचा फार्स करीत आहे. मात्र आंदोलनाची माहिती मिळताच प्रकल्पविरोधी काम करणाऱया प्रमुख 45 कार्यकर्त्यांना तालुकाबंदी करीत तडिपारीच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत. तर चर्चेत डॉक्टर, वकील, व्यापारी आणि परप्रांतीय जमीन मालकांना बोलवून सर्वसामान्य शेतकऱयांची चेष्टा सुरू असल्याचा आरोप सत्यजित चव्हाण यांनी केला. चर्चा करायचीच असेल तर प्रकल्पाच्या ठिकाणी शेतकऱयांसोबत मोकळ्या जागेत करा, असे आवाहनही त्यांनी केले.

कोकणसाठी पर्यावरणपूरक धोरण राबवा
महाराष्ट्रातून अनेक नोकऱया आणणारे प्रकल्प ‘ईडी’ सरकारच्या काळात राज्याबाहेर जात असताना विनाशकारीच प्रकल्प निसर्गसंपन्न कोकणात का आणता, असा सवालही रिफायनरीविरोधी संघटनेकडून करण्यात आला आहे. कोकणचा विकास करायचाच असेल तर पर्यावरणपूरक धोरण तयार करून अंमलबजावणी करा, अशी मागणीही संघटनेकडून करण्यात आली.

> आज चर्चेसाठी जिल्हाधिकारी देवेंद्र सिंग, पोलीस अधीक्षकांसह आले असता लाठीचार्जचा निषेध करीत आंदोलकांनी बैठकीवर बहिष्कार घातला.
> प्रशासनाने आधी सर्वेक्षण थांबवावे आणि सकारात्मक चर्चा करावी अन्यथा तीन दिवसांनी पुन्हा तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेकडून देण्यात आली.
> मोठय़ा प्रमाणात आंदोलक जखमी झाल्यामुळेही आंदोलन तीन दिवस थांबवण्यात येणार आहे.

पोलिसांनी महिला, वृद्ध, तरुण अशा कोणाचीही गय न करता बेदम लाठीचार्ज केला. यात लाठीच्या जबर माराने गंभीर जखमी झालेल्यांना अक्षरशः झाडीत फेकून देण्यात आले. यानंतर मिळेल त्याला फरफटत नेत पोलीस व्हॅनमध्ये बसवण्यात आले. आपली हक्काची जमीन वाचवण्यासाठी पुरुष-तरुणांच्या बरोबरीने महिलांनीही मोठय़ा संख्येने सहभाग घेतला. आम्हाला गोळ्या घाला, मात्र विनाशकारी रिफायनरी प्रकल्प होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका मांडली.